टांगानिका सरोवर : (टँगानीका). पूर्व आफ्रिकेच्या खचदरीतील मोठे सरोवर. क्षेत्रफळ ३२,८९३ चौ. किमी. हे जगातील सर्वांत जास्त लांबीचे ६६० किमी. व बैकलच्या खालोखाल जगातील सर्वांत खोल १,४३६ मी. गोड्या पाण्याचे सरोवर असून १६ ते ७२ किमी. रुंद आहे. याच्या मध्यावर झाईरे व टांझानिया यांची सीमा असून उत्तरेस बुरूंडी व दक्षिणेस झँबिया आहेत. याला मालागारासी, रूझीझी व २१५ मी.उंचीच्या धबधब्यावरून आलेली कालांबो या नद्या मिळतात व यातून निघालेली लूकूगा नदी काँगोला मिळते. सरोवरात हिप्पो, सुसरी व विविध प्रकारचे मासे विपुल असून काठावरील प्रदेशात वनस्पती व पशुपक्षीही विपुल व विविध आहेत. यांच्या काठी अनेक बांटू जमाती निर्वाह शेती करून राहतात. टांझानियाची उजीजी व किगोमा, झाईरेचे कालेमी, बुरूंडीचे बुजुंबुरा व झँबियाचे एम्बाला ही यावरील मुख्य बंदरे आहेत. अरबांना पूर्वीपासून ते माहीत असले, तरी यूरोपीयांना १८५८ मध्ये बर्टन आणि स्पीक यांच्याकडून ते माहीत झाले. कॅमेरॉनने याचा दक्षिण किनारा समन्वेषिला. लिव्हिंग्स्टन व स्टॅन्ली यांची ऐतिहासिक भेट उजीजी येथे झाली.

लिमये, दि. ह. कुमठेकर, ज. ब.