व्ह्या झ्‌मा : रशियाच्या मध्य युरोपीय भागातील, स्मोलेंस्क ओब्लास्टमधील एक शहर. लोकसंख्या ३९,००० (१९६७ अंदाज). मॉस्कोपासून नैर्ऋत्येस २०० किमी. अंतरावर, नीपर नदीच्या व्ह्याझामा या उपनदीच्या काठावर हे शहर वसले आहे. इ.स. नवव्या शतकात एक व्यापारी केंद्र म्हणून ते महत्त्वाचे होते. त्यानंतर लष्करी केंद्र म्हणूनही त्याला महत्त्व आले. त्यामुळे रशिया, लिथ्युएनिया व पोलंड या देशांमधील हे वादग्रस्त केंद्र बनले होते. पंधरावे ते सतरावे शतक या कालावधीत या तिन्ही देशांची यावर आलटून-पालटून सत्ता होती. शेवटी १६३४ मध्ये ते रशियाच्या ताब्यात आले. दुसऱ्या महायुद्धात जर्मनांनी या शहरातून माघार घेताना त्याचा विध्वंस केला होता. शहरात यंत्रनिर्मिती, स्वयंचलित यंत्रांची दुरुस्ती, खाद्यपदार्थ व अंबाडी प्रक्रिया, कातडी कमावणे हे प्रमुख उद्योग चालतात. हे एक प्रमुख लोहमार्ग स्थानकही आहे.

 चौधरी, वसंत