हिंगणघाट : महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यातील एक प्राचीन नगरव त्याच नावाच्या तालुक्याचे मुख्यालय. लोकसंख्या १,००,४१६ (२०११). ते दिल्ली-चेन्नई लोहमार्ग व राष्ट्रीय महामार्ग क्र. ७ वर, वर्ध्याच्या दक्षिणेस सु. ३४ किमी.वर वेणा नदीकाठी वसले आहे. पूर्वी येथे भरपूर प्रमाणात हिंगण वनस्पती असलेला घाट होता, त्यावरून यास हिंगणघाट हे नाव पडले असावे. अद्यापि या भागात ही झाडे आढळतात. येथे उपलब्ध झालेल्या पाचव्या शतकातील ताम्रपटात हे नगर वाकाटक राजा दुसरा प्रवरसेन (पाचवे शतक) याच्या कारकीर्दीत वसविले असावे. प्रभावतीगुप्ता (कार. ४०५–४२०) हिच्या एका आज्ञापत्रात हिंगणघाटचा उल्लेख डंगुणग्राम असा आहे, तर दुसऱ्या एका ताम्रपटात या नगराचा उल्लेख सुप्रतिष्ठा असा आहे. स्वातंत्र्यपूर्वकाळात भौगोलिक दृष्ट्या भारताचा मध्यबिंदू हिंगणघाट येथे असल्याचे इंग्रज अधिकारी विल्यम लॅप्टन याने दाखवून दिले होते. 

 

हिंगणघाट परिसरात उत्तम प्रतीचा कापूस पिकतो. या कापसाच्या उत्पन्नामुळेच परिसराची विदर्भ व अन्यत्र एकोणिसाव्या शतकापासून प्रसिद्धी आहे. अव्वल इंग्रज अमदानीत येथील बनी जातीचा कापूस लँकेशरला (इंग्लंड) निर्यात होत असे. कापसाच्या उत्पादनामुळे हिंगणघाट येथे १८८१ मध्ये हिंगणघाट मिल कंपनीने पहिली सूतगिरणी सुरू केली.वाफेच्या इंजिनावर चालणारा जिल्ह्यातील हा पहिला कारखाना होय पण ही गिरणी १९०६ च्या सुमारास आर्थिक दृष्ट्या तोट्यात आली. त्यामुळे ती उद्योगपती रायबहादूर बंसीलाल अबीरचंद यांच्याकडे गहाण टाकण्यात आली. तत्पूर्वी हिंगणघाटला रायसाहेब रेखचंद मोहोता यांच्या मालकीची जिल्ह्यातील तिसरी कापड गिरणी १९०० पासून सुरू होती. तसेच सरकी काढण्याचे दहा व गासड्या बांधण्याचे चार कारखाने होते. पुढे १९३०–३३ मध्ये स्वदेशी चळवळीमुळे कापड उद्योगास तेजी आली. हिंगणघाटची रायबहादूर बंसीलाल अबीरचंद स्पिनिंग ॲण्ड वीव्हिंग मिल महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महामंडळाने १९६८ मध्ये ताब्यात घेतली. येथे प्रभात ऑइल मिल ही मोठी तेलगिरणी असून डाळ भरडण्याच्या गिरण्याही आहेत. याशिवाय लाकूड कापण्याचा मोठा उद्योग शहरात चालतो. 

 

शहरात मल्हारी-मार्तंड, जैन, विश्वनाथ इ. मंदिरे प्रसिद्ध असून वृंदावन बाग, शिवबाग, गंगाबाग, शिवाजी बाग वगैरे उद्याने आहेत. मार्तंड मंदिर नागपूरच्या भोसल्यांचा सरदार लालबा दादबा बिडकर याने आपल्या मातोश्रींच्या स्मरणार्थ १७९२–१८०५ या कालावधीत बांधले. इंडो--आर्यन शैलीतील हे मंदिर राजस्थानी पाथरवटांनी बांधले असून मूर्ति-शिल्पांनी ते अलंकृत आहे. या मूर्तींमध्ये लंकादहन, वानरसेना, राम-रावण युद्ध, रुक्मिणी स्वयंवर, द्रौपदी स्वयंवर, अमृतमंथन, गणपती, महाकाली यांसारखी काही लक्षणीय शिल्पे आहेत. मल्हारीची भव्य व कलात्मक पाषाण मूर्ती विशेष उल्लेखनीय आहे. बंसीलाल कोचर यांनी बांधलेले जैन मंदिर (१९५५) तेथील काचकामासाठी प्रसिद्ध आहे. वृंदावन बाग ही मथुरादासजी मोहोता यांनी बांधली. तीत एक तलाव आहे, तरशेठ ठाकूरदासजी पोतदार यांनी बांधलेल्या शिव बागेत विश्वनाथाचे मंदिर आहे. शिवाजी बागेत छ. शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. यांशिवाय शहरात मशिदी व दोन दर्गे असून तेथे उरूस भरतो. संत गाडगे महाराजांच्या स्मरणार्थ मार्गशीर्षात येथे मोठी जत्रा भरते. ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे व सुप्रसिद्ध कव्वाली गायक जॉनी बाबू यांचे हे जन्मस्थान आहे. 

देशपांडे, सु. र.