लिंपोपो नदी : क्रॉकोडाइल. आग्‍नेय आफ्रिकेतील एक मुख्य नदी. लांबी सु. १,७७० किमी. पाणलोट क्षेत्र ४,४०,००० चौ. किमी. दक्षिण आफ्रिका प्रजासत्ताकातील ट्रान्सव्हाल प्रांताच्या उत्तर भागात विट्‍वॉटर्झरँड प्रदेशाच्या उत्तर उतारावर उगम पावणारी ही नदी, विशेषतः उगमाकडील भागात, ‘क्रॉकोडाइल’ या नावाने ओळखली जाते. उगमाकडील भागात लिंपोपो नदी प्रथम अरुंद खिंडीतून (पूर्ट) माखालीबर्खपर्यंत उत्तरेकडे, नंतर मेसीनापर्यंत ईशान्येकडे, पाफूरीपर्यंत पूर्वेकडे व शेवटी आग्‍नेयीकडे वाहते. अशा रीतीने अर्धगोलाकार मार्ग आक्रमून अखेरीस मोझँबीकमध्ये झँओ बेलू (शाई-शाई) येथे हिंदी महासागरात विलिन होते. ईशान्येकडे वाहताना ती दक्षिण आफ्रिका प्रजासत्ताक व बोट्स्वाना यांमधील, तर पूर्वेकडे वाहताना द. आफ्रिका प्रजासत्ताक व झिंबाब्वे यांच्या सीमा निश्चित करते. तिचा सु. ४०० किमी. चा खालचा प्रवाह मोझँबीकमधून वाहतो. मॅरिको, शाशी, शांगानी या तिच्या डाव्या बाजूने येऊन मिळणाऱ्या उपनद्या, तर ऑलिफंट्‍स ही उजव्या बाजूने मिळणारी प्रमुख नदी आहे.

उगमाजवळच्या भागात ही नदी वाळवंटी भागातून वाहत असल्यामुळे तिला पाणी अतिशय कमी असते. त्यातच हार्टबीस्टपूर्ट खिंडीत धरण बांधून पाणी अडविले गेल्यामुळे प्रवाह अधिकच रोडावतो. बुशव्हेस्टच्या सुपीक खोऱ्यातून पुढे वाहत गेल्यानंतर तिला डावीकडून मॅरिको नदी मिळते व त्यानंतर ती ‘लिंपोपो’ म्हणून ओळखण्यात येते. ‘उकू पोपोझी’ म्हणजे ‘धाव घेणे’ या शब्दावरून हे नाव आले असावे असा समज आहे. बोट्‍स्वानाच्या सीमेवर तिला हंगामी उपनद्या, तर झिंब्बाब्वेच्या सीमेवर शाशी मिळते. पुढे मोझँबीकमध्ये प्रवेश करताकरताच ती आफ्रिकेतील पठाराच्या कडेशी येऊन पोहोचते. या ठिकाणी आल्यावर पुढच्या ४० किमी. च्या पट्ट्यात ती छोट्या धबधब्यांच्या रूपात २४० मी. खाली उडी घेते. मालाला, मोलूके व कीकेके येथील तिच्यावरील धबधबे लक्षणीय असून ते प्रवासी लोकांचे खास आकर्षण आहे. मात्र यामुळेच ऑलिफंट्‍स संगमापर्यंतच्या नदीपात्रात जहाजवाहतूक होऊ शकत नाही. खालच्या सु. २०० किमी. अंतरापर्यंत भरतीच्या वेळी जहाजे आत येऊ शकतात. मात्र मुखापासून १०० किमी. अंतरावर बंधारा घालण्यात आल्यामुळे अशी वाहतूक प्रत्यक्षात १०० किमी. पर्यंतच चालू राहते. मोझँबीकमधील गेझा जिल्ह्याच्या व्हीला दी झ्वेओ बेलू या सहरापर्यंत छोट्या आगबोटी वाहतूक करू शकतात परंतु मुखाकडील काही भागात वाळूचे बांध तयार होऊन वाहतुकीत अडथळे निर्माण झाले आहेत.

नदीच्या पाण्याच्या प्रमाणात ऋतुमानानुसार फरक पडतो. उन्हाळ्यात पाऊस पडल्यानंतर पूर येऊन खालच्या टप्प्यात पाण्याची पातळी ५ ते ७ मी. वाढते. हिवाळ्यात मात्र वरच्या भागात पाणी डोहाडोहातूनच साठलेले असते. 

ट्रान्सव्हालमधील हार्टबीस्टपूर्ट खिंडीत व मोझँबीकमध्ये गीहा येथे बांधण्यांत आलेल्या बंधाऱ्यांमुळे जलसिंचनाची सोय उपलब्ध झाली आहे. तिच्या आधारे शेती वसाहती निर्माण केल्या आहेत. 

पोर्तुगीज दर्यावर्दी वास्को द गामा याने १४९८ मध्ये प्रथम या नदीच्या मुखाचा शोध लावला. त्याने तिला ‘रिओ दी एस्फीरीतू सांतो’ असे नाव दिले. सेंट व्हिन्सेंट व्हाइटशेड आर्स्किने याने १८६८-६९ मध्ये या नदीच्या खालच्या टप्प्याचे समन्वेषण केले. रड्‍यर्ड किपलिंग (१८६५-१९३६) या विख्यात इंग्रज साहित्यिकाने या नदीला ‘ग्रेट ग्रे ग्रीन, ग्रीसी लिंपोपो’ म्हटल्याचा उल्लेख आढळतो. ब्रिटिश समन्वेषक कॅप्टन एल्टन याने १८७० मध्ये या नदीतून प्रथम प्रवास केला होता.

फडके, वि. शं.