स्पेन : किंग्डम ऑफ स्पेन. यूरोप खंडातील आकाराने सर्वांत मोठ्या देशांपैकी एक देश. यूरोप खंडाच्या नैर्ऋत्य कोपऱ्यात असलेल्या आयबेरियन द्वीपकल्पावर या देशाचे स्थान असून या द्वीपकल्पाचे सु. ८५% क्षेत्र स्पेनने व्यापले आहे. स्पेनच्या उत्तरेस बिस्के उपसागर, ईशान्येस फ्रान्स तसेच पिरेनीज पर्वत भागातील अँडोरा हा छोटा देश, पूर्वेस आणि आग्नेयीस भूमध्य समुद्र, दक्षिणेस जिब्राल्टरची सामुद्रधुनी, नैर्ऋत्येस अटलांटिक महासागराचे कादिझ आखात, पश्चिमेस पोर्तुगाल तर वायव्येस अटलांटिक महासागर आहे. स्पेनच्या मुख्य भूमीचा उत्तर-दक्षिण विस्तार ८७० किमी., तर पूर्व-पश्चिम विस्तार १,०५० किमी. असून  देशाला एकूण ३,७७४ किमी. लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. अक्षवृत्तीय व रेखावृत्तीय विस्तार अनुक्रमे ३६° उ. ते ४३° ४७¢ उ. अक्षांश आणि ३° १९¢ पू. ते ९° ३०¢ प. रेखांश असा आहे. पूर्वेस भूमध्य समुद्रातील बॅलीॲरिक बेटे ( क्षेत्रफळ ५,०१४ चौ. किमी.), आफ्रिका खंडाच्या वायव्य किनाऱ्याजवळील कानेरी बेटे ( क्षेत्रफळ ७,२७३ चौ. किमी. ) आणि उत्तर आफ्रिकेतील मोरोक्कोच्या उत्तर भागातील भूमध्य समुद्रकिनाऱ्यावर असणारी स्यूता व मेलील्या ही शहरे हे सर्व स्पेनचेच भाग आहेत. या सर्व भागांसह स्पेनचे क्षेत्रफळ ५,०६,०३० चौ.किमी. असून देशाच्या मुख्य भूमीचे क्षेत्रफळ ४,९२,५९२ चौ.किमी. आहे. लोकसंख्या ४,७१,२९,७८३ (२०१३ अंदाजे ). माद्रिद (लोकसंख्या ३२,६५,०३८—२०११) ही स्पेनची राजधानी आहे.  

 

भूवर्णन : देशाच्या मध्यवर्ती भागातील मेसेटा हा विस्तृत पठारी प्रदेश आणि त्याभोवती असणाऱ्या पर्वतश्रेण्या अशी स्पेनची सामान्य भूपृष्ठरचना आहे. सरासरी उंचीचा विचार करता स्पेन हा स्वित्झर्लंड खालोखाल सर्वाधिक उंचीचा प्रदेश असणारा देश आहे. पिरेनीज, कँटेब्रिअन ( कॉर्डिलेरा कांटाब्रिका ), माँतेस दे टोलीडो, स्येरा मोरेना, स्येरॅनिअस पेनिबेटिकस, सिस्टेमा आयबेरिको या देशातील प्रमुख सहा पर्वतश्रेण्या आहेत. समुद्रकिनाऱ्यापासून प्रदेशाची उंची एकदम वाढताना आढळते. पर्वतीय व पठारी प्रदेशांतून नद्यांनी खोल दऱ्यांची निर्मिती केलेली असून त्यांची खोरी क्वचितच रुंद आहेत. स्पेनचे सामान्यपणे पाच प्राकृतिक विभाग पाडले जातात : (१) मेसेटा, (२) उत्तरेकडील पर्वतीय प्रदेश, (३) एब्रो नदीचे खोरे, (४) किनारपट्टीची मैदाने आणि (५) ग्वादलक्विव्हर नदीखोरे. 

(१) मेसेटा ( मध्यवर्ती पठारी प्रदेश ) : देशाच्या मध्यवर्ती भागात असलेला हा पठारी प्रदेश म्हणजे देशातील सर्वांत मोठा प्राकृतिक विभाग असून त्याची सस.पासून सरासरी उंची सु. ८०० मी. आहे. हा पठारी प्रदेश चोहोबाजूंनी वेगवेगळ्या पर्वतश्रेण्यांनी वेढलेला आहे. उत्तरेस कँटेब्रिअन, ईशान्येस व पूर्वेस आयबेरियन, दक्षिणेस स्येरा मोरेना, पश्चिमेस पोर्तुगाल सरहद्दीवरील कमी उंचीच्या डोंगररांगा आणि वायव्येस स्पॅनिश गॅलिशिया इ. पर्वतश्रेण्यांनी हे पठार सीमित केलेले आहे. मेसेटाच्या साधारण मध्यातून सामान्यपणे नैर्ऋत्य-ईशान्य दिशेत पसरलेल्या कॉर्डिलेरा सेंट्रल या पर्वतश्रेणीमुळे या पठारी प्रदेशाचे उत्तरेकडील ओल्ड कॅस्टील व लीआँ आणि दक्षिणेकडील न्यू कॅस्टील व एश्त्रिमुदुरा अशा दोन उंच पठारी भागांत विभाजन झाले आहे. मेसेटा पठारावर टेकड्या व कमी उंचीच्या पर्वतश्रेण्यांनी खंडित झालेले मैदानी प्रदेश आहेत. पश्चिमेस मेसेटाचा विस्तार पुढे पोर्तुगालमध्ये झालेला आहे. मूलाथेन ( उंची ३,४८२ मी.) हे स्पेनच्या मुख्य भूमीवरील सर्वोच्च शिखर अगदी दक्षिण भागातील स्येरा नेव्हाडा श्रेणीत आहे. 

(२) उत्तरेकडील पर्वतीय प्रदेश : देशाच्या उत्तर भागात पश्चिमेस अटलांटिक किनाऱ्यापासून पूर्वेस भूमध्य समुद्रकिनाऱ्यापर्यंत पर्वतीय प्रदेशाचा विस्तार आहे. त्यात पश्चिम भागातील गॅलिशिया, मध्य भागातील कँटेब्रिअन व पूर्व भागातील पिरेनीज या प्रमुख पर्वतश्रेण्यांचा समावेश होतो. कँटेब्रिअन पर्वतश्रेणीमुळे बिस्के उपसागर किनाऱ्यालगत असलेले किनार-पट्टीचे मैदान मेसेटा पठारापासून अलग झाले आहे. हा किनारपट्टीचा मैदानी प्रदेश स्वतंत्र प्राकृतिक विभागही मानला जातो. देशाच्या ईशान्य भागातील स्पेन-फ्रान्स यांदरम्यानची सरहद्द पिरेनीज पर्वताने बनली आहे. पूर्वेस भूमध्य समुद्रापासून पश्चिमेस बिस्के उपसागरापर्यंत पिरेनीजचा विस्तार आढळतो. स्पेनच्या हद्दीतील अनेतो ( ३,४०४ मी. ) हे या पर्वतश्रेणीतील सर्वोच्च शिखर आहे. या पर्वतश्रेण्यांचे बरेचसे उतार वनाच्छादित आहेत. या पर्वत-भागांतून आखूड व वेगवान नद्या वाहतात. यांतील बराचसा प्रदेश कुरणां-खाली आहे. येथील उतारांवर शेतकरी काही प्रमाणात सोपान शेती करतात. 

(३) एब्रो नदीचे खोरे : स्पेनच्या ईशान्य भागात एब्रो नदीच्या खोऱ्यात मैदानी प्रदेश असून तो कॅटॅलोनिया या नावानेही ओळखला जातो. एब्रो ही देशातील सर्वांत लांब (९०९ किमी.) व मोठ्या नद्यांपैकी एक नदी आहे. ती उत्तरेस कँटेब्रिअन पर्वतात उगम पावून आग्नेय दिशेने वाहत जाऊन भूमध्य समुद्राला मिळते. 

(४) किनारपट्टीची मैदाने : स्पेनच्या संपूर्ण मैदानी प्रदेशाचा विस्तार भूमध्य समुद्राच्या पूर्ण किनारी भागात आहे. हा मैदानी प्रदेश सुपीक असून ठिकठिकाणी किनाऱ्यापर्यंत पसरलेल्या टेकड्यांमुळे खंडित झालेला आहे. हा समृद्ध कृषी प्रदेश आहे. 

 

(५) ग्वादलक्विव्हर खोरे : स्पेनच्या नैर्ऋत्य भागातील ग्वादलक्विव्हर नदीखोऱ्यातील हा प्राकृतिक विभाग देशातील सर्वाधिक उष्ण आणि सुपीक भाग आहे. स्पेनमध्ये फार जुनी त्याचप्रमाणे अर्वाचीन अशी दोन्ही प्रकारची खडक स्तररचना आढळते. अगदी दक्षिण भाग वगळता आयबेरियाचा संपूर्ण पश्चिम भाग प्राचीन हर्सिनियन कालखंडातील खडकांपासून बनलेला आहे. मेसेटा प्रदेश याच खडकांपासून बनलेला असून तो तुलनेने अधिक स्थिर आहे. त्याभोवती — विशेषतः भूमध्य समुद्राच्या बाजूस — नवीन अवसादी खडकरचना आढळते. काळाच्या ओघात प्रमुख हालचालींच्या वेळी या अवसादी खडकांवर दाब पडून तेथे पर्वतश्रेण्यांची निर्मिती झाली.  

स्पेनच्या मुख्य भूमीपासून पूर्वेस ८० — ३०० किमी. अंतरावर, भूमध्य समुद्रात स्पेनची बॅलीॲरिक बेटे आहेत. ही बेटे म्हणजे स्पेनच्या मुख्य भूमीवरील पेनिबेटिकस पर्वतश्रेणीचाच सागर पृष्ठावर आलेला उंचवट्याचा भाग आहे. या समूहात पाच मोठ्या व इतर अनेक लहानलहान बेटांचा समावेश होतो. त्यांपैकी माजॉर्का, मिनॉर्का व ईव्हिथा ही आकारानुसार सर्वांत मोठी बेटे आहेत. माजॉर्का हे बेट सुपीक असून त्याच्या वायव्य किनाऱ्यावर कमी उंचीची पर्वतश्रेणी आहे. मिनॉर्का हे बेट बरेचसे सपाट असून त्याच्या मध्यभागात वनाच्छादित टेकड्या आहेत. ईव्हिथा हे बेट डोंगराळ आहे. 

आफ्रिका खंडाच्या वायव्य किनाऱ्यापासून सु. ९६ ते ४३२ किमी. अंतरावर, अटलांटिक महासागरात ज्वालामुखी क्रियेतून निर्माण झालेली कानेरी बेटे आहेत. त्यांमध्ये १३ बेटांचा समावेश होतो. त्यांपैकी काही बेटे शुष्क, तर काहींवर उष्णकटिबंधीय वने आहेत. आकारमानानुसार मोठ्या बेटांत तेनेरीफ, फ्वेर्तेव्हेंतुरा व ग्रान कानेरीया असा क्रम लागतो. तेनेरीफ बेटावरील तेइदे (उंची ३,७०६ मी.) हे देशातील सर्वांत उंच पर्वतशिखर आहे. 


मृदा : स्पेनमध्ये वेगवेगळे मृदाप्रकार आढळतात. देशातील नद्यांच्या खोऱ्यांत व किनारी मैदानी प्रदेशात गाळाची मृदा, पश्चिम मेसेटातील स्फटिकमय खडकयुक्त प्रदेशात आम्लधर्मीय तपकिरी मृदा, पूर्व मेसेटामध्ये कॅल्शियमयुक्त व क्षारीय खडकरचना असलेल्या प्रदेशात करडी, तपकिरी किंवा चेस्टनट मृदा, गॅलिशिया व कँटेब्रिआतील आर्द्र प्रदेशात तपकिरी वनमृदा, कँटेब्रिअन पर्वतातील सूचिपर्णी अरण्यांच्या पट्ट्यात अपक्षालित पॉडझॉल मृदा, उत्तर स्पेनमधील पानझडी वनांच्या प्रदेशात करडी — तपकिरी वनमृदा, तर आग्नेय भागात लवणमय करडी वाळवंटी मृदा आढळते. स्पेनमध्ये दगडी कोळसा, लोहखनिज, तांबे, शिसे, जस्त, टंगस्टन, युरेनियम, पारा व सोने यांच्या खनिजांचे साठे आहेत.  

नद्या : स्पेनमध्ये सु. १,८०० नद्या व प्रवाह आहेत. आयबेरियन द्वीपकल्पावरील बहुतेक नद्यांतील पाण्याचे प्रमाण कमीच असते. कित्येकदा  त्या कोरड्याच असतात. बऱ्याच नद्यांची खोरी अधिक खोल असून काही ठिकाणी पात्रात कॅन्यनही आढळतात. पूर्वेस भूमध्य समुद्राला मिळणारी एब्रो ही प्रमुख नदी वगळता स्पेनमधील बहुतांश प्रमुख नद्या मेसेटामध्ये उगम पावून पश्चिमेस पोर्तुगालमार्गे अटलांटिक महासागरास मिळतात. टेगस ( लांबी १,००७ किमी.), एब्रो (९०९ किमी.), डोरू किंवा द्वेरो (८९५ किमी.), ग्वाद्यान्या (८१६ किमी.) व ग्वादलक्विव्हर (६५६ किमी.) या देशातील प्रमुख नद्या आहेत. अटलांटिक महासागराला मिळणाऱ्या नदी-प्रणालींच्या तुलनेत भूमध्य समुद्र किनाऱ्याजवळील नदीप्रणाली विशेष विकसित झालेल्या नाहीत कारण हवामानाच्या दृष्टीने स्पेनमधील हा प्रदेश बराच शुष्क आहे. गॅलिशिया आणि कँटेब्रिआ प्रदेशातील नद्या आखूड व वेगवान असून त्या उत्तरेस किंवा वायव्य किनाऱ्याकडे वाहत जातात. 

 

हवामान : हवामानाच्या दृष्टीने स्पेनचे प्रमुख तीन भाग पाडले जातात. त्यांपैकी वायव्य व उत्तर भागात समशीतोष्ण कटिबंधीय सागरी हवामान आढळते. तेथे तापमान मध्यम स्वरूपाचे व वृष्टिमान वर्षभर पुरेशा प्रमाणात असते. दक्षिण व पूर्व किनाऱ्यावर भूमध्य सामुद्रिक प्रकारचे हवामान आढळते. या भागात हिवाळे सौम्य व आर्द्र आणि उन्हाळे उष्ण व कोरडे असतात. देशाच्या अंतर्गत भागातील हवामान शुष्क खंडीय स्वरूपाचे असून तेथे हिवाळे थंड आणि उन्हाळे उबदार व कोरडे असतात. देशाच्या वायव्य भागात आणि पिरेनीजच्या पश्चिम उतारावर वार्षिक सरासरी वृष्टिमान १६० सेंमी.पेक्षा अधिक, तर ॲरागॉनची सखलभूमी आणि ला मांचा विभागात ते २५ सेंमी.पेक्षा कमी असते. स्पेनच्या एक द्वितीयांश क्षेत्रापेक्षा अधिक क्षेत्राचे वार्षिक सरासरी पर्जन्य-मान ५० सेंमी.पेक्षा कमी, तर केवळ एक पंचमांश क्षेत्राचे पर्जन्यमान १०० सेंमी. पेक्षा अधिक असते. मध्यवर्ती पठारी प्रदेशातील हवामान खंडांतर्गत स्वरूपाचे असून तेथील हिवाळ्यातील व उन्हाळ्यातील सरासरी तापमान अनुक्रमे ४ ° से. व २४ ° से. असते. सस.पासून २,७५० मी. पेक्षा अधिक उंचीच्या प्रदेशातील हवामान पर्वतीय स्वरूपाचे असून तेथे सरासरी तापमान हिवाळ्यात ० ° से. पेक्षा कमी, तर उन्हाळ्यात ते ११ ° से. असते. उत्तरमध्य पठारी प्रदेशात हिवाळ्यात हिमवृष्टी होते. उत्तर व पूर्व किनारी प्रदेशात सरासरी तापमान हिवाळ्यात ९ ° से., तर उन्हाळ्यात १८ ° से. असते. 

वनस्पती व प्राणी : स्पेनमध्ये हवामानाच्या भिन्नतेमुळे वनस्पति-जीवनही विविधतापूर्ण आढळते. देशात सु. ८,००० जातीच्या वनस्पती आढळतात. देशातील एकूण भूक्षेत्राच्या ३५.९% क्षेत्र वनांखाली होते (२००५). उत्तरेकडील बहुतांश आर्द्र प्रदेश पानझडी वने व कुरणांखाली असून तेथे मध्य यूरोपीय वृक्षांच्या जाती आढळतात. उदा., ओक, बीच, ॲश, बर्च, जूनिपर, एल्म, पॉप्लर, विविध प्रकारचे पाइन, चेस्टनट इत्यादी. दक्षिणेकडील शुष्क प्रदेशात निमवाळवंटी वृक्ष व झुडपे आढळतात. त्यांमध्ये प्रामुख्याने पाइन, जूनिपर, शूलपर्णी, कॉर्क ओक आणि विविध अवर्षणरोधक झुडपे आढळतात. मेसेटाचा बहुतांश भाग आणि अँडलूझिया प्रदेशात स्टेप प्रकारच्या वनस्पती पहावयास मिळतात. मेसेटावरील पर्वतीय प्रदेशात व टेकड्यांवर अरण्ये, तर मैदानी प्रदेशात विखुरलेली झुडपे व फुलझाडे आढळतात. पूर्व किनाऱ्यावरील अधिक पर्जन्याच्या प्रदेशात भूमध्य सामुद्रिक प्रकारचे वनस्पतिजीवन आढळते.  

स्पेनमध्ये वन्यप्राणिजीवन मर्यादित आहे. आफ्रिका खंडाशी असलेली स्थानीय जवळीक आणि पिरेनीज पर्वतामुळे इतर यूरोपीय देशांपासून निर्माण झालेली अलगता यांमुळे स्पेनमधील प्राणिजीवनाची आफ्रिकेतील प्राणि-जीवनाशी जवळीक आढळते. मोठी तपकिरी अस्वले, लहान काळी अस्वले, लांडगा, कोल्हा, रानमांजर, विविध प्रकारचे मृग, ससा, खार, रानडुक्कर, आयबेक्स, रानमेंढ्या, माकडे, मुंगूस, विविध सरडे इ. प्राणी येथे पहावयास मिळतात. येथील गरुड, दयाळ हे पक्षी महत्त्वाचे आहेत. 

 

चौधरी, वसंत  

इतिहास : स्पेनची प्रागैतिहासिक माहिती स्पष्ट होण्याइतपत पुरावे मिळत नाहीत तथापि सु. सतरा हजार वर्षांपूर्वीच्या अल्तामिरा येथील गुहाचित्रांवरून या प्रदेशातील तत्कालीन माणूस प्रगत अवस्थेत होता, असे दिसते. उत्तर स्पेनच्या कँटेब्रिअन प्रदेशात अशा प्रकारच्या अनेक गुहा आढळतात. नवाश्मयुगात इ. स. पू. ५००० मध्ये ‘ आयबेरियन ’ या रानटी टोळ्यांचे  येथे वास्तव्य होते. त्यांनी शेती करून काही खेडी वसविली होती. त्यानंतर अनेक केल्टिक टोळ्या पिरेनीज पर्वत ओलांडून स्पेनमध्ये स्थायिक झाल्या. या दोन जमातींच्या संकरातून एक नवीनच जमात स्पेनमध्ये निर्माण झाली. पुढे  इ. स. पू. बाराव्या शतकात फिनिशियनांच्या वसाहती स्पेनमध्ये स्थापन झाल्या. त्यांनी वसविलेली विद्यमान कादिझ व मॅलागा ही यूरोपातील आद्य शहरे असावीत.  

 

इसवी सन पूर्व पाचव्या शतकाच्या उत्तरार्धात कार्थेजियन लोक स्पेनच्या पूर्व किनाऱ्यावर तसेच बॅलीॲरिक द्वीपसमूहावर स्थायिक झाले. तत्पूर्वी तिथे ग्रीक वसाहतीही होत्या. इ. स. पू. तिसऱ्या शतकात आयबेरियन द्वीपकल्पाचा बराच भाग कार्थेजियनांच्या अंमलाखाली होता. रोमनांकडून दुसऱ्या प्यूनिक युद्धात ( इ. स. पू. २१८ — २०१) हॅनिबलचा पराभव झाला व आयबेरियन द्वीपकल्पातील कार्थेजच्या सत्तेस उतरती कळा लागली व हळूहळू पूर्व आणि दक्षिण स्पेनमध्ये रोमन सत्ता स्थापन झाली पहिल्या शतकात बास्क प्रांताचा अपवाद वगळता सर्व स्पेन रोमन अंमलाखाली गेला. त्यांनी लॅटिन भाषा व ख्रिस्ती धर्म स्पेनमध्ये रुजविला. त्यामुळे ख्रिस्ती धर्मास राजमान्यता मिळाली. सुसंघटित प्रशासन व सुधारणा यांमुळे रोमन सत्ता स्थिरावली. ट्रेजन (९८-११७), हेड्रिअन (११७-१३८) आणि थीओडोशियस (३७९-३९५) हे रोमन सम्राट मूळचे स्पॅनिश होत.

रानटी टोळ्यांच्या हल्ल्यांत रोमन साम्राज्य संपुष्टात आले (४७६). पाचव्या शतकात जर्मनीतून सूवी व दक्षिण रशियातून ॲलन्स् ह्या टोळ्या विद्यमान पोर्तुगालचा प्रदेश व गॅलिशिया प्रांतात स्थायिक झाल्या. त्यांनी मध्य आणि दक्षिण स्पेनवर अंमल बसविला व या प्रांताला व्हॅण्डालुसिया हे नाव दिले. पुढे आयबेरियन द्वीपकल्प व्हिसिगॉथांनी पादाक्रांत केला (५७३). त्यांनी राजेशाही प्रस्थापित केली व रोमनांप्रमाणे शासन व्यवस्था अंमलात आणली परंतु सरदारांच्या अंतर्गत कलह व बंडामुळे राजेशाही कमकुवत झाली. गॉथ अंमल सुमारे तीन शतके अस्तित्वात होता. त्यात रोमनांचीच शासनपद्धती प्रचारात होती व ख्रिस्ती धर्माचा सर्वत्र प्रसार झाला. 

इस्लामधर्मीय मूर सेनानी तारिक इब्न-झियाद जुलै ७११ मध्ये जिब्राल्टरची सामुद्रधुनी ओलांडून दक्षिण स्पेनमध्ये आला. त्याने व्हिसिगॉथ राजा रॉदरिगो याचा पराभव करून व्हिसिगॉथांचे राज्य जिंकले (७१८) आणि काही प्रदेश सोडता सर्व स्पेन इस्लामी अंमलाखाली गेला. स्पेनमधील या खिलाफतीचा प्रतिनिधी कॉर्दोव्हा येथे अमीर म्हणून राज्यकारभार पाहू लागला. या अमीरांपैकी अब्दुर रहमान एल् गाफेकी हा कर्तबगार प्रशासक व शूर योद्धा होता. त्याने पिरेनीज पर्वत ओलांडून फ्रान्सच्या काही भागांवर इस्लामी सत्तेची स्थापना केली पण ७३२ मध्ये प्वात्येच्या प्रसिद्ध लढाईत शार्ल मार्तेलने त्याचा पराभव करून पश्चिम यूरोपातील इस्लामच्या प्रसारास आळा घातला. यानंतर काही वर्षांनी उमय्याच्या वंशजांपैकी पहिला अब्दुर रहमान याने कॉर्दोव्हा येथे स्वतंत्र उमय्या खिलाफतीची स्थापना केली (७५५). दहाव्या शतकात या वंशातील तिसऱ्या अब्दुर रहमानने अमीरपदाचे खलीफापदात रूपांतर केले. ते पुढे १०३१ पर्यंत स्पेनमध्ये चालू होते पण तेथील ख्रिस्ती राज्यांच्या वाढत्या प्रभावामुळे आणि टलोसाच्या १२१२ मधील लढाईने स्पेनमधील इस्लामी सत्ता संपुष्टात आली. इस्लामी सत्तेच्या काळात उद्योगधंदे, वास्तुकला, साहित्य इत्यादीत लक्षणीय प्रगती झाली आणि स्पेनची सुसंस्कृत देश अशी ख्याती झाली.  


ख्रिस्ती राज्यांपैकी उत्तरेतील कॅस्टील व ॲरागॉन राज्यांचे महत्त्व हळूहळू वाढत गेले आणि त्याचे केवळ स्पेनच्याच नव्हे, तर यूरोपच्या इतिहासावर महत्त्वाचे परिणाम झाले. कॅस्टीलियन लष्करी सेनानी रोद्रीगो दीआझ दे व्हिवार याने असामान्य पराक्रम व नेतृत्व करून कॅस्टीलचे महत्त्व वाढविले. ॲरागॉनचा राजपुत्र फेर्नांदो याचा विवाह कॅस्टीलची राजकन्या इझाबेलाशी झाला होता (१४६९). कॅस्टीलचा राजा निपुत्रिक मरण पावल्यामुळे त्याच्यानंतर फेर्नांदोला कॅस्टीलची गादी मिळाली. कालांतराने फेर्नांदो ॲरागॉनच्या गादीवर बसला व ही दोन्ही राज्ये एक झाली. या पराक्रमी दांपत्याने लहानलहान ख्रिस्ती राज्ये जिंकून घेतली व १४९२ मध्ये ग्रानाडाचे इस्लामी राज्य जिंकून घेतल्यावर स्पेनचे एक संघटित राष्ट्र स्थापन झाले. तेव्हा स्पेनमधील ज्यू व इस्लाम धर्मीयांनी स्पेनमधून काढता पाय घेतला. तत्पूर्वी उत्तरेकडील विद्यमान पोर्तुगाल हे कॅस्टीलपासून अलग होऊन स्वतंत्र राज्य झाले. कॅथलिक पंथाच्या प्रसार-प्रचारार्थ फेर्नांदो व इझाबेला यांनी प्रयत्न केले. त्यांनी पाखंड्यांच्या चौकशी व शिक्षेसाठी इन्क्विझिशन नावाचे ख्रिस्ती न्यायालय स्थापन केले.  

फेर्नांदो व इझाबेला यांनी नौकानयनाला विशेष उत्तेजन दिले. भारताकडे जाणारा जलमार्ग शोधण्याच्या कोलंबसच्या योजनेला इझाबेलाच्या प्रयत्नानेच मूर्त स्वरूप आले व त्याचे पर्यवसान अमेरिका खंडाच्या शोधात झाले. पुढे टॉर्डासील्यसच्या तहानुसार (१४९४) पोर्तुगाल व स्पेनमध्ये जगाच्या विविध भागांची वाटणी होऊन उत्तर आणि दक्षिण अमेरिकेच्या विविध भागांवर स्पेनचे साम्राज्य पसरले. या नव्या भागातील सोन्या--चांदीच्या राशींनी संपन्न झालेला स्पेन अवघ्या यूरोपवर राज्य करण्याची स्वप्ने पाहू लागला. स्पेनच्या आक्रमक धोरणाने स्पेनचे साम्राज्य मेक्सिको, उत्तर आफ्रिका, फिलिपीन्स बेटे व बॅलीॲरिक बेटे इत्यादींत पसरले. फेर्नांदोला मुलगा नव्हता. त्याची ज्येष्ठ कन्या जोॲना हिचे लग्न हॅप्सबर्ग घराण्यातील राजा व पवित्र रोमन साम्राज्याचा बादशाहा मॅक्सिमिल्यन याचा एकुलता एक मुलगा फिलिप याच्याशी झाले. त्यांचा मुलगा चार्ल्स (१५१६ — ५६) स्पेनचा राजा झाला. तो १५१९ मध्ये पवित्र रोमन साम्राज्याचा बादशाहा झाला त्यामुळे स्पेनचा दरारा व महत्त्व वाढले. चार्ल्सने राजत्याग केला (१५५६), तेव्हा त्याचा मुलगा दुसरा फिलिप (१५५६ — ९८) स्पेनचा राजा झाला. १५८० मध्ये सबंध पोर्तुगाल देशही स्पेनला मिळाला व जगातील सर्वांत मोठ्या साम्राज्याचे स्वामित्व स्पेनकडे आले.

राजा दुसरा फिलिप याच्या संकुचित धार्मिक धोरणामुळे प्रॉटेस्टंट, ज्यू आदींचा छळ झाला.त्यामुळे फ्रान्स, इंग्लंड या राष्ट्रांनी स्पेनशी शत्रुत्व पत्करले. त्यावेळी नेदर्लंड्समध्ये कॅल्व्हिनप्रणित प्रॉटेस्टंट पंथाचा प्रसार झाला होता. दुसरा फिलिप निरंकुश राजसत्तेचा अभिमानी असून कट्टर कॅथलिक पंथीय होता. त्यामुळे नेदर्लंड्समध्ये स्पॅनिश सत्तेविरुद्ध बंड झाले. १५६८ मध्ये उद्भवलेल्या ह्या बंडाचेच नेदर्लंड्सच्या स्वातंत्र्य-युद्धात रूपांतर झाले. इंग्लंडच्या वर्चस्वाला शह देण्यासाठी स्पेनने आपल्या ‘ अजिंक्य आरमाराचा ’ उपयोग केला पण त्याचा पराभव होऊन स्पेनचे आरमारी वर्चस्व संपुष्टात आले (१५८८). दुसऱ्या फिलिपच्या मृत्यूनंतर (१५९८) स्पेनच्या गादीवर आलेले राजे कमकुवत होते. त्यामुळे स्पेनच्या साम्राज्यास उतरती कळा लागली व डच लोकांच्या नेदर्लंड्सला स्वातंत्र्य देणे प्राप्त झाले (१६०९) पोर्तुगाल स्वतंत्र झाला (१६४०) त्यामुळे त्याच्या वसाहतीवरील स्पेनचा हक्क संपला. फ्रान्सने या संधीचा फायदा घेऊन पिरेनीजच्या पर्वतापर्यंत आपली सरहद्द वाढविली. तीस वर्षांच्या युद्धात (१६१८ —४८) स्पेनने रोमन कॅथलिकांना भरघोस आर्थिक साहाय्य केले. त्यामुळे स्पेनने फ्रान्स व इंग्लंडचे शत्रुत्व ओढवून घेतले. स्पेनच्या हॅप्सबर्ग घराण्यातील राजा निपुत्रिक मरण पावला (१७००). त्यामुळे वारसायुद्धाला तोंड फुटले. स्पेनच्या वारसायुद्धात (१७०१ — १४) स्पेनचा पराभव होऊन उत्रेक्तच्या तहाने नेपल्स, पार्मा, सार्डिनिया व मिलान ऑस्ट्रियाला तर सिसिली सव्हॉयच्या राजाला व मिनॉर्का आणि जिब्राल्टर इंग्लंडला देणे भाग पडले मात्र स्पेनच्या गादीवर पाचवा फिलिप याचा राजा म्हणून हक्क प्रस्थापित झाला. स्पेनमधील बूबर्ँ वंशाचा तो संस्थापक होता. कालांतराने स्पेनने अमेरिकेच्या स्वातंत्र्ययुद्धाला आर्थिक साहाय्य केले आणि युद्धात प्रत्यक्ष सहभागही घेतला. त्यामुळे उत्रेक्तच्या तहाने झालेले नुकसान स्पेनने काही अंशी भरून काढले. पुढे पॅरिसच्या तहाने त्यास फ्लॉरिडा मिळाला (१७८३) आणि मिनॉर्काही पदरात पडले. यूरोपमधील स्पेनचे महत्त्व कमी झाले असले, तरी मेक्सिको, चिली, अर्जेंटिना, पेरू, व्हेनेझुएला यांवर व फिलिपीन्स बेटांवर स्पेनची वासाहतिक अधिसत्ता होती तथापि अमेरिकेच्या स्वातंत्र्ययुद्धानंतर तेथील वसाहतींना आपणही स्वतंत्र व्हावे, असे वाटू लागले. त्याला फ्रेंच राज्यक्रांतीमुळे चालना मिळाली. पाचव्या फिलिपने काही विधायक सुधारणा केल्या. त्यात कराच्या पद्धतीत पारंपरिक स्थानिक करांचे केंद्रीकरण केले, सार्वजनिक वास्तू व रस्ते बांधले आणि लष्कर व आरमार यांचे पुनर्गठण केले. अमेरिकेतील वसाहती व स्पेनमधील व्यापारास उत्तेजन दिले. फ्रान्सबरोबरचे राजनैतिक संबंध दृढतर केले. पहिल्या नेपोलियनने फ्रान्सची अधिसत्ता मिळविल्या-नंतर स्पेनच्या मदतीने ब्रिटिशांविरुद्ध युद्ध पुकारले. या ट्रफॅल्गरच्या लढाईनंतर (१८०५) स्पेनचे आरमारी सामर्थ्य ग्रेट ब्रिटनच्या तुलनेत दुय्यम ठरले. नेपोलियनने स्पेनवर स्वारी करून (१८०८) ते पादाक्रांत केले व तेथील सातव्या फर्डिनँडला पदच्युत करून स्वतःच्या जोझेफ या भावास गादीवर बसविले. काही उच्चवर्गीय उदारमतवाद्यांनी जोझेफला पाठिंबा दिला परंतु बहुसंख्य जनतेने त्यास विरोध दर्शविला. त्यांनी गनिमी काव्याने आपला प्रतिकार व्यक्त केला. तेव्हा फ्रान्स विरुद्ध झालेल्या द्वीपकल्पीय युद्धात स्पेन व पोर्तुगालच्या मदतीस ग्रेट ब्रिटन आले आणि माद्रिदमधून जी स्पॅनिश न्यायालये कादिझला गेली होती, त्यांनी नवीन संविधान बनविले. या घटनेत रोमन कॅथलिक चर्चचे अधिकार कमी करण्यात आले आणि व्यक्तिस्वातंत्र्य व तिचे अधिकार मान्य करण्यात आले. राजेशाहीस तिने अनुमती दिली. त्यांना उदारमतवादी ही संज्ञा प्राप्त झाली. 

नेपोलियनचा वॉटर्लूच्या लढाईत (१८१४) पराभव झाल्यानंतर सातवा  फर्डिनँड स्पेनमध्ये गादीवर आला. त्याने नवीन घटना रद्द करून उदारमत-वाद्यांना शासन केले. त्याने पुन्हा वासाहतिक साम्राज्य मिळविण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. १८२५ मध्ये क्यूबा, प्वेर्त रीको, फिलिपीन्स, ग्वॉम बेटे आणि आफ्रिकेतील काही छावण्या सोडता उर्वरित अमेरिकेतील सर्व वसाहती स्वतंत्र झाल्या होत्या मात्र स्पेनमध्ये फर्डिनँडचे अनुयायी व उदारमतवादी असे दोन स्वतंत्र गट निर्माण झाले होते.

फर्डिनँड निपुत्रिक मरण पावला. त्याने केलेल्या नियोजनानुसार त्याची मुलगी दुसरी इझाबेला ही बालपणी स्पेनच्या गादीवर आली (१८३३). तेव्हा कार्लिस्ट समूहाने त्यास विरोध केला. फर्डिनँडचा भाऊ कार्लोस हा खरा वारस असल्यामुळे त्यांना कॅथलिक परंपरेचा पाठिंबा होता मात्र उदारमतवाद्यांनी इझाबेलास सर्वतोपरी मदत देण्याचे ठरविले. परिणामतः वारसाहक्काच्या मुद्यावर यादवी संघर्ष उद्भवला (१८३३ — ४०). या सुमारास इझाबेलाची आई राज्यकारभार पाहात असे. तिने उदारमतवादी पक्षाचा सेनानी बाल्दोमेरो फेर्नांदो एस्पार्टेरोच्या हाती राज्यकारभार सोपवून राजपालकपदाचा त्याग केला (१८४१). इझाबेलाने सज्ञान झाल्यानंतर (१८४३) सुमारे पंचवीस वर्षे राज्य केले पण लष्करातील उच्चपदस्थ अधिकारी वर्गाने लोकशाहीसाठी बंडखोरी केली, तेव्हा शरण येऊन १८६८ मध्ये तिला सिंहासन सोडावे लागले व सेनापती फ्रॅन्सिस्को सिरेनो हा नव्या अस्थायी शासनाचा प्रमुख व सेनानी ह्वान प्रीम ई प्राट्स महामंत्री म्हणून राज्यकारभार पाहू लागले. या राजकीय अशांततेत सहा वर्षे गेली आणि मग नवीन प्रजासत्ताक सत्तेवर आले (१८७३). तेव्हा कार्लिस्ट व उदारमतवादी पक्ष यांत यादवी युद्ध उद्भवले, तेव्हा लष्कराने हस्तक्षेप करून इझाबेलाचा मुलगा बारावा आल्फॉन्सो यास गादीवर बसविले (१८७५). तो निधन पावल्यावर (१८८५) त्याचा अल्पवयीन मुलगा तेरावा आल्फॉन्सो (१८८६ — १९३१) गादीवर आला व त्याची आई मारीआ क्रिस्तीना राजपालक म्हणून राज्यकारभार पाहू लागली. तिच्या कारकीर्दीत क्यूबा व फिलिपीन्स येथील जनआंदोलनास अमेरिकेने समर्थन दिले. तेव्हा स्पेन ड्ढ अमेरिका युद्ध पेटले ( एप्रिल १८९८) व चार महिन्यांत स्पेन पराभूत होऊन पॅरिसच्या तहाने स्पेनला फिलिपीन्स, प्वेर्त रीको आणि अमेरिकेला ग्वॉम बेटे मिळाली व क्यूबा स्वतंत्र झाला. या युद्धामुळे स्पेनची अर्थव्यवस्था ढासळली व अराजक माजून देशभर दंगेधोपे सुरू झाले. या काळात कोर्तिस ( संसद ) व पंतप्रधान यांची सत्तेवर पकड होती.  

पहिल्या महायुद्धात (१९१४ — १८) स्पेन तटस्थ राहिला, त्याने युद्धातील देशांना साहित्य पुरविले. त्यामुळे स्पेनच्या उद्योगधंद्यांची व व्यापाराची वाढ झाली परंतु युद्धानंतर मंदीमुळे सर्वत्र बेकारी वाढली आणि मजूर वर्गात असंतोष पसरला उत्पादन ठप्प झाले राष्ट्रीय कर्ज वाढले. मोरोक्कोतील बंड शमविण्यासाठी जनरल सिल्बेस्ट्रला अपयश आले. या कारवाईत १२,००० स्पॅनिश सैनिक मरण पावले.  


ही अस्थिर परिस्थिती हाताळण्यासाठी आल्फॉन्सोने जनरल प्रीमो दे रिव्हेरा या वरिष्ठ सेनाधिकाऱ्याच्या हाती सत्ता सुपूर्त केली (१९२३). त्याने मंत्रिमंडळ बरखास्त करून घटना स्थगित केली. लष्करी कायदा ( मार्शल लॉ ) पुकारला आणि तो स्पेनचा लष्करी हुकूमशाह बनला. त्याने सात वर्षांच्या सर्वंकष अधिसत्तेत विधिमंडळही बरखास्त केले. प्रजासत्ताक-वाद्यांना हद्दपार केले, वृत्तपत्र स्वातंत्र्य, भाषण स्वातंत्र्य आदी मूलभूत हक्कांची गळचेपी केली. रिव्हेराच्या जुलूमशाहीमुळे लोक भडकले आणि लोकमत राजाबद्दलही विरोधी गेले. कामगार, विद्यार्थी आणि लष्कर या सर्वांनी उठाव केला. तेव्हा रिव्हेरा पदत्याग करून परदेशात पळाला (१९३०). तत्पूर्वी राजाने निवडणुका घेऊन १८७६ ची घटना पुनर्स्थापित करण्याची घोषणा केली होती. त्याला अनुसरून प्रजासत्ताकवाद्यांनी प्रचार सुरू केला. त्यांना राजसत्ता नष्ट करावयाची होती. राजाने ह्या गोष्टी कठोरपणे दडपून टाकल्या व लष्करी कायदा पुन्हा जारी केला पण लवकरच मार्च १९३१ मध्ये निवडणुका झाल्या. प्रजासत्ताकवाद्यांना बहुमत प्राप्त होऊन त्यांचा नेता झामोरा याने आल्फॉन्सो यास राजत्याग करण्यास फर्माविले. तेव्हा आल्फॉन्सो १३ एप्रिल १९३१ रोजी राजत्याग न करता फ्रान्सला गेला. त्यामुळे झामोराच्या अध्यक्षतेखाली हंगामी शासन सत्तेवर आले. घटना समितीने अखिल कामगार वर्गाचे लोकशाही प्रजासत्ताक हे नाव देऊन झामोरा राष्ट्राध्यक्ष झाला (१० डिसेंबर १९३१). नव्या प्रजासत्ताकाने रिव्हेराने रद्दबातल केलेल्या सर्व मूलभूत हक्कांची, धार्मिक व नागरी स्वातंत्र्याची तसेच समतेची हमी दिली मात्र जेझुइट पंथीयांची हकालपट्टी व त्यांच्या मालमत्तेच्या जप्तीचा कायदा अंमलात आणला. तसेच जमीनदारांच्या व देशत्याग केलेल्या लोकांच्या पाच कोटी एकर जमिनी भरपाई न देता सरकारात जमा केल्या (१९३२). शिवाय त्या गरीब शेतकऱ्यांनाही वाटण्यात आल्या नाहीत. तेव्हा तेही असंतुष्ट होते. हा असंतोष भडकला तेव्हा नोव्हेंबर १९३३ मध्ये निवडणुका होऊन सरकार समर्थकांच्या डाव्या गटास ४९३ पैकी ९९, तर जमीनदार व धर्मगुरू यांच्या उजव्या गटास २०७ जागा मिळाल्या व मध्यम वर्गीयांना १८७ जागा मिळाल्या. नव्या मंत्रिमंडळाचा नेता आलेकांद्रो लेर्र् गार्देआ व त्याच्या पाठीराख्यांनी पूर्वीच्या शासनाचे अनेक उदारमतवादी कायदे रद्द केले. जमीनदार, धर्मगुरू व धनिक यांच्या हक्कांचे संरक्षण व शासनावर कडक नियंत्रण ठेवणे हे या पक्षाचे ध्येय होते. यातून फॅसिस्ट प्रवृत्ती फोफावली व जर्मनी-इटली यांनी त्यास प्रोत्साहन दिले. तेव्हा १९३४ मध्ये बार्सेलोना, माद्रिद, व्हॅलेंशिया या स्पेनमधील औद्योगिक शहरांतील डाव्या गटाच्या कामगार संघटनांनी संप केला. लष्कराकडून तो मोडण्याचा प्रयत्न झाला. त्यात वित्त व प्राणहानी झाली. एकूणच देशात अराजक माजले. पुन्हा विधिमंडळासाठी १६ फेब्रुवारी १९३६ मध्ये निवडणुका झाल्या. त्यात समाजवादी, साम्यवादी व उदारमतवादी या डाव्या गटांनी २५८ जागा जिंकून यश मिळविले आणि डाव्या आघाडीचा मानवेल आथॉन्याई राष्ट्राध्यक्ष झाला पण त्याच्या धर्मविरोधी कारवायांमुळे विधिमंडळाने त्यास पदभ्रष्ट केले. राजसत्तेवर निष्ठा नसणाऱ्या लष्करी अधिकाऱ्यांना सक्तीने निवृत्त केले. तसेच राजसत्तेस पाठिंबा देणाऱ्या सनदी अधिकाऱ्यांची बदली दूरवरच्या स्पॅनिश वसाहतींत केली. यांपैकी राजनिष्ठ व फॅसिस्टांचा पाठिंबा असलेला लष्करी नेता जनरल फ्रॅन्सिस्को फ्रँको यास मोरोक्को वसाहतीत पाठविले. तेव्हा लष्कराने क्रांतीचा मार्ग अवलंबिला. त्यांना जमीनदार, मध्यममार्गी, धर्मगुरू अशा प्रतिगाम्यांनी पाठिंबा दिला. त्यांना इटली--जर्मनीतील नेत्यांनी उत्तेजन दिले. त्यामुळे नोव्हेंबर १९३६ मध्ये राज्यक्रांती करण्याचा कट शिजला दरम्यान उजव्या गटाने डाव्या गटाचा नेता लेफ्टनंट कॅस्टिलो याचा खून केला. त्याचा बदला म्हणून डाव्या गटाच्या लोकांनी उजव्या गटाचा नेता काल्व्हो सोतेलोसला ठार मारले. या आकस्मिक घटनांमुळे अगोदर सुरू झालेल्या अंतर्गत यादवीला चालना मिळाली. हे स्पॅनिश यादवी युद्ध दोन वर्षे नऊ महिने चालले. मोरोक्कोत कार्यरत असलेल्या जनरल फ्रँकोने १७ जुलै १९३६ रोजी बंडाचा झेंडा फडकाविला. त्याने ससैन्य स्पेनमध्ये प्रवेश करून एकामागून एक गावे पादाक्रांत केली. तेथील लष्कराने त्यास साथ दिली व त्यास प्रमुख नेमले. त्याने बूर्गास येथे प्रतिसरकार स्थापन केले.  

स्पेनमधील या संघर्षाच्या प्रारंभी अन्य राष्ट्रांनी तटस्थतेचे धोरण स्वीकारले. राष्ट्रसंघाने कोणत्याही पक्षाला बाहेरून मदत मिळू नये म्हणून सीमेवर गस्त घालणारे स्वतंत्र पथकही उभारले पण लवकरच इटली व जर्मनीने फ्रँकोला सर्व प्रकारचे साहाय्य देऊ केले. पोपने व दक्षिण अमेरिकेतल्या अनेक देशांनी फ्रँकोच्या सरकारबद्दल सहानुभूती व्यक्त केली. रशियाने स्पेनमधील प्रस्थापित शासनाची बाजू घेतली व रशियन तज्ञांचे मार्गदर्शन स्पेनला मिळू लागले. तत्कालीन राष्ट्राध्यक्ष आथॉन्याई याने कामगारांचे सैन्य उभारले. त्याच्या नेतृत्वाखालील प्रजासत्ताक शासनाने बार्सेलोना, माद्रिद अशी मोठी शहरे व औद्योगिक वसाहती आपल्या ताब्यात ठेवल्या. त्यांच्याकडे हवाई दल व रणगाडे होते. आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दलातून ( ब्रिगेड ) देशोदेशींचे ध्येयनिष्ठ तरुण फ्रँकोच्या फॅसिस्ट लष्कराविरुद्ध लढले व स्पेनमधील या यादवी युद्धाला दुसऱ्या महायुद्धाच्या रंगीत तालमीचे स्वरूप प्राप्त झाले. जर्मनी-इटलीच्या मदतीमुळे फ्रँकोचे सामर्थ्य वाढले. फेब्रुवारी १९३९ मध्ये राष्ट्राध्यक्ष मानवेल आथॉन्याई याने पदत्याग केला व फ्रँकोच्या शासनाला इंग्लंड--फ्रान्स इ. देशांची मान्यता मिळून स्पेनमधील यादवी युद्ध समाप्त झाले.या युद्धात सुमारे ६ — ८ लाख लोक ठार झाले पाच लक्ष परागंदा किंवा बेपत्ता झाले दोन लक्ष फ्रँकोच्या तुरुंगात डांबले गेले अनेक शहरे व खेडी उद्ध्वस्त झाली उद्योगधंदे बसले शेतीची अपरिमित हानी झाली व सर्व स्पेनभर दारिद्य्राची अवकळा पसरली. 

जनरल फ्रँको सर्वसत्ताधीश व हुकूमशाह बनला. त्याने स्वतःला कॉडिलो ही उपाधी लावून घेतली व मुसोलिनी — हिटलर सदृश राजवट स्पेनमध्ये स्थापन केली. सर्व राजकीय पक्षांना बेकायदेशीर ठरवून त्यांना आपल्या फॅलेन्ज पक्षात सामील होण्याचा आदेश काढला. पुढे तो युद्धमंत्री झाला. जर्मनी, इटली, पोर्तुगाल या तत्कालीन हुकूमशाही राजवटींनी त्याला पाठिंबा दिला. 

दुसऱ्या महायुद्धात स्पेन तटस्थ राहिला पण त्याने या दोन्ही फॅसिस्ट राष्ट्रांना विविध प्रकारे मदत केली. त्यामुळे देशांतर्गत उत्पादनाला गती मिळाली. काही अटींवर युद्ध पुकारून जिब्राल्टरवर स्वारी करण्याची तयारीही त्याने दाखविली. त्याच्या तटस्थतेच्या निर्णयामुळे दोस्त राष्ट्रांच्या उत्तर आफ्रिकेवरील स्वारीतील योजना निर्धास्तपणे कार्यान्वित झाल्या.  

 

दुसऱ्या महायुद्धानंतर स्पेनमधील हुकूमशाही संपुष्टात येईल अशी अपेक्षा होती पण प्रत्यक्षात स्पेनच्या जनतेच्या हक्कांचा जाहीरनामा काढण्याव्यतिरिक्त फ्रँकोने काहीच केले नाही. युद्धोत्तर काळातील शीत- युद्धाने परिस्थिती बदलली. फ्रँकोला आर्थिक मदतीचे आश्वासन देऊन अमेरिकेने स्पेनमध्ये तीन हवाई तळ व एक आरमारी तळ उभारण्याची परवानगी मिळविली व अमेरिकेच्या पाठिंब्याने स्पेनला संयुक्त राष्ट्र संघटनेचे सभासदत्वही मिळाले. इंग्लंड-अमेरिकेने स्पेनला तांबे व टंगस्टन धातूच्या मोबदल्यात अन्नधान्य, पेट्रोलियम, कापूस इ. वस्तू पुरविल्या. 

या घडामोडीमुळे स्पेनचे उद्योगधंदे व व्यापार यांत प्रगती झाली. फ्रँकोने आपल्या हुकूमशाही धोरणाला मुरड घातली आणि लष्करी न्यायालये रद्द करून, कामगारांना संपाचा हक्क दिला. त्याने राजकीय पक्षांवरील बंदी उठविली नसली, तरी विधिमंडळाच्या काही जागा निवडणुकीने भरण्याची तरतूद केली  (१९६०).

स्पेनचे आधुनिकीकरण करण्यासाठी फ्रँकोने कृषी व औद्योगिक धोरणांत विधायक सुधारणा केल्या. पर्यटन व्यवसायास उत्तेजन देऊन आर्थिक मदत जाहीर केली. त्याने स्पेनला १९६० — ७० च्या दशकात आर्थिक दृष्ट्या सक्षम केले. आपल्या पश्चात स्पेनमध्ये राजेशाही पुनर्स्थापित व्हावी, अशी त्याची इच्छा होती. म्हणून त्याने तेराव्या अल्फॉन्सोचा नातू त्वान कार्लोस राजपदावर यावा अशी अखेरची इच्छा व्यक्त केली (१९६९). त्याच्या मृत्यूनंतर (१९७५) त्याच्या अपेक्षेनुसार त्वान कार्लोस स्पेनमध्ये गादीवर आला.

फ्रँकोने काळाची पावले ओळखून स्पेनमध्ये सर्वपक्षीय लोकशाही शासनव्यवस्था स्थापन करण्याची घोषणा केली. १९७७ मध्ये मुक्त वातावरणात निवडणुका झाल्या आणि युनियन ऑफ द डेमॉक्रटिक सेंटर ( युडीसी ) पक्षाने बहुमत मिळवून त्याचा नेता सूएरेझ  पंतप्रधान झाला. १९७८ मध्ये मतदारांनी नवीन संविधान मान्य केले व पुन्हा निवडणुका घेण्यात आल्या. यामध्ये युडीसी पक्षाने बहुमत मिळविले (१९८१), तेव्हा राजाने लिओपोल्ट काल्व्हो सोतेलो याची पंतप्रधानपदी निवड केली. त्यानंतर प्रादेशिक स्थानिक स्वराज्य संस्थांकडे सत्ता सुपूर्त करण्याची प्रक्रिया सुरू झाली. बास्क आणि कॅटॅलोनिया प्रांतांनी प्रादेशिक संसद प्रस्थापिली, त्याचप्रमाणे इतर प्रांतांतही स्वतंत्र संसद स्थापन झाली. १९८२ मध्ये स्पॅनिश सोशॅलिस्ट वर्कर्स पार्टी या पक्षाने अनेक जागा जिंकून त्यांचा नेता फिलिप गॉन्थालेथ पंतप्रधान झाला. स्पेनमध्ये १९३९ नंतर पुन्हा डाव्या आघाडीचे शासन सत्तारूढ झाले आणि गॉन्थालेथची अनुक्रमे १९८६, १९८९ आणि १९९३ मध्ये फेरनिवड झाली. त्यानंतर १९९६ व २००० मध्ये सेंटर-राइट पॉप्युलर पार्टीला स्पेनच्या संसदेत बहुमत मिळून त्यांचा नेता होसे मारिया अझनार पंतप्रधान झाला. या काळात स्पेनची लक्षणीय आर्थिक प्रगती झाली. २००४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत डाव्या आघाडीचे शासन येऊन त्यांचा नेता होशे लूइस रोद्रीगो झापॅतेरो पंतप्रधान झाला. त्याने सामाजिक कल्याणासाठी एक योजना कार्यान्वित केली असून लॅटिन अमेरिका, पूर्व यूरोप आणि उत्तर आफ्रिका यांतील निर्वासितांना स्पेनच्या समाजात सामावून घेतले. तसेच शिक्षण व संशोधन यांवर भर दिला. २००६ मध्ये बास्कमधील आतंकवादी संघटनेने शस्त्रसंधी केली पण झापॅतेरो याने ती धुडकावून फ्रेंचांच्या साह्याने त्यांच्या नेत्यांना गजाआड केले कारण निःशस्त्रीकरणाचे वचन त्यांनी पाळले नाही. २००८ च्या सार्वत्रिक निवडणुकीत झापॅतेरोच्या पक्षाला बहुमत मिळाले नाही तथापि त्याचेच अल्पसंख्याक शासन सत्तेवर होते (२०१२). दहशतवाद्यांनी पुन्हा निःशस्त्रीकरणाचे वचन पाळले नाही, तेव्हा पूर्वीचीच परिस्थिती २०११ मध्ये उद्भवली. 

ओक द. ह. देशपांडे, सु. र.


 राज्यव्यवस्था : स्पेनने १९७८ मध्ये नवीन संविधान स्वीकारले. या संविधानानुसार स्पेनमध्ये लोकशाही प्रस्थापित होऊन त्याने संसदीय राजेशाही पद्धत स्वीकारली. त्यामुळे राजा, पंतप्रधान, मंत्रिमंडळ आणि संसद यांत सत्तेचे विभाजन होऊन हे सर्व शासनव्यवस्थेत महत्त्वाचे घटक मानण्यात आले. राजा हा सर्वोच्च शासनप्रमुख असूनही प्रत्यक्ष राज्यकारभारात त्याचा सहभाग नसतो परंतु त्याचा सल्ला धोरणात्मक बाबींत घेण्यात येतो. राजनैतिक वाटाघाटींच्या वेळी व राष्ट्रीय समारंभांच्या प्रसंगी देशाचे प्रतिनिधित्व मुख्यत्वे राजाकडे असते. पहिला त्वान कार्लोस स्पेनच्या गादीवर नोव्हेंबर १९७५ मध्ये स्थानापन्न झाला. स्पेनला हुकूमशाहीतून लोकशाहीत आणण्यासाठी जी प्रक्रिया घडली, त्यात त्याचा महत्त्वाचा सहभाग होता. पंतप्रधान हेच राष्ट्रीय शासनाचे कार्यकारी प्रमुख असतात. ते मंत्र्यांच्या नेमणुका करतात आणि पंतप्रधान व मंत्रिमंडळ दैनंदिन शासकीय व्यवहार पाहतात. संसदेच्या अधिक जागा मिळवून बहुमत प्राप्त केलेल्या पक्षाचा नेता पंतप्रधानपदी निवडला जातो.

स्पेनची संसद कोर्तिस या नावाने परिचित असून ती कायदे करते. कोर्तिस द्विसदनी असून कनिष्ठ सभागृहात ( काँग्रेस ऑफ डेप्युटीज) ३०० — ४०० सभासद असतात, तर वरिष्ठ सभागृहात ( सिनेट ) २६० सभासद असतात. काँग्रेसला सिनेटपेक्षा जास्त अधिकार असून काँग्रेसचे सर्व सभासद लोकनियुक्त असतात. तसेच सिनेटचे बहुसंख्य सभासद लोकनियुक्त असून प्रादेशिक राज्ये (रीजन्स ) एक पंचमांश सिनेटरांची नियुक्ती करतात. दोन्ही सभागृहांची मुदत चार वर्षांची असते. १८ वर्षांवरील सर्व स्त्री-पुरुषांना मतदानाचा हक्क आहे.  

देशाची पन्नास प्रांतांत विभागणी झालेली असून १९७८ च्या संविधाना-नुसार पुन्हा त्यांचे १७ समूह ( रीजन्स ) केले आहेत. त्यांना ऑटॉनॉमस ( स्वयंशासित किंवा स्वायत्त ) कम्युनिटीज म्हणतात. या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबतीत संघराज्यपद्धतीचा अवलंब संविधानाने सूचित केला आहे. प्रत्येक ऑटॉनॉमस कम्युनिटी ही लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींनी बनलेल्या स्वायत्त शासनाची असून त्यांना शिक्षण, सांस्कृतिक कार्यक्रम व अन्य समारंभ यांबाबतीत सर्वाधिकार दिलेले आहेत. या लोकनियुक्त प्रशासनाद्वारे अनेक स्थानिक प्रश्नांची सोडवणूक केली जाते. त्यामुळे राष्ट्रीय आणि प्रादेशिक शासनांत योग्य प्रकारे कामाची विभागणी होते तथापि संरक्षणखाते आणि परराष्ट्रखाते हे पूर्णतः राष्ट्रीय शासनाची कर्तव्ये असून ती पंतप्रधान व मंत्रिमंडळ यांच्या अखत्यारित असतात. नगरे, निमशहरे यांच्या स्थानिक स्वराज्य संस्था असून त्याचे प्रतिनिधीही लोकनियुक्त असतात. बहुमताच्या पक्षाचा नेता महापौर वा नगराध्यक्ष होतो. 

राजकीय पक्ष : स्पेनमध्ये मर्यादित पक्ष असून पार्तिदो पॉप्युलर ( पॉप्युलर फ्रंट ) हा सर्वांत मोठा व मध्यममार्गी विचारधारणेचा पक्ष आहे. याशिवाय पार्तिदो सोशॅलिस्टा ओब्रेरा इस्पॅनोल (  स्पॅनिश सोशॅलिस्ट वर्कर्स पार्टी ) हा पूर्णतः समाजवादी विचारसरणीचा पक्ष आहे आणि इझाक्विएर्दा युनिदा ( युनायटेड लेफ्ट ) हा गट डाव्या विचारांच्या सात पक्षांचा संयुक्त कम्युनिस्ट पक्ष आहे. त्यांमध्ये स्पेनमधील कम्युनिस्ट पक्षाचे प्राबल्य आहे. ईशान्य स्पेनमधील कॅटॅलोनिया प्रांतात तसेच उत्तर मध्यभागातील बास्क रीजनमध्ये त्यांचे तेथील स्थानिक राष्ट्रीय प्रादेशिक पक्ष आहेत. स्पेनमध्ये चार वर्षांकरिता काँग्रेस ऑफ डेप्युटीजच्या प्रतिनिधींची निवड करण्यासाठी २० नोव्हेंबर २०११ रोजी सार्वत्रिक निवडणुका झाल्या. त्यांमध्ये ७१.७% लोकांनी मतदान केले आणि यात ( पॉप्युलर फ्रंट ) या पक्षास सर्वाधिक १८६ जागा मिळाल्या. त्या खालोखाल स्पॅनिश सोशॅलिस्ट वर्कर्स पार्टीस ११० जागा, कॅटॅलियन नॅशनॅलिस्टला १६, कम्युनिस्टांना ११ व इतर पक्षांना २७ जागा मिळाल्या. मार्च २०१२ मध्ये काँग्रेसचा नेता मारीयनो राजोय ब्रे यांची राजाने पंतप्रधानपदी नियुक्ती केली व त्याने आपले उपपंतप्रधानासह मंत्रिमंडळ बनविले. 

न्यायव्यवस्था : येथील न्यायव्यवस्थेला ‘ पॉडर ज्युडीशिअल ’ असे म्हणतात. ती सर्वार्थाने विधानसभा आणि कार्यकारी मंडळ यांपासून स्वतंत्र व स्वायत्त आहे. सामान्य मंडळ ( काँसेजो जनरल ) या संस्थेद्वारे तिची सर्व प्रशासकीय-व्यवस्थापकीय व्यवस्था पाहिली जाते. हे मंडळ देशातील ज्येष्ठ विधिज्ञ आणि न्यायाधीश मिळून बनलेले असते. देशात स्तरनिहाय व विविध प्रकारची न्यायालये असून या सर्वांवर सर्वोच्च न्यायालय आहे मात्र त्यास संवैधानिक कायद्यांत बदल करण्याचा अधिकार नाही. तत्संबंधीच्या प्रश्नांचा ऊहापोह करण्यासाठी स्वतंत्र घटनात्मक न्यायालयांना अधिकार प्रदान केला आहे. याशिवाय देशात प्रांतीय, प्रादेशिक, स्थानिक आणि लष्करी न्यायालये आहेत. प्रत्येक प्रांतात उच्च न्यायालय असून त्यास ‘ ऑदेंशिया ’ म्हणतात. या न्यायालयांतून फक्त न्यायिक कामकाज चालते परंतु ते शिक्षा फर्मावू शकत नाहीत. यांव्यतिरिक्त दंड करणारी न्यायालये तसेच म्युनिसिपल न्यायालये आहेत. 

लोकांच्या तक्रारी ऐकून घेण्यासाठी ओंबुड्झमन ( लोकपाल ) हे पद १९८१ मधील कायद्याने निर्माण करण्यात आले. लोकपाल हा लोकांचे हक्क आणि तत्संबंधीच्या उल्लंघनाच्या बाबी संसदेस कळवितो. तसेच तो सर्व शासकीय कार्यालयांतील कृतींवर लक्ष ठेवून त्यांचा अहवाल शासनास सादर करतो. 

संरक्षण व्यवस्था : स्पेनचे लष्कर भूदल, नौदल आणि हवाई दल या तीन भागात विभागले आहे. डिसेंबर २००२ पर्यंत प्रत्येक नागरिकास लष्करी सेवा अनिवार्य होती. सक्तीची सैनिकी सेवा काही काळ नागरिकास करावी लागे तथापि ती २००० मध्ये रद्द करण्यात आली. तरीसुद्धा तिची प्रत्यक्ष कार्यवाही २००३ मध्ये पूर्ण झाली. १९८९ नंतर लष्करातील सर्व विभागांत स्त्रियांना प्रवेश देण्याचा कायदा झाला. नोव्हेंबर २०११ मध्ये देशाचे एकूण सैन्यबळ १,४२,८०६ होते. त्यांपैकी भूदल ७८,१२१ नौदल २२,२०० ( यात ५,३०० नाविक ताफ्यांचा समावेश आहे ) आणि हवाई दल २१,१७२ असून यांव्यतिरिक्त २१,३१३ हे संयुक्त दल होते. निमलष्करी दल ( सिव्हिल गार्ड ) ७९,९५० सैनिकांचे होते. स्पेन १९८२ मध्ये नाटोचा सदस्य बनला आणि १९९७ मध्ये त्याने नाटोच्या लष्करात सक्रिय भाग घेतला. नोव्हेंबर २०११ मध्ये अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचे १,४८३ सैनिक स्पेनमध्ये होते. स्पेन हा युरोपियन युनियनचाही सभासद असून (२००४) आणीबाणीच्या प्रसंगी तो लष्करी सहकार्यास तत्पर असतो. इटलीच्या नेतृत्वाखालील स्पॅनिश-इटालियन जलस्थलवासी युद्ध समूहात स्पेन सहभागी झाला होता.

आर्थिक स्थिती : स्पेनमध्ये नैसर्गिक संसाधने मर्यादित आहेत. अठराव्या शतकाच्या अखेरीस स्पेनने आपल्या औद्योगिकीकरणास सुरुवात केली. एकोणिसाव्या शतकात औद्योगिकीकरण व आर्थिक विकासाची प्रक्रिया तशीच चालू राहिली परंतु विकासाची ही प्रक्रिया देशाच्या काही भागापुरतीच मर्यादित राहिली. वस्त्रोद्योगाचा विकास कॅटॅलोनिया प्रदेशापुरता, तर लोह-पोलाद उद्योग बास्क प्रदेशापुरताच मर्यादित राहिला. इतर प्रमुख पश्चिम यूरोपीय देशांच्या तुलनेत स्पेनची सर्वसाधारण आर्थिक विकासाची गती कमीच होती. त्यामुळे विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात ग्रेट ब्रिटन, जर्मनी, फ्रान्स व इटली या देशांच्या तुलनेत स्पेन गरीब व अर्धविकसित देश होता. स्पॅनिश नागरी युद्धामुळे (१९३६ — ३९) स्पेन आर्थिक दृष्ट्या आणखी मागे पडला. युद्धोत्तर सु. २० वर्षांनंतर स्पेनने राष्ट्रीय आर्थिक स्वावलंबनाचे धोरण स्वीकारले. दुसऱ्या महायुद्धापूर्वी हे धोरण जर्मनी व इटली या फॅसिस्ट देशांचे होते. या धोरणामुळे सर्वच क्षेत्रांत शासनाचा हस्तक्षेप वाढला. १९४१ मध्ये राष्ट्रीय औद्योगिक संस्थेची स्थापना करण्यात आली. त्यानुसार संरक्षण संबंधित उद्योगांची तसेच खाजगी क्षेत्रांकडून दुर्लक्षित राहिलेल्या उद्योगांच्या विकासास चालना दिली गेली. फॅसिस्ट शासनामुळे मार्शल योजनेनुसार संयुक्त संस्थाने तसेच वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय संघटनांकडून मिळू शकणाऱ्या आर्थिक मदती-पासून स्पेन वंचित राहिला. स्पेनचे आर्थिक स्वावलंबनाचे हे धोरण पूर्णपणे अपयशी ठरले. १९५० च्या दशकाच्या अखेरीस स्पेनची अर्थव्यवस्था ढासळली. अशा बिकट परिस्थितीमुळे आर्थिक धोरणात महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले. त्यादृष्टीने १९५९ मध्ये ‘ आर्थिक स्थिरीकरण योजने ’ची घोषणा करण्यात आली. त्याअंतर्गत ‘ स्पॅनिश इकॉनॉमिक मिरॅकल ’ या नावाने ओळखला गेलेला वेगवान आर्थिक प्रगतीविषयक कालबद्ध कार्यक्रम निश्चित करण्यात आला. १९६० — ७४ या कालावधीत वार्षिक सरासरी ६.६% या वेगाने स्पेनचा आर्थिक विकास घडून आला. त्याकाळात जपान वगळता जगातील इतर कोणत्याही देशाच्या विकास दरापेक्षा हा विकास दर जास्त असल्याचे मानले जाते. आधुनिक औद्योगिक राष्ट्र म्हणून स्पेनने आपला दर्जा सिद्ध केला. त्यामुळे यूरोपच्या अर्थ- व्यवस्थेतील स्पेनची भूमिका महत्त्वपूर्ण ठरली. या कालावधीत स्पेनने वस्तुनिर्मिती व सेवा व्यवसायांत तिपटीपेक्षा अधिक प्रगती घडवून आणली परंतु अर्थव्यवस्थेतील प्रमुख क्षेत्र असलेल्या कृषिक्षेत्रात गुंतलेल्या लोकांचे प्रमाण प्रचंड प्रमाणात घटून हे क्षेत्र बरेच मागे पडले. १९८० च्या दशकात  स्पेनची अर्थव्यवस्था बरीच खालावली होती परंतु त्यानंतर १९९० च्या दशकात शासनाच्या जाणीवपूर्वक प्रयत्नांमुळे अर्थ-व्यवस्था बऱ्यापैकी स्थिरावली. यामध्ये सेवाक्षेत्राचा वेगाने विस्तार होऊन बेकारीचे प्रमाण घटले. सार्वजनिक उद्योगांचे खाजगीकरण करण्यात आले. अंदाजपत्रकातील तूट कमी होऊन चलनवाढ घटली. १९५० मध्ये देशातील एकूण कामकरी लोकांपैकी निम्मे लोक शेती, अरण्योद्योग व मत्स्योद्योगात गुंतलेले होते. २०१० मध्ये एकूण कामकरी लोकांपैकी ७२.६% लोक सेवा व्यवसायांत, २३.१% उद्योगांत आणि ४.३% लोक कृषिव्यवसायांत गुंतलेले होते. देशाच्या एकूण स्थूल राष्ट्रीय उत्पादनापैकी ६९% सेवाक्षेत्रांतून, २८.४% उद्योगांतून ( कारखानदारी, खाणकाम, ऊर्जा व बांधकाम क्षेत्रासह ) आणि २.६% उत्पादन कृषी क्षेत्रांतून ( अरण्यो- द्योग व मत्स्योद्योगासह ) मिळाले होते (२००७). स्पेनच्या या आश्चर्यकारक विकासाला पुढील प्रमुख तीन घटक कारणीभूत ठरले : (१) स्पेनमध्ये मोठ्या प्रमाणावर झालेली परकीय गुंतवणूक, (२) प्रचंड प्रमाणात वाढलेला पर्यटन व्यवसाय व (३) १९५९ — ७४ या कालावधीत प्रचंड संख्येने परदेशी गेलेल्या व्यक्तींनी मोठ्या प्रमाणावर स्वदेशी पाठविलेला पैसा. अशा उत्प्रवासींनी १९७३ या केवळ एकाच वर्षात एक महापद्म डॉलर मायदेशी पाठविले होते.  

कृषी : अनेक वर्षांपासून शेती हा येथील प्रमुख व्यवसाय आहे. निकस मृदा, मर्यादित पर्जन्य व कोरडे हवामान यांमुळे बऱ्याचशा प्रदेशातून पीक घेणे जिकिरीचे व आव्हानात्मक ठरते. देशातील सु. निम्मी भूमी शेतीखाली असून तिचा उपयोग पिकांच्या लागवडीसाठी किंवा कुरणांसाठी केला जातो. सुमारे दोन तृतीयांश शेतकऱ्यांकडे स्वमालकीची जमीन असून उर्वरित लोक मोठ्या शेतांवर शेतमजूर किंवा खंडकरी म्हणून काम करतात. १९६० च्या दशकापासून शेतीचे अर्थव्यवस्थेतील महत्त्व कमी होऊन ग्रामीण लोकसंख्याही घटली. पश्चिम यूरोपीय देशांतील कृषीच्या तुलनेत स्पेनमधील कृषिव्यवसाय बराचसा मागासलेल्या अवस्थेत गेला. बहुतांश शेतकऱ्यांची कृषी जमीनधारण क्षमता १० हेक्टरांपेक्षा कमी आहे. १९८६ मध्ये यूरोपियन समुदायात स्पेन सामील झाला तेव्हापासून येथील कृषिव्यवसायाला चालना मिळाली. अलिकडील दशकांत जलसिंचन सुविधांचा विस्तार आणि पडीक जमिनीचे रूपांतरण यांमुळे कृषिउत्पादक क्षेत्रात वाढ झाली आहे. स्पेनमध्ये तृणधान्ये ( बार्ली, गहू, तांदूळ, मका इ. ), कडधान्ये, संत्री व इतर लिंबूवर्गीय फळे, ऑलिव्ह, साखरबीट, भाजीपाला, द्राक्षे, सप्ताळू , नासपती, स्ट्रॉबेरी, सफरचंद, सूर्यफूल, कांदा, बटाटा, टोमॅटो, कापूस, तंबाखू , बदाम, जरदाळू , केळी अशी विविध प्रकारची कृषिउत्पादने घेतली जातात. वाइन निर्मितीच्या दृष्टीने येथील द्राक्ष उत्पादन महत्त्वाचे आहे. वाइन निर्मितीत फ्रान्स व इटलीनंतर स्पेनचा तिसरा क्रमांक लागतो. शेरी ( पांढरी स्पॅनिश दारू ) उत्पादनही स्पेनमध्ये महत्त्वाचे आहे. कानेरी बेटे केळी उत्पादनासाठी महत्त्वाची आहेत.  २०१० मध्ये पुढीलप्रमाणे कृषिउत्पादने झाली ( उत्पादन हजार मे. टन ) : बार्ली ८,१५७, गहू ५,६११, साखरबीट ३,३९९, बटाटा २,२७८, मका ३,१७९, टोमॅटो ४,३१३, कांदा १,१०७, मिरी व मिरची ८७२, ओट १,०१८, ऑलिव्ह ८,०१४, सूर्यफूल ८८७, संत्री ३,२२०, द्राक्ष ६,१०७, कलिंगड ७८२, सफरचंद ५९६.


स्पेनचा बराचसा प्रदेश शुष्क किंवा निम-शुष्क असल्यामुळे मेंढ्या मोठ्या संख्येने पाळल्या जातात. वराहपालन व वराहमांस उत्पादनही महत्त्वाचे आहे. देशातील पशुधन व प्राणिज उत्पादने पुढीलप्रमाणे होती. पशुधन ( संख्या हजारात ) : गुरे ६,०७५, मेंढ्या १८,५५२, शेळ्या २,९३४, डुकरे २५,३४३, गाढवे १४२, खेचरे ११०, कोंबड्या १,३८,०००. प्राणिज उत्पादने ( उत्पादन हजार मे. टनांत ) : गोमांस ६०७ शेळ्या-मेंढ्यांचे मांस १४० वराहमांस ३,३६९ कोंबड्यांचे मांस १,११६ गाईचे दूध ६,३५७ शेळ्या-मेंढ्यांचे दूध १,१८७ अंडी ८४० (२०१०).

स्पेन हा यूरोपातील मासेमारी व्यवसायातील अग्रेसर देशांपैकी एक आहे. स्पॅनिश मासेमारी जहाजांचा समावेश जगातील सर्वांत मोठ्या जहाजांमध्ये होतो. येथे प्रामुख्याने सागरी मासेमारी महत्त्वाची असून २००९ मध्ये एकूण ११,७१,४०० मे. टन मत्स्योत्पादन झाले. देशाला लाभलेल्या सागरी प्रदेशाबरोबरच पॅसिफिक व हिंदी महासागरातही स्पेनची जहाजे मासेमारीसाठी जातात. वायव्य किनाऱ्यावरील व्हीगो व ला कोरूना ही प्रमुख मासेमारी बंदरे आहेत. मासे हा स्पॅनिशांच्या आहारातील प्रमुख घटक असून मत्स्योत्पादनांची आयातही केली जाते.  

स्पेनच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या ३५.९% क्षेत्र वनांखाली होते (२००५). २०१० मध्ये लाकडी ओंडक्यांचे उत्पादन १,५६,४८,००० घ. मी. व कापीव लाकडांचे उत्पादन २०,३८,००० घ. मी. झाले. 

देशातील एकूण स्थूल राष्ट्रीय उत्पादनापैकी खाणकाम व ऊर्जानिर्मिती क्षेत्रातून ३.५% उत्पादन मिळत असून या क्षेत्रात एकूण कामकरी लोकांपैकी १.३% लोक गुंतले होते (२०११). देशात खनिज संसाधने मर्यादित आहेत. एकेकाळी स्पेन हा खनिजांची निर्यात करणारा देश होता परंतु आज मागणीच्या तुलनेत उत्पादन कमी पडू लागल्याने त्यांची आयात करावी लागते. दगडी कोळसा, लोहखनिज, तांबे, शिसे, जस्त, टंगस्टन, युरेनियम, पारा यांचे साठे देशात आहेत. २००९ मध्ये प्रमुख खनिजांचे उत्पादन पुढीलप्रमाणे झाले ( उत्पादन ००० मे. टन ) : दगडी कोळसा ६,९५२, तांबे १०, केओलिन ३००, अशोधित पोटॅश क्षार ४३५, डोलोमाइट १५,०००, जिप्सम १५,०००, फ्ल्युओराइट १२२, सिपीओलाइट ७७०, त्याशिवाय खनिज तेलाचे २,५०,००० पिंपे व नैसर्गिक वायूचे ३३० द. ल. घ. मी. इतके उत्पादन झाले. पूर्वी येथे भरपूर कोळसा साठे होते परंतु आज कोळसा उत्पादन घटले आहे. खनिज तेलाचे उत्पादनही मर्यादित आहे. त्यामुळे दगडी कोळसा व खनिज तेल या दोन्हींची हा देश आयात करतो. देशातील औष्णिक वीज केंद्रे कोळसा क्षेत्रांजवळ किंवा खनिज तेल आयात करणाऱ्या बंदरांजवळ उभारण्यात आली आहेत. अलिकडे सौरऊर्जा, पवनऊर्जा यांसारख्या पर्यायी ऊर्जासाधनांचा विकास केला जात आहे. देशातील एकूण विद्युत्शक्ती उत्पादन ३०३.३ महापद्म किवॉ. तास असून त्यापैकी ६२.४% औष्णिक ऊर्जा, १८.२% अणुऊर्जा, १०.२% जलविद्युत्शक्ती व ९.२% भूऔष्णिक ऊर्जा निर्माण झाली (२००७).

उद्योग : स्पेनमध्ये कच्च्या मालाचा तुटवडा आहे. औद्योगिकी-करणाच्या सुरुवातीच्या काळात बहुतांश उद्योग लघुउद्योग स्वरूपातच होते. १९६० च्या दशकात उदारमतवादी धोरण स्वीकारल्यामुळे परदेशी गुंत-वणूकदारांनी मोठ्या उद्योगांची भर घातली. उद्योगांमध्ये बरीच विविधता आली. मोटार उद्योग विकासामुळे १९८० च्या दशकाच्या अखेरीस देशात असलेल्या फोर्ड, रेनॉल्ट, जनरल मोटर्स, फोक्सव्हागन या मोटारकंपन्या १.५ द. ल. मोटारगाड्यांची निर्मिती करीत होत्या. १९९० च्या दशकात दूरसंदेशवहनावरील नियंत्रणे उठविल्यामुळे पायाभूत सुविधांचा वेगाने विस्तार झाला. स्पॅनिश कंपन्यांचे आयात तंत्रज्ञानावरील परंपरागत अवलंबित्व कमी करून आपल्या स्वतःच्या संशोधनासाठी व विकासासाठी शासनाने अंदाजपत्रकात जास्तीची आर्थिक तरतूद केली. स्वदेशी उद्योगांना प्रोत्साहन देण्याचे हे धोरण स्पॅनिश शासनाने अवलंबिले.

स्पेनच्या वायव्य भागातील अस्ट्युरीअस व बास्क प्रदेशात पूर्वीपासून लोह, पोलाद व जहाजबांधणी हे अवजड उद्योग केंद्रित होते परंतु १९७० च्या दशकात कालबाह्य तंत्रज्ञान व वाढता ऊर्जा खर्च यांमुळे त्यांचे महत्त्व कमी होऊ लागले. कॅटॅलोनिया व व्हॅलेंशिया प्रदेशातील सुती व लोकरी कापड आणि पादत्राणांचे उत्पादन महत्त्वाचे आहे. माद्रिद, कॅटॅलोनिया व बास्क प्रदेशाने धातुकर्म, भांडवली वस्तू व रसायन उद्योगातील आपले वर्चस्व कायम राखले आहे. नव्हार, ला रीओहा, ॲरागॉन व व्हॅलेंशिया या प्रदेशांत नव्याने विविध उद्योगधंद्यांचा विस्तार झालेला आहे. इतर प्रमुख उद्योगांमध्ये रसायने, खेळणी, विद्युत् उपकरणे, फर्निचर इ. निर्मिती, बांधकाम, अन्नप्रक्रिया या उद्योगांचा समावेश होतो.

वित्त : यूरो हे स्पेनचे अधिकृत चलन म्हणून १ जानेवारी १९९९ पासून स्वीकारण्यात आले. १०० सेंटचा एक यूरो होतो. बँक ऑफ स्पेन ही स्पेनची मध्यवर्ती बँक आहे. स्पेन ही यूरोपियन सेंट्रल बँकेची सदस्य असून स्पेनची ही बँक यूरोपियन मौद्रिक धोरण राबविते. तसेच देशातील खाजगी बँकांवर ती देखरेख करीत असते. देशात अनेक छोट्या खाजगी बँका व काही मोठ्या वित्तसंस्था आहेत. बँको दे सांतादेर सेंट्रल एस्पाना आणि बँको बिल्बाओ व्हिस्काय अर्जेंटॅरिआ हे दोन महत्त्वाचे बँक समूह आहेत. येथील बचत बँका (काजस दे अहोरोस) विशेष महत्त्वाच्या असून त्यांत देशातील सु. दोन पंचमांशपेक्षा अधिक बचत ठेवी आहेत. त्यांच्यातून मिळालेल्या उत्पन्नाचा काही भाग देशांतर्गत कल्याणकारी योजना, सांस्कृतिक व शैक्षणिक प्रकल्पांसाठी खर्च केला जातो.

व्यापार : स्पेनचा विदेशी व्यापार १९८०च्या दशकात वेगाने वाढला. सर्वाधिक व्यापार यूरोपीय समूहांतर्गत चालतो. फ्रान्स व जर्मनीशी होणाऱ्या व्यापाराचे प्रमाण अधिक असून त्यांशिवाय अमेरिकेची संयुक्त संस्थाने, ग्रेट ब्रिटन, इटली, पोर्तुगाल, नेदर्लंड्स, मेक्सिको, जपान या देशांशी व्यापार चालतो. विसाव्या शतकाच्या मध्यात प्रामुख्याने कृषी उत्पादने, खनिजे व औद्योगिक उत्पादनांची निर्यात केली जाई. १९८० च्या दशकाअखेरीस प्रमुख आयात कच्च्या खनिज तेलाची होती. त्याशिवाय वाहतुकीची साधने व सुटे भाग, संगणक, कॉफी या इतर आयात वस्तू होत्या. निर्यात मालामध्ये मोटारगाड्या, दुचाकी वाहने, ताजी फळे, भाजीपाला, रसायने, खनिज तेल उत्पादने, पादत्राणे, लोह व पोलादाच्या लगडी, अल्कोहॉल, मद्ये, मोती इ.चा समावेश होता. स्पेनचे एकूण आयातमूल्य ४,१७,०४९ द. ल. व निर्यातमूल्य २,७७,६९५ द. ल. अमेरिकी डॉलर होते (२००८). देशात माद्रिद, बिल्बाओ, बार्सेलोना व व्हॅलेंशिया असे चार रोखे बाजार आहेत. आर्थिक संकटात सापडलेल्या स्पेनने २००० साला-पासून आपल्या मालकीचा सोन्याचा साठा जवळपास निम्म्याने कमी केला. तेव्हापासून स्पेनने ४६% सोन्याची विक्री केलेली आहे परंतु स्पेनने हे टप्प्याटप्प्याने केले. त्यामुळे जागतिक सुवर्ण बाजारावर त्याचा तितकासा परिणाम जाणवला नाही.

पर्यटन : स्पेनच्या अर्थव्यवस्थेत पर्यटन व्यवसायाला महत्त्वाचे स्थान आहे. भूमध्य समुद्र किनाऱ्यावरील उत्तम पुळणी, विश्रामगृहे, प्रेक्षणीय ऐतिहासिक, सांस्कृतिक व कलात्मक वास्तू, किल्ले, वैविध्यपूर्ण उत्सव ही पर्यटकांची प्रमुख आकर्षणे आहेत. पर्यटन व्यवसायामुळे देशातील हॉटेले, उपहारगृहे, किरकोळ व्यापार इ. उद्योग विकसित झाले आहेत. स्पॅनिश शासन पर्यटन व्यवसायाला प्रोत्साहन देत असते. त्यादृष्टीने हॉटेल व्यवस्थापक, मार्गदर्शक, स्वयंपाकी यांच्यासाठी प्रशिक्षण संस्था काढल्या आहेत. पर्यटकांना उत्तम प्रतीच्या सेवा दिल्या जाव्यात याबाबतीत शासन दक्ष असते. दरवर्षी असंख्य पर्यटक स्पेनला भेट देतात. त्यांमध्ये फ्रान्स, जर्मनी, इटली, नेदर्लंड्स, पोर्तुगाल व ग्रेट ब्रिटनमधील पर्यटकांचे आधिक्य असते. २००६ मध्ये स्पेनला ५,८१,९०,००० पर्यटकांनी भेट दिली असून त्यापासून देशाला ५१,१२२ द. ल. डॉलरचे उत्पन्न मिळाले. स्पॅनिश लोक आपला रिकामा वेळ बहुतांश घराबाहेर व्यतीत करतात. उन्हाळी सुटीत पुळणी गजबजलेल्या असतात. साप्ताहिक सुटीत बहुतांश शहरी स्पॅनिश लोक मनोरंजनासाठी पुळणींकडे किंवा वनभोजनासाठी ग्रामीण परिसरात जातात.


वाहतूक व संदेशवहन : एकोणिसाव्या शतकात स्पेनमध्ये वाहतूक- सुविधा समाधानकारक नव्हत्या. देशात असलेल्या वेगवेगळ्या पर्वतश्रेण्या हा भूवाहतुकीमधील प्रमुख अडथळा आहे. लोहमार्ग निर्मितीनंतरच येथील आधुनिक रस्त्यांच्या बांधकामास सुरुवात झाली. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात रस्त्यांचा विशेष विकास झाला. स्पेनमधील रस्ते वाहतूक ही अरीय स्वरूपाची असून त्यांचे केंद्रस्थान माद्रिद आहे. रस्त्यांची एकूण लांबी ६,८१,२९८ किमी. असून (२००८) त्यांपैकी १३,०१४ किमी. लांबीचे मोटारमार्ग, १२,८३२ किमी. लांबीचे राष्ट्रीय महामार्ग व १,४०,१६५ किमी. लांबीचे दुय्यम रस्ते होते (२००७). देशात २००७ मध्ये वापरात असणाऱ्या वाहनांची संख्या पुढीलप्रमाणे होती : प्रवासी मोटारगाड्या २,१७,६०,२००, ट्रक व व्हॅन ५१,४०,६००, बसगाड्या व कोच ६१,००० आणि दुचाकी वाहने २३,११,३००· बार्सेलोना ते मातारो हा स्पेनमधील पहिला लोहमार्ग १८४८ मध्ये बांधण्यात आला. त्यानंतर तीन वर्षांनी माद्रिद-आरान्जव्हेथ हा दुसरा लोहमार्ग बांधण्यात आला. स्पॅनिश शासनाने उत्तेजनार्थ अनेक सवलती देऊ केल्या असल्या, तरी देशातील बरेचसे लोहमार्ग परदेशी गुंतवणूकदारांनीच बांधलेले आहेत. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस स्पेनमधील ८०% लोहमार्गांचे नियंत्रण दोन फ्रेंच गुंतवणूकदारांच्या गटांकडे होते. १९४१ मध्ये लोहमार्ग यंत्रणेचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले. देशातील सर्व लोहमार्गांचा ‘नॅशनल नेटवर्क ऑफ स्पॅनिश रेलरोड्स’ मध्ये समावेश करण्यात आला. लोहमार्गांची एकूण लांबी १५,२९३ किमी. असून त्यांपैकी अतिवेगाने धावणाऱ्या रेल्वेसाठीची लोहमार्ग लांबी २,६६५ किमी. असून विद्युतीकरण झालेले लोहमार्ग ८,८१९ किमी. लांबीचे होते (२०१०). माद्रिद, व्हॅलेंशिया, बार्सेलोना, बिल्बाओ, सेव्हील व पाल्मा दे माल्यॉर्का येथे मेट्रोमार्ग आहेत. २००१ मध्ये शासन नियंत्रित आयबेरिया एअरलाइन्स या कंपनीचे खाजगीकरण करण्यात आले. ब्रिटिश एअरवेजशी एक करार करून इंटरनॅशनल एअरलाइन्स ग्रुप ह्या नव्या कंपनीची स्थापना करण्यात आली (२०११). याशिवाय व्हेलिंग एअरलाइन्स, एअर यूरोपा व स्पॅनएअर या इतर हवाईवाहतूक सेवा पुरविणाऱ्या कंपन्या आहेत. देशात ५० विमानतळ होते (२०११). माद्रिद येथील बाराजास हा देशातील सर्वाधिक रहदारीचा विमानतळ असून त्याखालोखाल बार्सेलोना (प्रात देल लॉब्रेगत) व पाल्मा दे माल्यॉर्का या विमानतळांचा क्रम लागतो. देशाला विस्तृत सागर किनारा लाभला असल्यामुळे सागरी वाहतूक महत्त्वाची आहे. जगातील सर्वांत मोठ्या व्यापारी व मासेमारी जहाजांमध्ये स्पेनच्या जहाजांचा समावेश होतो. बिल्बाओ, अल्जेसिरास, तारगोना व बार्सेलोना या प्रमुख बंदरांशिवाय हीहोन, व्हॅलेंशिया, सेऊत, वेल्व्हा, सांताक्रूझ दे तेनेरिक, कार्ताजीना, लास पाल्मास दे ग्रान कानेरीया ही महत्त्वाची बंदरे आहेत. जलवाहतुकीच्या दृष्टीने स्पेनमधील नद्या विशेष उपयुक्त नाहीत.

देशात १६१ दैनिक वृत्तपत्रे प्रकाशित होतात. त्यांपैकी एल् पाइस, एल् मुंदो, ला व्हॅन्गॉरदिआ ही प्रमुख दैनिके आहेत. खेळ, व्यवसाय यासंबंधीची स्वतंत्र वृत्तपत्रे, याशिवाय अनेक साप्ताहिके व मासिके प्रकाशित होत असून त्यांपैकी होला या नियतकालिकामध्ये नामांकित व्यक्तींबद्दलची माहिती असते. स्पेनमध्ये रेडिओ कार्यक्रमांचे प्रसारण १९२० च्या दशकात तर दूरदर्शनचे प्रसारण १९५६ मध्ये सुरू झाले. रेडिओ व दूरदर्शन केंद्रे शासकीय व खाजगी कंपन्यांकडून चालविली जातात. फ्रँको राजवटीत वृत्तपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांवर कडक निर्बंध लादले होते. सुरुवातीच्या काळात हे निर्बंध पुस्तकांवरही होते परंतु १९६० च्या दशकाच्या अखेरीस पुस्तक प्रकाशन त्यातून वगळण्यात आले. १९७८ च्या संविधानानुसार संपूर्ण अभिव्यक्ती स्वातंत्र्य बहाल करण्यात आले. शासनाने १९८९ मध्ये केलेल्या एका कायद्यान्वये खाजगी दूरदर्शन केंद्रे स्थापण्यास परवानगी देण्यात आली. माद्रिद येथील टेलिफोनिका ही जगातील सर्वांत मोठ्या संदेशवहन कंपन्यांपैकी एक आहे.

लोक व समाजजीवन : स्पेनची जी सांप्रत भूमी आहे तेथे सु. एक लाख वर्षांपूर्वीपासून मानवी वस्ती असल्याचे आढळले आहे. यूरोप-आफ्रिका या दोन खंडांदरम्यान यूरोप खंडाच्या नैर्ऋत्य टोकावरील तसेच भूमध्य समुद्र किनाऱ्यावरील स्थानामुळे लाभलेली प्रदेशाची सुगमता यांमुळे प्राचीन काळापासून वेगवेगळ्या प्रदेशांकडून आलेल्या असंख्य लोकांनी आपल्या वसाहती आयबेरियन द्वीपकल्पावर स्थापन केल्या. प्रागैतिहासिक काळात उत्तर आफ्रिका व यूरोपच्या अन्य भागांतून आलेल्या लोकांनी आयबेरियन द्वीपकल्पावर वस्ती केली. सुमारे ५,००० वर्षांपूर्वी स्पेनचा बहुतांश प्रदेश आयबेरियन लोकांनी व्यापला होता. त्यानंतरच्या सु. ४,००० वर्षांच्या काळात वसाहती, व्यापार किंवा आक्रमण या उद्देशांनी आलेल्या विविध लोकांनी या प्रदेशात वस्ती केली. त्यात मुख्यतः फिनिशियन, केल्ट, ग्रीक, कार्थेजिनियन, रोमन, ज्यू, जर्मन तसेच उत्तर आफ्रिकेतील व अरबी मुस्लिम यांचा समावेश होतो. त्यांपैकी यूरोपातून आलेल्या केल्ट लोकांनी स्पेनच्या उत्तर भागात, तर उत्तर आफ्रिकेतून आलेल्या लोकांनी स्पेनमधील भूमध्य समुद्राच्या किनारी भागात वसाहती केल्या. त्यावेळी बास्क लोकांनी व्यापलेला प्रदेश सांप्रत बास्क राज्या-पेक्षा बराच विस्तृत असावा. प्राचीन ग्रीक व फिनिशियन वसाहती पूर्व व दक्षिण किनाऱ्यावर, तर कार्थेजिनियनांच्या मोठ्या वसाहती आग्नेय भागात स्थापन झाल्या होत्या. त्या काळात बाहेरून आलेले लोक या प्रदेशात वास्तव्यास असणाऱ्या वेगवेगळ्या गटांच्या लोकांना आयबेरियन म्हणून संबोधत असत.

येथील समाज विविध गटांच्या मिश्रणातून बनल्यामुळे आयबे-रियनांमध्ये वांशिक व भाषिक भिन्नता होती. त्यामुळे भूमध्य समुद्राच्या पूर्व भागातील पुढारलेल्या प्राचीन संस्कृतींचे आयबेरियन द्वीपकल्प हे आकर्षण होते. इ. स. पू. ८००–५५० या काळात येथील विशेषतः ग्वादलक्विव्हर खोऱ्यातील टार्टेसस राज्य भरभराटिस आले होते. इ. स. पू. २०९ मध्ये रोमनांनी बराचसा स्पेन काबीज केला. पुढे सु. सहा शतके त्यांनी या प्रदेशावर राज्य केले. या प्रदेशात सु. तीन ते पाच लाख ज्यू लोकांचे सु. पंधरा शतके वास्तव्य होते. व्हिसिगॉथांनी येथे स्थापन केलेले राजवंश सु. २५० वर्षे टिकले. मूर लोकांचा येथील काही प्रांतांवर सु. आठ शतके ताबा होता. वांशिक भावना सामान्यपणे फारशा प्रबळ नसल्यामुळे वेगवेगळे गट सातत्याने एकमेकांत मिसळले गेले. येथील मूर स्त्रियांनी मात्र आक्रमण करून आलेल्या मूर पुरुषांबरोबर संबंध ठेवणे नाकारले. मुस्लिम व स्पॅनिशांच्या संकरामुळे पुढील पिढ्यांतील अनेक लोक स्पॅनिश बनले. इ. स. १४९२ मध्ये ज्यू लोकांवर तर १५०२ मध्ये मुस्लिमांवर ख्रिश्चन धर्म स्वीकारण्याची सक्ती करण्यात आली. त्यामुळे ख्रिश्चन धर्माचा स्वीकार किंवा हद्दपारी हे दोनच पर्याय त्यांच्यापुढे होते. हजारो लोकांनी त्यांपैकी धर्मांतराचा पर्याय स्वीकारला. साहजिकच त्या सर्वांना स्पॅनिश लोकांनी आपल्यात सामावून घेतले. देशाच्या एकूण लोकसंख्येत सु. ९४% लोक कॅथलिक पंथीय आहेत. त्याव्यतिरिक्त प्रॉटेस्टंट पंथीय, ज्यू व इस्लाम धर्मीय अल्पसंख्येने आहेत.

उद्योगपर्वापूर्वीच्या काळातील जास्त जन्मदराचा व मृत्युदराचा परंपरागत आकृतिबंध एकोणिसाव्या शतकात तसेच विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळापर्यंत तसाच चालू राहिला होता. इ. स. १९०० नंतर हे दोन्ही दर घटण्यास सुरुवात झाली परंतु स्पॅनिश यादवी युद्धानंतरच्या सुमारे ३० वर्षांच्या कालावधीत ही घट थांबली. या काळात मोठ्या कुटुंबांना प्रोत्साहन देण्याचे धोरण अवलंबिले गेले. विवाहबद्ध होण्याचे प्रमाण विशेषतः स्त्रियांमध्ये वाढले. १९५५–६० या कालावधीत विवाह-बद्ध होणाऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक पातळीवर पोहोचले होते. तुलनेने जन्म- प्रमाणापेक्षा मृत्युमानात अधिक घट झाल्याने लोकसंख्या वाढ वेगाने झाली. १९६० च्या दशकापासून उच्च दर्जाच्या वैद्यकीय सुविधांची उपलब्धता, आर्थिक सुबत्ता आणि उच्च राहणीमान इत्यादींमुळे बालमृत्युमानात बरीच घट झाली. १९८० च्या दशकात जन्मप्रमाण घटल्यामुळे लोकसंख्या वाढीचा वेग कमी झाला. १९९० च्या दशकाच्या सुरुवातीपासून पुढे स्पेनमधील जनसांख्यिकीय संरचना पश्चिम यूरोपातील उद्योगप्रधान देशांमधील संरचनेशी मिळतीजुळती राहिली.

स्पेनच्या ४,७१,२९,७८३ या एकूण लोकसंख्येत २,३१,९६,३८६ पुरुष व २,३९,३३,३९७ स्त्रिया होत्या (२०११). लोकसंख्येची घनता दर चौ. किमी.स ९१ व्यक्ती अशी होती (२०१२). लोकसंख्येचे प्रादेशिक वितरण असमान असून एकूण लोकसंख्येपैकी दोनतृतीयांश लोक किनारी प्रदेशात राहतात. विसाव्या शतकाच्या पहिल्या अर्धशतकात बहुतांश स्पॅनिश ग्रामीण भागात रहात होते. २००५ मध्ये नागरी लोकसंख्येचे प्रमाण ७६·७ टक्केपर्यंत वाढले. माद्रिद, बार्सेलोना, व्हॅलेंशिया, सेव्हिल, सॅरगॉसा, बिल्बाओ, मॅलागा व मर्शीआ ही प्रमुख नागरी केंद्रे आहेत. दरहजारी जन्मदर १०·३, मृत्युदर ८·१, विवाहाचे प्रमाण ३·६ (२०१०), बालमृत्युमान ४ (२००५) व घटस्फोटाचे प्रमाण २·५ होते (२००८).

सुमारे ५ द. ल. स्पॅनिशांनी १८४६–१९३२ या कालावधीत अमेरिकेकडे–विशेषतः दक्षिण अमेरिका खंडाकडे–स्थलांतर केले. अल्जीरिया व फ्रान्समध्ये स्पॅनिशांनी मोठ्या प्रमाणावर स्थलांतर केलेले आहे. दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळात स्थलांतराचा कल बदलला. १९६२–७६ या काळात सु. २ द. ल. स्पॅनिशांनी इतर यूरोपीय देशांकडे स्थलांतर केले. देशाच्या एकूण लोकसंख्येत ८·५% व्यक्ती परदेशी नागरिक असून त्यांत प्रामुख्याने मोरोक्को, एक्वादोर, रूमानिया, कोलंबिया व ग्रेट ब्रिटनमधील लोकांचा समावेश होता (२००५).


सामाजिक सुरक्षा व कल्याण योजनेंतर्गत निवृत्तीवेतन, आजारपण, आरोग्य, सामाजिक सेवा इत्यादींसाठी देशाच्या अंदाजपत्रकात तरतूद असते. स्पेन हा आधुनिक विकसित देश असून लोकांचे राहणीमान उच्च दर्जाचे आहे. लोकांची घरे चांगली, आरामशीर, भरपूर फर्निचर व आधुनिक सोयीसुविधांनी युक्त असतात. लगतच्या इतर यूरोपीय देशांच्या तुलनेत येथील किंमती कमी आहेत. सर्व नागरिकांना समान हक्क देण्यात आले आहेत. अलीकडे स्त्रियांनाही समान अधिकार बहाल करण्यात आले आहेत. एकूण कामकरी लोकांपैकी ३८% स्त्री कामगार होते (२००३). पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांचे वेतन २७ टक्क्यांनी कमी असते. हंगामी किंवा अर्धवेळ नोकऱ्यांत स्त्रियांना पसंती दिली जाते. स्त्रियांचे बेरोजगारीचे प्रमाण पुरुषांच्या तुलनेत दुप्पट आढळते.

स्पॅनिश लोकांच्या आहारात मासे व इतर सागरी अन्नाचे प्रमाण अधिक असते. मांसाहारामध्ये गुरे, मेंढ्या, वराह, कोंबड्या, ससे यांचे मांस असते. देशात मद्य उत्पादन मोठे असून जेवणाबरोबर मोठ्या प्रमाणावर मद्य सेवन केले जाते. देशातील १५–३४ वर्षे वयोगटातील १९·६% व्यक्ती नशेसाठी गांजा व कोकेनचा वापर करीत असल्याचे आढळले असून (२००७-०८) यूरोपमधील कोकेनचा सर्वाधिक वापर करणारा हा देश होता (२००९). कॉफी सेवनही मोठ्या प्रमाणावर केले जाते. युनिसेफच्या अहवालानुसार स्पेनमधील १३·३% मुले दारिद्य्रात रहात होती (२००५).

पश्चिम यूरोपातील इतर देशांप्रमाणे स्पेनमध्येही विवाहबद्ध होणाऱ्यांचे प्रमाण कमी झाले आहे. विवाहाशिवाय स्त्री-पुरुषांनी एकत्र राहण्याचे प्रमाण वाढत असून ही बाब सामान्य बनत आहे. १९७८ मध्ये संततिप्रतिबंधाला कायद्याने मान्यता दिली असून हल्लीची कुटुंबे अतिशय लहान आहेत. बहुतांश जोडप्यांना केवळ एक किंवा क्वचितच दोन अपत्ये असतात. २००४ मधील कायद्याने घटस्फोट मिळण्याची मर्यादा दोन वर्षांवरून दहा महिन्यांपर्यंत कमी करण्यात आली आहे. बहुतांश स्पॅनिशांनी घटस्फोटाच्या सुलभीकरणाचे तसेच गर्भपातास मान्यता देणाऱ्या कायद्याचे समर्थन केले आहे त्यामुळे विवाह आणि कुटुंबसंस्था ह्या संकल्पनाच धोक्यात येतील की काय अशी भीती पुराणमतवाद्यांना वाटते. समलिंगी विवाहाला येथे कायदेशीर मान्यता आहे.

आरोग्य : स्पेनची १९६० च्या दशकापासून झालेली आर्थिक भरभराट आणि शासन पुरस्कृत आरोग्यविषयक सुविधांची उत्तम उपलब्धता यांमुळे स्पॅनिशांचे आरोग्यमान आणि आयुर्मानही चांगले आहे. सरासरी आयुर्मान पुरुषांचे ७५·५ वर्षे, तर स्त्रियांचे ८४ वर्षे आहे (२००७). कायद्याने चिकित्सालये तसेच सार्वजनिक व विशेष रुग्णालयांत सर्व प्रकारच्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध असतात. इतर यूरोपीय देशांच्या तुलनेत येथे प्रति व्यक्ती डॉक्टरांचे प्रमाण अधिक आहे. देशात २,१९,०३१ डॉक्टर, ६३,३३७ औषधनिर्माते, २६,७२५ दंतवैद्य व तोंडाचे विकार तज्ञ आणि २,५५,४४५ पदवीधर परिचारिका होत्या. रुग्णालयांची संख्या ७७० असून त्यांत १,४६,३१० खाटांची उपलब्धता होती (२००९). २००८ मध्ये स्थूल राष्ट्रीय उत्पन्नापैकी ९% खर्च आरोग्यावर करण्यात आला.

शिक्षण : स्पेनचा शिक्षण प्रणालीविषयक कायदा १९९१ मध्ये अंमलात आला. त्या कायद्यानुसार ५ वर्षे वयापर्यंतच्या मुलांना बालशिक्षण किंवा पूर्व प्राथमिक, ६–११ वर्षे वयोगटासाठी प्राथमिक शिक्षण, १२–१५ वयोगटासाठी माध्यमिक शिक्षण आणि त्यानंतर १६-१७ या वयोगटासाठी एक किंवा दोन वर्षांचे व्यवसाय शिक्षण किंवा तंत्रशिक्षण किंवा विद्यापीठीय शिक्षणासाठीच्या प्रवेश परीक्षेची तयारी किंवा कला, क्रीडा इ. विषयांचे विशेष शिक्षण अशा शैक्षणिक पातळ्या निश्चित करण्यात आल्या. प्राथमिक व माध्यमिक शिक्षण सक्तीचे व मोफत असून शिक्षणाची जबाबदारी केंद्रशासन व स्वायत्त प्रांत यांमध्ये विभागण्यात आली आहे. धार्मिक शिक्षण ऐच्छिक असते.

देशातील २०,६१९ पूर्व प्राथमिक विद्यालयांत १८,२२,१४२ विद्यार्थी १४,००५ प्राथमिक विद्यालयांत २७,०२,४१५ विद्यार्थी १,५१४ विशेष शिक्षण विद्यालयांत ३०,६१६ विद्यार्थी व ८,८४३ शिक्षक ७,३८९ माध्यमिक विद्यालयांत (सामान्य) १७,९३,२०५ विद्यार्थी व्यावसायिक माध्यमिक किंवा विशेष शिक्षण आणि विद्यापीठ प्रवेशासाठीचे शिक्षण देणाऱ्या ११,७०७ संस्थांमध्ये ११,८३,८५३ विद्यार्थी होते. शैक्षणिक वर्ष २०१०-११ पासून विद्यापीठीय शिक्षण पदवी, पदव्युत्तर आणि विद्यावाचस्पती (डॉक्टरेट) अशा तीन स्तरांत विभागलेले आहे. देशातील ७६ विद्यापीठांपैकी ५० सार्वजनिक व २६ खाजगी आहेत (२०११). विद्यापीठांतील विद्यार्थी संख्या १४,०४,११५ (२००९-१०) व अधिव्याख्याता संख्या १,०७,९०५ होती (२००७-०८). स्पेनमधील प्रौढ साक्षरतेचे प्रमाण ९९% आहे.

स्पेनमध्ये अनेक जुन्या-नव्या सांस्कृतिक व बौद्धिक अकादमी आणि संस्था आहेत. त्यांपैकी बऱ्याचशा अठराव्या व एकोणिसाव्या शतकातील आहेत. रॉयल स्पॅनिश ॲकॅडेमी ही सर्वांत जुनी व प्रसिद्ध अकादमी आहे. पहिला बूर्‍बाँ राजा पाचवा फिलीप याने पॅरिसमधील फ्रेंच अका-दमीच्या धर्तीवर या ॲकादमीची स्थापना केली आहे. याशिवाय सॅन फेर्नांदो रॉयल ॲकॅडेमी ऑफ फाइन आर्ट्स, रॉयल ॲकॅडेमी ऑफ हिस्टरी, रॉयल नॅशनल अकॅडेमी ऑफ मेडिसीन या उल्लेखनीय संस्था आहेत. काउन्सिल फॉर सायंटिफिक रिसर्च ही मानव्यविद्या व विज्ञानविषयक संशोधन करणारी एक नावाजलेली संशोधन संस्था आहे. फ्रँको राजवटीत इ. स.१९४० मध्ये तिची स्थापना करण्यात आली होती. स्पेनमध्ये अनेक ग्रंथालये व अभिलेखागार आहेत. माद्रिदजवळील एल् एस्कॉरिअल ग्रंथालय व सालामांका विद्यापीठातील ग्रंथालय ही सु. चार शतकांपूर्वीची ग्रंथालये आहेत. माद्रिदमधील नॅशनल लायब्ररी हे एकोणिसाव्या शतकातील प्रमुख ग्रंथालय आहे. देशात राष्ट्रीय, प्रांतीय, प्रादेशिक व स्थानिक स्तरावरील अनेक सार्वजनिक व खाजगी अभिलेखागार आहेत. त्यांपैकी नॅशनल हिस्टॉरिकल आर्काइव्ह (माद्रिद), जनरल आर्काइव्ह ऑफ द सिव्हिल वॉर (सालामांका), जनरल आर्काइव्ह ऑफ सिमॅनकस (स्था. १५४०), रॉयल आर्काइव्ह ऑफ ॲरागॉन ही प्रमुख अभिलेखागार आहेत.

भाषा व साहित्य : स्पॅनिश किंवा कॅस्टीलियन ही स्पेनची अधिकृत बोलीभाषा असून याशिवाय कॅटालन, गॅलिशियन व बास्क या भाषाही मोठ्या प्रमाणावर बोलल्या जातात. डॉन क्विक्झोटचा लेखक ⇨ मीगेल दे सर्व्हँटीझ (१५४७–१६१६) च्या साहित्यलेखनापासून आधुनिक स्पॅनिश साहित्य भरभराटीस आले. विसाव्या शतकातील काही स्पॅनिश लेखकांना आंतरराष्ट्रीय कीर्ती मिळाली. त्यांमध्ये साहित्यक्षेत्रातील नोबेल पारितोषिकाचे मानकरी नाटककार ⇨ होसे एचेगाराई (१९०४), ⇨ हाथींतो बेनाव्हेंते ई मार्तीनेथ (१९२२), कवी ⇨ व्हान रामॉन हीमेनेथ (१९५६), अलेक्सांद्रे वीथेंते (१९७७) आणि कादंबरीकार ⇨ कामीलो होसे सेला (१९८९) यांचा समावेश असून. ⇨ फेथेरीको गार्सीआ लोर्का, रोमन पेरेझ दे आयाला, हॉसे ऑगस्टीन गॉय्टीसोलो व राफेल आल्बेर्ती हे प्रसिद्ध स्पॅनिश साहित्यिक होत. [ि स स्पॅनिश भाषा स्पॅनिश साहित्य].

कला-क्रीडा : स्पॅनिश कलेला प्रदीर्घ व विविधतापूर्ण परंपरा लाभली आहे. या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या अनेक जगप्रसिद्ध व्यक्तिरेखा आढळतात. प्रसिद्ध कादंबरीकार मीगेल देे सर्व्हँटीझ व बेनिटो पेरेझ गाल्डॉस नाटककार ⇨ पेद्रो काल्देरॉन दे ला बार्का व ⇨ लोपे दे व्हेगा रंगचित्रकार द्येगो बेलॉथकेथ, फ्रांथीस्को गोया, पाब्लो पिकासो आणि चित्रपटनिर्माते लूइस बून्वेल या त्यांपैकी काही प्रसिद्ध व्यक्ती आहेत. सुमारे १५००–१६८१ हा स्पेनचा सुवर्णकाळ मानला जातो. याच काळात खऱ्या अर्थाने स्पॅनिश कला भरभराटीस आली. त्यानंतर मात्र काही अंशी स्पॅनिश कलेचा विकास खुंटला. विसाव्या शतकात–विशेषतः त्यातील पहिल्या काही दशकांत–तिचे पुनःरुज्जीवन झाले. हा काळ मोठ्या प्रमाणावरील निर्मिती व सर्जनशीलतेचा ठरला. त्यामुळे या काळाला रौप्य काळ म्हणून ओळखले जाते. स्पॅनिश यादवी युद्धकाळात कलात्मक विकासात खंड पडला. युद्धोत्तर काळात अनेक आघाडीचे कलाकार व बुद्धिमान व्यक्तींनी देशत्याग केला.


वास्तुकला : स्पेनमध्ये ज्या वेगवेगळ्या सत्ता होऊन गेल्या त्यांचा प्रभाव येथील वास्तुकलेवर पडलेला आढळतो. रोमनांनी प्राचीन काळी येथे बांधलेले काही जलसेतू, पूल व इतर वास्तुरचना अजूनही वापरात आहेत. उर्वरित रोमन वास्तूंचे भग्नावशेष देशभर पहावयास मिळतात. दक्षिणे-कडील काही शहरांत मुस्लिमांनी बांधलेल्या मशिदी आढळतात तथापि त्यांमधील बहुतांश मशिदींचे कॅथलिक चर्चमध्ये परिवर्तन करण्यात आलेले आहे. कॉर्दोव्हा येथे असलेले भव्य कॅथीड्रल हे आठव्या–दहाव्या शतकांत एक मशीद होती. या कॅथीड्रलच्या कमानींना आधार देणारे १,००० पेक्षा अधिक खांब ग्रॅनाइट, संगमरवर, सूर्यकांतमणी, ऑनिक्स ह्या बिलोरी दगडातील आहेत. मुस्लिमांनी तटबंदीयुक्त हवेल्या बांधल्या होत्या. त्यांपैकी ग्रानाडा येथील अलहंब्रा हवेली विशेष भव्य व दिमाखदार आहे.

स्पेनमध्ये शेकडो किल्ले व राजवाडे आहेत. माद्रिदच्या वायव्येस ४८ किमी.वर असलेला एस्कॉरीअल हा वैशिष्ट्यपूर्ण वास्तुसमूह इ. स. सु. १५६३–८४ या कालावधीत बांधण्यात आला. करड्या ग्रॅनाइटामध्ये बांधण्यात आलेल्या येथील वास्तू ३७,००० चौ. मी. क्षेत्रावर विस्तारल्या असून जगातील सर्वांत मोठ्या व सुंदर इमारतींपैकी या आहेत. या वास्तुसमूहात चर्च, स्पॅनिश राजांची थडगी, मठ, मोठी कबर, दफन भूमी, महाविद्यालय, ग्रंथालय, शाही राजवाडा तसेच ३०० खोल्या, ८८ कारंजे आणि ८६ जिने आहेत. एस्कॉरीअलपासून १६ किमी. अंतरावरील पर्वतीय भागात एक भव्य चर्च आहे. येथे हुकूमशहा फ्रॅन्सिस्को फ्रँको याचे तसेच स्पॅनिश यादवी युद्धात मृत्युमुखी पडलेल्या ७०,००० सैनिकांचे दहन केले होते. येथील पर्वतावरच १५० मी. उंचीचा खडकातील क्रॉस (क्रूस) असून तो जगातील सर्वांत उंच असल्याचे मानले जाते. सेव्हिल येथे गॉथिक कॅथीड्रल असून रोम येथील सेंट पीटर्स बॅसिलिका व फ्रान्समधील लूर्ड येथील बॅसिलिका खालोखाल यूरोपातील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे चर्च आहे. आंतोन्यो गौडी वायकार्नेट (१८५२–१९२६) हा विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळातील विख्यात व असामान्य वास्तुविशारद होता. सारसंग्राहक दृष्टिकोनामुळे त्याने वास्तुशिल्पाची आपली अद्वितीय मूदेहार शैली विकसित केली. विसाव्या शतकातील प्रसिद्ध वास्तुविशारद म्हणून रिकार्डो बॅफील याचे देशविदेशातील कार्य मोठे आहे. पाब्लो सेरानो हा शिल्पकार म्हणून प्रसिद्ध आहे.

देशात अनेक वस्तुसंग्रहालये आहेत. प्रादो म्यूझीयम, स्पॅनिश म्यूझीयम ऑफ कन्टेम्पररी आर्ट, जोआक्वीन सोरोला म्यूझीयम, क्वीन सोफीया कल्चरल सेंटर, नॅशनल आर्किओलॉजिकल म्यूझीयम (माद्रिद), पिकासो म्यूझीयम व म्यूझीयम ऑफ आर्ट ऑफ कॅटॅलोनिया (बार्सेलोना), नॅशनल म्यूझीयम ऑफ स्कल्प्चर (व्हॅलदलिद), एल ग्रेकोे व सेफर्डीक म्यूझीयम (टोलीडो), म्यूझीयम ऑफ स्पॅनिश ॲब्स्ट्रॅक्ट आर्ट (क्वेन्का) ही उल्लेखनीय वस्तुसंग्रहालये आहेत. यांशिवाय येथे अनेक प्रादेशिक व स्थानिक संस्थांची, कॅथीड्रलची आणि इतर धार्मिक संस्थांची वेगवेगळी वस्तुसंग्रहालये आहेत.

चित्रकला : देशाच्या सुवर्णयुग काळात येथे ⇨ एल ग्रेको (१५४१–१६१४) व बार्थॅालोम्यू एस्टेबॉन मूरीयो (१६१७–८२) हे प्रसिद्ध चित्रकार होऊन गेले. ⇨ फ्रांथीस्को गोया (१७४६–१८२८) या चित्रकाराला तर आधुनिक चित्रकलेचे जनक असे संबोधले जाते. ⇨ पाब्लो पिकासो (१८८१–१९७३) या श्रेष्ठ स्पॅनिश कलावंताचे चित्रकार, शिल्पकार, आरेख्यक कलावंत म्हणून फार मोठे कार्य आहे. त्याने अतिशय सुंदर अशी अनेक शिल्पे, चित्रे, रंगचित्रे, रेखाचित्रे आणि मृत्तिकाशिल्पांची निर्मिती केली. यांशिवाय चित्रकार म्हणून ⇨ साल्वादोर दाली (१९०४–८९), ह्वान ग्रीस (१८८७–१९२७), जोन मीरो (१८९३–१९२३), एदवॉर्दो चिलीदा, आंतोन्यो टॅपिस, फेर्नांदो बोटेरो, मिग्वेल बार्सेलो, पेद्रो सेव्हिला व आंतोन्यो सौरा हे प्रसिद्ध आहेत. त्यांनी देशात अनेक कलाकृती निर्माण केल्या.

संगीत : स्पेनमध्ये लोकगीते व नृत्ये ही फार पूर्वीपासून लोकप्रिय आहेत. त्यांमध्ये प्रादेशिक भिन्नता आढळते. फ्लमेंको हे स्पॅनिश संगीत व रंगीबेरंगी वेशभूषेतील लोकनृत्य जगप्रसिद्ध आहे. ईसाक आल्बेनीथ (१८६०–१९०९), एन्रीक ग्रानाथोस (१८६७–१९१६), मॅन्युएल दे फाला (१८७६–१९४६), जोक्वीन रॉद्रीगो (जन्म १९०१), रॉबर्टो गेरहार्ट, क्रिस्तोबल हॉफ्टर व लूइस दे पाब्लो हे ख्यातनाम स्पॅनिश संगीतकार आहेत. गिटार हे लोकप्रिय वाद्य असून अँड्रीस सेगोव्हिआ (१८९३–१९८७) हा प्रसिद्ध गिटारवादक होता. प्लेसीदो डोमिंगो, जोसे कॅरेरास व माँट्रसेरात काबाले हे गायक म्हणून प्रसिद्ध आहेत. पाब्लो कासाल्स (१८७६–१९७३) चेलोवादक म्हणून, ॲलिसिया हे ला रोचा हा पियानो वादक म्हणून, तर नार्सिओ येप्स, सेलाडोनिओ रोमेरो व त्याची मुले सेलिन, पेप व अँजेल ही गिटारवादक म्हणून प्रसिद्ध आहेत.

चित्रपट : स्पेनमधील चित्रपट उद्योग तुलनेने लहान असून आर्थिक दृष्ट्या त्याला विशेष यश प्राप्त झाले नाही. विसाव्या शतकाच्या दुसऱ्या अर्धशतकात स्पेनमध्ये दाखविले गेलेले बरेचसेे चित्रपट इतर यूरोपीय देशांतून व संयुक्त संस्थानांतून आयात केलेले होते. लूइस बून्वेल (१९००–८३) हा जगातील प्रसिद्ध चित्रपट–दिग्दर्शकांपैकी एक असल्याचे मानले जाते. फ्रँको राजवटीत तो हद्दपार झालेला होता. त्याच्या बहुतांश चित्रपटांची निर्मिती स्पेनबाहेर, प्रामुख्याने सुरुवातीला मेक्सिको- मध्ये व त्यानंतर फ्रान्समध्ये झाली. फ्रँको राजवटीतील कडक अभ्य-वेक्षणानुसार चित्रपटांवर बरेच निर्बंध लादण्यात आले. १९५० च्या दशकाच्या अखेरीस ह्वान आंतोन्यो बार्डेम व लूइस गार्सीआ बेर्लांगा यांच्या कार्यामुळे या व्यवसायात सुधारणा होऊ लागल्या. १९७० च्या दशकापासून कार्लोस सौरा, पिलर मिरो, व्हिक्टर एरिस व पेद्रो अल्मोदोव्हर या दिग्दर्शकांनी देशविदेशात या व्यवसायात चांगलेच यश मिळविले.

क्रीडा : एकोणिसाव्या शतकाच्या दुसऱ्या अर्धशतकापासून येथे सॉकर हा खेळ लोकप्रिय झाला. अनेक शहरांमध्ये सॉकर क्रीडागारे असून त्यांमध्ये या खेळाचे सु. १,००,००० प्रेक्षक बसू शकतात. याशिवाय बास्केटबॉल, टेनिस, हॉकी, मोटारसायकल शर्यती हे खेळ लोकप्रिय आहेत. स्पेनमधील बैलांच्या झुंजी प्रेक्षणीय असतात. अठराव्या शतकाच्या सुरुवातीपासून विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत हा खेळ खूपच लोकप्रिय होता. बहुतेक शहरांमध्ये बैलांच्या झुंजीचे किमान एक तरी मैदान आढळते.

सण व उत्सव : स्पेनमध्ये वेगवेगळे धार्मिक, सांस्कृतिक आणि राष्ट्रीय सण, उत्सव किंवा दिन साजरे केले जातात. उदा., एपिफनी (६ जानेवारी) डे ऑफ अँडलुझिया (२८ फेब्रुवारी), व्हॅलेंशिया येथील दी फीस्ट ऑफ सॅन होसे (१९ मार्च), सेव्हील येथे एप्रिलच्या अखेरीस होणारे फ्लमेंको नृत्य व बैलांच्या झुंजीचा फेरिआ दे ॲबरिल उत्सव, जुलैच्या मध्यात पॅम्पलोनाच्या रस्त्यावर होणारा बैलांच्या शर्यतीचा सॅन फर्माइन्स उत्सव, फीस्ट ऑफ सेंट जेम्स (२५ जुलै), द फीस्ट ऑफ अझम्प्शन (१५ ऑगस्ट), व्हॅलेंशिया प्रांतातील बून्योल येथे दरवर्षी ऑगस्ट महिन्यातील शेवटच्या बुधवारी ५० टन वजनाच्या टोमॅटोंनी एकमेकांशी केल्या जाणाऱ्या मौजेच्या भांडणाचा ला टोमॅटिनो हा उत्सव, नॅशनल डे ऑफ कॅटॅलोनिया (११ सप्टेंबर), स्पॅनिश नॅशनल डे (१२ ऑक्टोबर), ऑल सेंट्स डे (१ नोव्हेंबर), कॉन्स्टिट्यूशन डे (६ डिसेंबर), इमॅक्युलेट कन्सेप्शन (८ डिसेंबर), मूर्सिआ येथील फेस्टिव्हल ऑफ दी सार्डीन इत्यादी.


महत्त्वाची स्थळे : स्पेनच्या राजधानीचे ठिकाण असलेले माद्रिद हे यूरोपातील सर्वाधिक उंचीवरील राजधान्यांपैकी एक असून देशातील सर्वांत मोठे शहर आहे. ऐतिहासिक, सांस्कृतिक, व्यापारी व औद्योगिक दृष्ट्या हे शहर विशेष महत्त्वाचे आहे. देशाच्या ईशान्य भागात भूमध्य समुद्र- किनाऱ्यावर वसलेले बार्सेलोना (लो. १६,१५,४४८–२०११) हे एक सागरी बंदर असून वास्तुशिल्पे व सांस्कृतिक समृद्धता तसेच प्राकृतिक सुंदरता यांसाठी ते प्रसिद्ध आहे. भूमध्य समुद्रकिनाऱ्यावर वसलेले व्हॅलेंशिया (लो. ७,९८,०३३) हे ऐतिहासिक, औद्योगिक व व्यापारी दृष्ट्या महत्त्वाचे आहे. घंटामनोऱ्यांसाठी प्रसिद्ध असल्याने त्याला ‘सिटी ऑफ द हंड्रेड बेल टॉवर्स’ असे संबोधले जाते. देशाच्या नैर्ऋत्य भागात ग्वादलक्वीव्हर नदीकाठावर वसलेले सेव्हील (लो. ७,०३,०२१) हे एक अंतर्गत बंदर असून नव्या जगाकडे समन्वेषणासाठी गेलेल्या समन्वेषकांचे हे मुख्य केंद्र होते. ते ऐतिहासिक व सांस्कृतिक दृष्ट्याही महत्त्वाचे आहे. ईशान्य स्पेनमध्ये एब्रो नदीतीरावर वसलेले सॅरगॉसा (लो. ६,७४,७२५) हे शहर औद्योगिक, व्यापारी व लष्करी केंद्र आहे. शहरात अनेक वास्तुशिल्पे आढळतात. स्पेनच्या दक्षिण भागात भूमध्य समुद्रकिनाऱ्यावर वसलेले मॅलागा (लो. ५,६८,०३०) हे महत्त्वाचे बंदर आहे. आग्नेय स्पेनमध्ये सेगूरा व ग्वादलेंटिन या नद्यांच्या संगमावर वसलेले मूर्सिआ (लो. ४,४२,२०३) हे शहर कृषिमालाच्या व्यापाराचे व वाहतुकीचे केंद्र आहे. याशिवाय माजॉर्का बेटावरील पाल्मा (लो. ४,०५,३१८) कानेरी बेटांपैकी ग्रँड कानेरी बेटावरील लास पाल्मास दे ग्रान कानेरीआ (लो. ३,८३,३४३) हे सागरी बंदर व शहर, उत्तर भागातील बिल्बाओ (लो. ३,५२,७००), स्पेनच्या आग्नेय किनाऱ्यावरील आलकांटी (लो. ३,३४,३२९) हे सागरी बंदर, दक्षिण स्पेनमधील ग्वादलक्वीव्हर नदीवरील कार्दोव्हा (लो. ३,२८,६५९) हे शहर व वायव्य मध्य भागातील व्हॅलदलिद (लो. ३,१३,४३७) हे औद्योगिक केंद्र ही प्रमुख शहरे आहेत. युनेस्कोने घोषित केलेली ४३ जागतिक वारसास्थळे स्पेनमध्ये आहेत.

चौधरी, वसंत

 पहा : स्पॅनिश यादवी युद्ध.

संदर्भ : 1. Barton, Simson, History of Spain, London, 2008

           2. Croy, Anita, Spain, New York, 2010.

           3. Maltby, Williams S., The Rise and Fall of the Spanish Empire, London, 2009.

           4. Payne, Stanley G. Spain, Puerto Rico, 2011


 

स्पेन

 

एस्कोरियल मॉनस्ट्री, माद्रिद. ग्वादलक्वीव्हर नदीवरील पूल, रोमन शैली, कॉर्दोव्हा.
पाणीपुरवठ्यासाठी उभारलेला मध्ययुगीन जलसेतू, सिगोव्हिया. प्रसिद्ध बार्सेलोना बंदर
ब्यून्योल येथील ला टोमॅटिनो उत्सवाचे दृश्य. स्पेनमधील प्रसिद्ध बैलझोंबी खेळातील चित्तथरारक प्रसंग
अँडालुसीया येथील प्रसिद्ध परिरक्षित वराहमांस आल्देआदाव्हीला धरणाचे विहंगम दृश्य, सालामांका.