आयडाहो : अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांपैकी वायव्येच्या पर्वतप्रदेशीय भागातील एक राज्य. ४२ ते ४९ उ. आणि १११ ते ११७ प. क्षेत्रफळ २,१६,४१६ चौ. किमी. लोकसंख्या ७,१२,५६७ (१९७०). याच्या दक्षिणेस उटा व नेव्हाडा, पश्चिमेस ऑरेगन व वॉशिंग्टन, उत्तरेस कॅनडाचा ब्रिटिश कोलंबिया प्रांत व पूर्वेस माँटॅना व वायोमिंग आहे.

भूवर्णन : राज्याचा बहुतेक भाग कोलंबिया नदीक्षेत्रात असून फक्त आग्नेयीकडील प्रवाह वेअर सरोवराला मिळतात. एकंदर भूप्रदेश पर्वतराजींनी व्यापलेला आहे. भौगोलिक दृष्ट्या राज्याचे तीन भाग पडतात : उत्तरेकडे क्लिअरवॉटर पर्वत असून त्यात अनेक तळी व प्रवाह आहेत सॅमन नदीने वेढलेल्या दुर्गम मध्य भागात उंच डोंगरांचे तुटलेले कडे व सुळके, अतिशय खोल दऱ्या व गर्द अरण्ये आहेत दक्षिण भागात पूर्वपश्चिम वळणांच्या स्नेक नदीचे खोरे असून नदीक्षेत्राच्या पूर्व भागात बने, तळी, सुपीक जमिनी आहेत. मध्य भागातील डोंगरांमुळे उत्तर व दक्षिण भागात बरीच भिन्नता आढळते. मध्यभागात पुरातन ज्वालामुखींच्या अवशेषांचा वैराण प्रदेश, पश्चिम भागात वाळवंटी पठार व पायऱ्यापायऱ्यांचे मैदानपट्टे आहेत. स्नेक नदी राज्याच्या पश्चिमेस उत्तरवाहिनी होऊन राज्यसीमा बनते व पुढे राज्याबाहेर पडेपर्यंत हेल्स कॅन्यन नावाच्या ग्रँड कॅन्यनपेक्षाही खोल (२,४४९ मी.) दरीतून वाहते. विषम भूरचनेमुळे अंतर्गत दळणवळण इतके बिकट आहे की, दक्षिण व उत्तर भागांना जोडणारा हमरस्ता एकच आहे आणि लोहमार्गाने जावयाचे तर शेजारच्या राज्यातून जावे लागते. वनप्रदेशातील पिवळसर जमीन चराऊ कुरणांच्या उपयोगी आहे, पण दक्षिणेकडील अग्निजन्य खडकापासून झालेली व नदीगाळाची माती सुपीक आहे. चांदी, शिसे, जस्त, सोने, तांबे, अँटिमनी, पारा, कोबाल्ट, फॉस्फेट ही खनिजे येथे सापडतात. येथील प्रमुख नदी स्नेक असून इतर बहुतेक नद्या तिलाच मिळतात. प्रदीर्घ नद्यांमुळे पाणी ही राज्याची मुख्य नैसर्गिक संपत्ती आहे. तिचा विनियोग शेती व वीजनिर्मितीसाठी मोठ्या प्रमाणावर होतो. एकूण २७ लहानमोठ्या धरणांनी झालेल्या तलावांखेरीज नैसर्गिक सरोवरे पुष्कळच आहेत त्यांपैकी सर्वांत मोठे उत्तर भागातील पाँडेरे ४६० चौ. किमी. विस्ताराचे आहे. पॅसिफिक महासागराकडून येऊन रॉकी पर्वतावरून उतरणारे चिनूक हे उबदार वारे राज्याचे हवामान बरेचसे सुसह्य करतात. उत्तर भागात जास्त थंडी व पाऊस, दक्षिण भागात कमी पाऊस व माफक उन्हाळा असतो. वार्षिक सरासरी तपमान १० से. व वार्षिक सरासरी पाऊस ३२·८ सेंमी. आहे. आयडाहो राज्यात एकूण भूमीच्या दोन तृतीयांश प्रदेश वनाच्छादित आहे डग्लस फर, पाइनच्या लॉजपोल, तसेच व्हाइट व पाँडेरोझा या जाती, रेड सीडार, स्प्रूस, हेमलॉक अशा विविध वृक्षांच्या वनांतून देशातील व्हाइट पाइनचा सर्वांत मोठा समूह आणि तीन हजार वर्षांचे जुने रेड सीडार आहेत. अस्वल, कौगर, लांडगा, बॉबकॅट, मूज, एल्क, रानबकरा, रानमेंढा इ. पशू गरुड, ससाणा, घुबड, करकोचा, बगळा, गाणारे व इतर जातींचे पक्षी नद्यांतून सॅमन, बास, पर्च, स्टर्जन असे मासे तसेच पाँडेरे सरोवरात कॅम्लूप नावाचा सर्वांत मोठा रेनबो ट्राऊटमासा अशी समृद्ध प्राणिसृष्टी या राज्यात आहे.

इतिहास व राज्यव्यवस्था : या प्रदेशात बॅनॉक, नेझ पर्से, लेम्ही शोशोन वगैरे सात रेड इंडियन जमातींचे आदिवासी होते. १८०५ च्या सुमारास पॅसिफिक किनाऱ्याकडे मार्ग शोधण्याच्या कामगिरीवर आलेले लोक म्हणजे इकडील पहिले गोरे लोक. त्यांच्यामागून केसाळ चामड्यांसाठी जनावरे मारणारे लोक आले. १८३६ मध्ये स्पॉल्डिंगने क्लिअरवॉटर येथे, १८४२ मध्ये जेझुइट दे स्मेट याने कूर दालीनी या ठिकाणी आणि १८५५ साली मॉर्मन पंथीयांनी लेम्ही नदीवर धर्मप्रसारासाठी ठाणी उघडली. १८६० मध्ये इकडे सोने सापडले ही बातमी फैलावताच सोन्यासाठी शोध करणारे आणि वसाहत करणारेही या भागात येऊ लागले. ल्यूइस्टन ही या प्रदेशाची पहिली राजधानी झाली. आयडाहो हा प्रथम ऑरेगन प्रदेशाचा भाग, मग वॉशिंग्टन प्रदेशाचा, नंतर १८६३ मध्ये स्वतंत्र प्रदेश झाला. या अवस्थांतून गेल्यावर १८६४ मध्ये याच्या काही भागाचा माँटॅना प्रदेश बनविण्यात आला १८६८ मध्ये वायोमिंग प्रदेशातही याचा काही भाग गेला. १८७७ मध्ये नेझ पर्से व बॅनॉक जमातींनी आपल्या सुपीक प्रदेशावर होणाऱ्या आक्रमणामुळे चिडून तसेच सक्तीने राखीव प्रदेशात डांबले जाण्याविरुद्ध युद्ध पुकारले. पण त्यांचा १८७८ मध्ये पूर्ण पाडाव झाला. १८८० त राज्यात गुराखी व मेंढपाळ लोक भोवतालच्या राज्यांतून गोळा झाले व त्यांच्या आपापसात चकमकी उडू लागल्या. अराजकाला सामान्य लोक कंटाळले, तेव्हा १८८९ साली संविधान परिषद होऊन १८९० मध्ये राष्ट्रात ४३ वे राज्य म्हणून आयडाहोला प्रवेश मिळाला. प्रथम बहुपत्नीकत्व मान्य करणाऱ्या मॉर्मन पंथीयांना मताधिकार नव्हता. पाण्याच्या वापरावर शासकीय नियंत्रण पहिल्यापासून आहे. पहिली १० – १५ वर्षे खाणकामगारांच्या तक्रारींचा राज्याला उपद्रव झाला. १८९६ मध्ये स्त्रियांना मताधिकार मिळाला. विधान सुचविण्याचा, सार्वमताची मागणी करण्याचा, प्रतिनिधींना माघारी बोलावण्याचा व प्रत्यक्ष प्राथमिक मतदानाचा हे विशेष अधिकार मतदारांना या राज्यात आहेत. कृषिप्रधान राज्य असल्यामुळे दोन्ही महायुद्धांच्या वेळी जरी याला तेजीचे दिवस दिसले, तरी दरम्यानच्या वर्षांत त्यास तीव्रपणे मंदी जाणवली. विशेषत: दुसऱ्या महायुद्धात अन्नपदार्थ, लाकूड व धातूंचा पुरवठा केल्यामुळे आर्थिक समृद्धी प्राप्त झाली. १८८९ च्या व नंतरच्या संशोधित संविधानानुसार कार्यकारी सत्ताधारी गव्हर्नर, लेफ्टनंट गव्हर्नर व सहा खातेप्रमुख ४ वर्षांसाठी निवडलेले असतात विधिमंडळावर ३५ सीनेटर व ७० प्रतिनिधी दोन वर्षांच्या मुदतीसाठी निवडले जातात. बॉइसी या राजधानीत विधिमंडळाची अधिवेशने दरवर्षी ६० दिवस भरतात. काँग्रेसमध्ये दोन सीनेटर व दोन प्रतिनिधी या राज्यातर्फे निवडून जातात. सर्वोच्च न्यायालयाचे ५ न्यायमूर्ती ६ वर्षांसाठी आणि १२ जिल्हान्यायालये, परगणे, पालिका वगैरेंचे न्यायाधीश ४ वर्षांसाठी निवडले जातात.

आर्थिक व सामाजिक स्थिती : अजून काहीसे सीमेवरच्या प्रदेशाप्रमाणे अपुऱ्या विकासाचे ग्रामीण, कृषिउद्योग, खाणी व लाकूडधंद्यांचे आणि गुरचराईचे असे हे राज्य आहे. राज्यातील जमिनीपैकी ४० % जंगलव्याप्त आहे. बटाट्याच्या उत्पादनात राष्ट्रात आघाडीवर त्याखालोखाल गहू, बीट, पावटे, घासचारा, बार्ली, फळफळावळ, दूधदुभत्यांचे पदार्थ, अंडी, मांसासाठी पोसलेली गुरे, मेंढ्या, डुकरे आणि लोकर यांचे उत्पादन होते. बीटसाखर, धान्य दळणे, भाज्या व फळे डबाबंद करणे, मांससंवेष्टन, खाद्यपदार्थ प्रक्रिया, लाकूड प्रक्रिया इत्यादींचे कारखाने असून, खाणींमधून काढण्यात येणाऱ्या धातुकांत राज्यातील चांदी, जस्त व शिसे यांचे उत्पादन देशात आघाडीवर आहे. आग्नेयीकडील फॉस्फेटच्या खडकात जगातील फॉस्फेटचा अर्घा साठा असल्याचा अंदाज आहे. धातू शुद्ध करून अन्यत्र रवाना करण्यापुरतीच राज्याची खनिजाची कारखानदारी आहे. नद्यांचे पाणी अडवून जमिनींना पुरवणे व वीज निर्माण करणे हाही एक मोठा शासननियंत्रित उद्योग राज्यात चालतो. पाण्याप्रमाणेच भूमीचे, वनांचे व पशुपक्ष्यांचे संरक्षण व संगोपन या कामांवरही शासनाचे जागरूक नियंत्रण आहे. ८,२०० चौ. किमी. जमिनीला पाटाचे पाणी मिळते. वीजनिर्मिती भरपूर होत असूनही अजून कित्येक पटींनी तिला वाव आहे. राज्यात १९७० मध्ये ४,९४४ किमी. लांबीचे लोहमार्ग, ८८,१०७ किमी. रस्ते (पैकी निम्मे पक्के) असून २६७ विमानतळ व ५,२८,३१० मोटारी होत्या. ल्यूइस्टन हे एकमेव नदीबंदर आहे. राज्यात ३८ नभोवाणी व ६ दूरचित्रवाणी केंद्रे, १२ दैनिके व सु. २ लक्ष दूरध्वनियंत्रे आहेत. ख्रिस्ती धर्माचे मॉर्मनपंथीय सर्वाधिक असून त्याशिवाय रोमन कॅथलिक व विविध प्रॉटेस्टंट पंथीय लोक आहेत. राज्याची ४५·९ % वस्ती ग्रामीण भागात होती (१९७०). शहरे थोडी व लहान आहेत. बॉइसी ही राजधानी व औद्योगिक केंद्र आहे. आयडाहो फॉल्स येथे अणुशक्ति-प्रयोगकेंद्र असून पोकॅटेलो हे व्यापार व वाहतुकीचे केंद्र आहे. ग्रामीण व सीमावासी पद्धतीने राहणाऱ्या या राज्याच्या लोकांचा लोकराज्य, स्वयंपूर्ण जीवन व समता या बाबतींत विशेष कटाक्ष आहे. दळणवळणाच्या अडचणींमुळे राज्याच्या उत्तर भागाच्या लोकांना पश्चिमेच्या वॉशिंग्टन राज्यातील स्पोकॅन आणि दक्षिणेकडच्या भागातील लोकांना उटा राज्यातील सॉल्ट लेक शहर सोईचे पडते. शिक्षण ७ ते १६ वर्षे वयापर्यंत सक्तीचे व मोफत असून १९६८-६९ मध्ये प्राथमिक शाळांत १,८७,६८३ विद्यार्थी व ३,६८७ शिक्षक माध्यमिक शाळांत ८२,४८८ विद्यार्थी व ४,०७६ शिक्षक होते. उत्तरेत मॉस्को येथे आयडाहो विद्यापीठ आहे. बॉइसी येथे एक वस्तुसंग्रहालय व एक कलासंग्रह आहे. शिकार, मासेमारी, बर्फावरील खेळ यांच्या अनुकूलतेमुळे आजही साहसाला, विकासाला आणि व्यापाराला या राज्यात भरपूर वाव आहे.

ओक, शा. नि.