होनावर : कर्नाटक राज्याच्या उत्तर कानडा जिल्ह्यातील याच नावाच्या तालुक्याचे मुख्यालय व बंदर. लोकसंख्या १९,१०६ (२०१३ अंदाज). हे उत्तर कानडा जिल्ह्याचे मुख्यालय कारवारच्या आग्नेयीससु. ८० किमी., शरावती नदी अरबी समुद्रास जेथे मिळते, त्या ठिकाणी वसलेले आहे. हे राष्ट्रीय महामार्ग क्र. १७ व २०६ आणि कोकण रेल्वेनेइतर मोठमोठ्या शहरांशी जोडले आहे. कोकण रेल्वेचे कर्की हे स्थानक होनावरपासून सु. ५ किमी.वर आहे. कोकण रेल्वेचा २ किमी. लांबीचा एक मोठा पूल येथे शरावती नदीवर आहे. 

 

हे ऐतिहासिक शहर असून अबुल फिदा व इब्न बतूता यांनी या शहराचा उल्लेख केलेला आहे. सोळाव्या शतकाच्या प्रारंभी हे व्यापारी केंद्रम्हणून प्रसिद्ध होते. मार्को पोलोच्या भारत भेटीवेळी भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील हे महत्त्वाचे बंदर होते. पोर्तुगीजांनी येथे किल्ला बांधलाहोता (१५०५). सीझर दे फेदेरिसी याने याचा उल्लेख ‘ओनोर’ असा केलेला आहे. पोर्तुगीजांनंतर हे शहर बिदनूरच्या सत्तेत, १७६४–८२ पर्यंत हैदर अली व १७८४–९९ पर्यंत टिपू सुलतानच्या आधिपत्यात होते तर १७८३ व १७९९ नंतर ते इंग्रजांच्या अंमलात होते. जिल्ह्याचे मुख्यालय येथे १८००–१७ पर्यंत होते. येथे १८९० पासून नगर-पालिका आहे. 

 

सागरी मासे उतरवण्याचे ठिकाण म्हणून यास महत्त्व आहे. येथील दुर्गा, लक्ष्मी-नारायण, विठ्ठल, रामेश्वर ही मंदिरे, कर्नल हिल स्मृतिस्तंभ ( उंची ३० मी.), कासारकोड पुळण, येथून ३ किमी.वर अरबी समुद्रातील बसवराजदुर्ग इ. पर्यटकांची आकर्षणे आहेत. 

गाडे, ना. स.