मक्का : मुस्लिम जगतातील सर्वात पवित्र स्थान व मुहंमद पैगंबर यांची जन्मभूमी. लोकसंख्या ३,६६,८०९ (१९७४). हे शहर सौदी अरेबियात असून ‘झमझम’ नावाने प्रसिद्ध असलेल्या विहिरीच्या आणि पवित्र शांतिक्षेत्र ⇨काबा यांच्या सभोवताली बसलेले आहे. पुरातनकाळी हे शहर व्यापार व दळणवळण यांचे प्रमुख केंद्र होते. त्या वेळी चिनी रेशीम व भारतीय अत्तरे यांचा व्यापारात प्रामुख्याने अंतर्भाव असे. तथापि मुहंमद पैगंबरांचे जन्मस्थान (इ. स. ५७०) म्हणून यास विशेष महत्त्व प्राप्त झाले. मुहंमद पैगंबरांस आपल्या आध्यात्मिक ध्येयाच्या प्रचारास येथे विरोध झाल्यामुळे त्यांनी ६२२ मध्ये मक्केहून मदीनेला स्थलांतर केले. नंतर ६३० मध्ये त्यांनी मक्का पादाक्रांत केले. तेव्हापासून हे शहर इस्लामचे मुख्य धर्मपीठ म्हणूनच प्रसिद्ध झाले.

मुआविया ६५६ मध्ये खलीफा झाल्यानंतर त्यांनी आपली राजधानी दमास्कस येथे हलविली. ७५० मध्ये अब्बासी ह्यांच्या ताब्यात हे शहर आले. हारून अल्-रशीद यानी आपल्या ९ हाजयात्रांमघून तसेच अब्बासी खलीफाने मक्का-वासियांच्या उन्नतीकरिता विपुल संपत्ती खर्च केली. सोळाव्या शतकामध्ये मक्का आणि मदीना ही दोन्ही शहरे ऑटोमन सुलतान पहिला सलीम (कार. १५१२-१५२०) आणि त्याच्या वारसांच्या ताब्यात आली. त्यानंतर हेच सुलतान ‘शेरीफ’ म्हणून मक्केच्या प्रशासकांची नियुक्ती करू लागले. काही काळानंतर तुर्कांचा प्रभाव नाहीसा झाला व अब्दुल अझीझ सौद याने सत्ता हस्तगत केली. १९३२ साली त्याने सौदी अरेबियाचा राजा म्हणून स्वतःस घोषित केले. २० नोव्हेंबर १९७९ रोजी काही सनातनी धर्म वाद्यांनी केलेले बंड त्याच्या शासनाने मोडून काढले. याच काळात विशेषतः खनिज तेलाचा शोध लागल्यावर, मक्का हे शहर सौदी अरेबियातील इतर शहरांप्रमाणेच आधुनिक प्रगतीच्या मार्गावर आले. मक्केला दरवर्षी जाणाऱ्या हजारो हाज यात्रेकरूंना अधिकाधिक सुखसोयी प्राप्त करून देण्यात येतात. १९८२ मध्ये २३,२२९ भारतीय मुस्लिमांनी हाजयात्रा केली.

येथील रहिवासी ‘अहराम’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कापडाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन करतात. याशिवाय येथे मुलांचे छोटे रेशमी टॉवेल तयार करणे, सिमेंटच्या चौकटी बनविणे, फरशा, विटा तयार करणे, धातुकाम इ. प्रमुख व्यवसाय विकसित झाले आहेत.

नईमुद्दीन, सैय्यद