ब्वाके: प. आफ्रिकेतील आयव्हरी कोस्टमधील एक प्रमुख शहर. लोकसंख्या १,२०,००० (१९७६). हे आबीजानच्या उत्तर-वायव्येस १८८ किमी.वर वसलेले आहे. व्यापार वा उद्योगधंदे यांच्या दृष्टीने यास महत्त्व असून पूर्वी गुलामांच्या व्यापाराचे केंद्र म्हणून हे ओळखले जाई. आबीजान ते वागाडूगू (अपर व्होल्टा) यांदरम्यानच्या रस्ते व लोहमार्ग यांवर हे वसलेले असल्याने दळणवळणाच्या दृष्टीने प्रसिद्ध आहे.

फ्रेंचांनी एक सैनिकी ठाणे म्हणून १८९९ मध्ये हे वसविले. येथे कापड, तंबाखू इ. उद्योग विकास पावलेले आहेत. तांदूळ, कॉफी, कोको, कापड, तंबाखू, गुरे इत्यादींचे मोठा व्यापार येथे चालतो. आसमंतातील सोन्याच्या व मँगॅनीजच्या साठ्यांमुळेही यास महत्त्व प्राप्त झाले आहे. येथे वस्त्रोद्योग व पशुवैद्यक यांच्या संशोधन संस्था असून नभोवाणी केंद्रही आहे.

गाडे, ना. स.