कामाख्या : आसाममधील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र. गौहातीपासून ३⋅२ किमी. ब्रह्मपुत्रेकाठी कामाक्षी अथवा कामाख्या मंदिर असून ते भारतातील आद्य शक्तिपीठ मानतात. पौराणिक कथांनुसार दक्षयज्ञातून मृत पार्वतीला घेऊन शंकर फिरत असता, पार्वतीचे ५१ तुकडे भारतभर पसरले गेले आणि ही सर्व शक्तिपीठे बनली. पार्वतीचा योनीभाग गौहातीजवळील नीलाचर टेकडीवर पडल्याने कामाख्याची आद्यपीठात गणना होऊ लागली. नरकासुर कामाख्य देवीची उपासना करीत असे अशीही कथा आढळते. सोळाव्या शतकात राजा नरनारायण याने येथील मंदिरांचा जीर्णोद्धार केला. हेमपीठ, कामपीठ, त्रिपुरा अशीही याची नावे आढळतात.

शाह, र. रू.