कोलीमा : सोव्हिएट रशियाच्या खबारफ्स्क प्रांतातील ईशान्येकडील पर्वतरांग व नदी. पर्वतरांग ओखोट्स्क समुद्राच्या उत्तरेकडे समुद्रकिनाऱ्याला जवळजवळ समांतर पसरली आहे, तर १,७७६ किमी. लांबीची कोलीमा नदी खबारफ्स्क प्रांतातच उगम पावते व पुढे ईशान्येकडील येकुत्स्क गणराज्यामधून उत्तरेकडे आणि नंतर ईशान्येकडे वाहत जाऊन आर्क्टिक समुद्राला मिळते. या नदीत व्येर्खन्ये कालिम्स्कपर्यंत जलवाहतूक मोठ्या प्रमाणात चालते. अमलॉन, लिटल अन्यूई व ग्रेट अन्यूई या तिच्या प्रमुख उपनद्या आहे. कोलीमा नदीच्या दोन्ही काठांवर सोन्याच्या प्रसिद्ध खाणी आहेत.

पर्वतरांग ९१५ मी. ते १,८३० मी. उंचीची असून बालिगिचॅन शहराच्या पूर्वेला २०० किमी. वर २,१०० मी. ते २,४०० मी. उंचीची आढळते. तसेच ती दोन्ही अन्यूई नद्यांच्या मधील भागात आणि लिटल अन्यूई नदीच्या पूर्वेकडील भागात २,१०० मी. उंच आहे. १,२८० किमी. लांबीच्या या पर्वतरांगेचा विस्तार ईशान्य-नैर्ऋत्य असून, त्यातून उत्तर-दक्षिण व वायव्य-आग्नेय अशा रांगा निघाल्या आहेत.

खातु, कृ. का.