त्रापानी : प्राचीन द्रेपनम. इटलीच्या सिसिली बेटावरील त्रापानी प्रांताची राजधानी. लोकसंख्या ७०,०८२ (१९७१). हे वायव्य सिसिलीमध्ये पालेर्मोच्या पश्चिमेस ७४ किमी., भूमध्य समुद्रकिनाऱ्यावर वसले आहे. जुने शहर समुद्राकडील लहानशा द्वीपकल्पावर वसले आहे, तर आधुनिक शहर सान ज्यूल्यानॉ पर्वत पायथ्याच्या मैदानापर्यंत पसरले आहे. इ. स. पू. २४१ मध्ये पहिल्या प्यूनिक युद्धानंतर ते रोमनांच्या ताब्यात होते. त्यानंतर यावर व्हँडाल, बायझंटिन,अरब, नॉर्मन इ. सत्तांतरे झाली. दुसऱ्या महायुद्धात बाँब हल्ल्यामुळे याचे फारच नुकसान झाले. हे उत्कृष्ट बंदर असून पालेर्मोहून येणाऱ्या दोन लोहमार्गांचे अंतिम स्थानक आहे. येथून मीठ, दारू, मासे यांची निर्यात होते. याच्या आसमंतात दारू गाळणे, मीठ तयार करणे, मद्यार्क, मासे पकडणे, मासे डबाबंद करणे, संगमरवरावर कलाकुसर करणे, साबण, काच इ. उद्योग चालतात. शहरामध्ये तांत्रिक व नाविक संस्था असून बरोक शैलीचे राजवाडे व चर्च आहेत. सेंट आगोस्टीनो चर्च, देल कॉलेजिओ चर्च, सान लॉरेन्झो कॅथीड्रल, गियुडेक्का राजवाडा, पीपोली पुराण वस्तुसंग्रहालय इ. प्रेक्षणीय आहेत.

गाडे, नामदेव