वरोडा : महाराष्ट्र राज्याच्या चंद्रपूर जिल्ह्यातील त्याच नावाच्या तालुक्याचे मुख्य ठिकाण व एक व्यापारी शहर. लोकसंख्या ३४,१८७ (१९८१). ते नागपूरचंद्रपूर राज्य महामार्गावर चंद्रपूरच्या वायव्येस सु. ४५ किमी. वर वर्धाचंद्रपूर रुंदमापी लोहमार्गावर वसले आहे. वरोड्याचा प्राचीन इतिहास ज्ञात नाही तथापि वाकाटक-राष्ट्रकूट घरण्यांची यावर दीर्घकाल सत्ता होती. पुढे यादव राजा सिंघणाच्या वेळी (कार. १२१०-४६) ते यादवांच्या आधिपत्याखाली आले. त्यानंतर या भागावर बहमनी, मोगल, आदिलशाही इ. मुस्लिम बादशहांच्या आक्रमणांना तोंड देत गोंडांची सत्ता अठराव्या शतकाच्या मध्यापर्यंत तग धरून होती. अखेर नागापूर संस्थानचे रघूजी भोसले (कार. १७३०- ५५) याने शेवटचा राजा नीलकंठशाहचा पराभव करून चंद्रपूरचे गोंड राज्य खालसा केले (१७५१). त्यानंतर वरोड्यावर मराठ्यांचा- नागपूरकर भोसल्यांचा- अंमल होता (१७५१- १८५४). तिसऱ्या रघूजीनंतर वऱ्हाडवर ब्रिटिशांची सत्ता आली. स्वातंत्र्योत्तर काळात १९५६ मधील राज्यपुनर्रचनेनंतर चंद्रपूर जिल्ह्याबरोबर वरोडा आपाततः महाराष्ट्रात आले. 

चंद्रपूर जिल्ह्याच्या पश्चिम भागाचा व आंध्र प्रदेशातील आदिलाबाद जिल्ह्याचा व्यापार या शहरातून चालतो. दगडी कोळशाचा फार मोठा अंदाजित साठा या तालुक्यात आहे. दगडी कोळशाच्या खाणींचे शहर म्हणून वरोडा हे पूर्वी ख्यतनाम होते तथापि हा उद्योग १९०६ साली बंद पडला. शहरात कापसापासून सरकी काढण्याचे व रुईच्या गाठी बांधण्याचे कारखाने असून हातमागांचा उद्योग चालतो. जवस व तिळापासून तेल काढण्याच्या गिरण्या येथे आहेत. यांशिवाय हातसडीचा तांदूळ सडण्याचा मोठा उद्योग, भात, कापूस, जवस, ज्वारी, तीळ इ. धान्यांची घाऊक बाजारपेठ येथे असून जनावरांचा बाजार भरतो. येथे कृषी उत्पन्न बाजार समिती स्थापन झाली (१९६३). त्यामुळे कापसाचा मोठा व्यापार येथून होऊ लागला. कृषिसंशोधनाच्या दृष्टीने सुधारित बी-बियाणे निर्माण करण्यासाठी राज्य शासनाने एकार्जुन बी-बियाणे उत्पादन केंद्र येथे स्थापन केले (१९६४) असून त्यासाठी ३३.८२ हे. क्षेत्र राखून ठेवले आहे. नगरपालिका (स्था. १८६७) आरोग्य, पाणी आदी सुविधा पुरविते. शहरात सर्वत्र नळने पाणीपुरवठा होतो. नगरपालिकेच्या प्रथमिक शाळांव्यतिरिक्त तीन माध्यमिक विद्यालये तसेच शास्त्र, वाणिज्य, कला व कृषी शाखा असलेले एक महाविद्यालय आहे. वरोडा-चिमूर रस्त्यावर मागसायसाय पुरस्काराचे मानकरी बाबा आमटे यांनी कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनासाठी सुरु केलेला प्रसिद्ध ‘आनंदवन’ हा प्रकल्प आहे. गावातील विठ्ठल मंदिर प्रेक्षणीय असून शहरात तीन हेक्टर क्षेत्र व्यापणारी नगरपालिकेची प्रशस्त बाग आहे.

डिसूझा, आ. रे.