समुद्रसपाटी : सर्वसाधारणपणे समुद्राच्या पाण्याच्या पृष्ठभागाची पातळी म्हणजे समुद्रसपाटी. तिच्या तुलनेत भूपृष्ठावरील अन्य उठावांची उंची अथवा खोली दर्शविली जाते. प्रमाण समुद्रसपाटी ठरविण्यासाठी भरती-ओहोटीच्या पातळ्यांचे सातत्याने दीर्घकाळ निरीक्षण व नोंदी करून त्यांवरून समुद्राची सरासरी पातळी ठरविली जाते. भरती-ओहोटीमधील पाण्याची सरासरी पातळी म्हणजे समुद्रसपाटी असे ग्राह्य धरले जाते. समुद्राच्या पाण्याला फुगवटा, लाट किंवा भरती नसेल, त्यावेळी समुद्राच्या पाण्याची प्रमाण समपातळी ठरविण्यात येते. समुद्रसपाटी शून्य मानण्यात येते. अशा निश्र्चित केलेल्या प्रमाण समुद्रसपाटीपासून कोणत्याही भूभागाची उंची किंवा खोली फुट, मीटर किंवा अन्य परिमाणांमध्ये मोजली जाते. जेव्हा एखादया भूभागाची उंची समुद्रसपाटीपेक्षा कमी असते, त्या उंचीच्या आकडयाच्या आधी वजा चिन्ह वापरले जाते. कोणत्याही प्रदेशाचे अधिकृत मोजणी नकाशे या समुद्रसपाटीच्या आधारे तयार केले जातात. भारतात चेन्नई येथील समुद्राची सरासरी पातळी ही भारताची प्रमाण समुद्रसपाटी मानली जाते. भारतातील के-टू या सर्वोच्च् शिखराची उंची ८,६११ मी. किंवा महाराष्ट्नातील कळसूबाई या सर्वोच्च् शिखराची उंची १,६४६ मी. म्हणजे ती उंची चेन्नई येथील प्रमाण समुद्रसपाटीच्या संदर्भात असते. ग्रेट ब्रिटनमध्ये कॉर्नवॉलमधील न्यूलीन येथील भरती-ओहोटी पातळीचे १९१५ ते १९२१ या कालावधीत सातत्याने निरीक्षण व नोंदी करून त्यांवरून ग्रेट ब्रिटनमधील भूभागाची मोजणी करण्यासाठी समुद्रसपाटी ठरविण्यात आली. हीच ग्रेट ब्रिटनची अधिकृत समुद्रसपाटी मानण्यात येते.

समुद्रसपाटीच्या सरासरी पातळीत स्थानपरत्वे तसेच कालपरत्वे अल्पसा फरक आढळतो. उदा., उत्तर पॅसिफिक महासागरातील पाण्याची पातळी उत्तर-अटलांटिक महासागरामधील पाण्याच्या पातळीपेक्षा काही सेंमी.ने अधिक उंच आहे. जमिनीने एकमेकांना जोडलेले असल्याशिवाय कोणत्याही दोन ठिकाणांमधील उंचीची तुलना होऊ शकत नाही. उदा., सॅन फॅन्सिस्को व होनोलूलू या दोन ठिकाणांमधील समुद्रसपाटीतील प्रत्यक्ष फरक सांगता येणार नाही. जागतिक समुद्रपातळी एका शतकात ०·१० ते ०·१५ मीटरने वाढत असल्याचे आढळून आले आहे. भूकवचातील उभ्या स्थानिक हालचाली, भूभागावरील हिम व बर्फाच्या स्वरूपातील साठा, धुवीय प्रदेशातील बर्फाचे वितळणे, महासागरांचे औष्णिक प्रसरण, सागरजलाचे तापमान व क्षारता, हवेचा भार, ऋतुमानातील बदल, सागरी प्रवाहांचे वितरण, सागरी लाटा, भरती-ओहोटी, वारा, नदयांव्दारे सागराला होणारा पाण्याचा पुरवठा इ. कारणांमुळे समुद्रपातळीत व पर्यायाने समुद्रसपाटीच्या पातळीत वाढ होत आहे.

चौधरी, वसंत