व्ह्यँत्यान : व्यांगचान. आग्नेय आशियातील लाओस देशाची राजधानी. लोकसंख्या २,१०,००० (१९८१ अंदाज). थायलंड व लाओस यांच्या सरहद्दीजवळ मेकाँग नदीच्या काठावर हे शहर वसले असून या नदीवरील हे एक प्रमुख बंदर आहे.

तेराव्या शतकाच्या अखेरच्या काळात या नगराची स्थापना झाली. एका लाओ मांडलिक राज्याची राजधानी येथे होती (१३५३). पुढे सोळाव्या शतकात सेतातिरात राजाने येथे थाट लुआंग स्तूपाची तसेच हिरव्या बुद्ध मूर्तीच्या वॅट फ्रा किओ मंदिरवास्तूची उभारणी केली. अठराव्या शतकात लाओशियन आणि सयामी यांच्या सत्तासंघर्षात शहराची प्रचंड लूट व नासधूस करण्यात आली. १८९९ ते १९५३ या काळात ही फ्रेंचांची प्रशासकीय राजधानी होती. लाओस स्वतंत्र झाल्यावर (१९५३) व्ह्यँत्यान हेच राजधानीचे ठिकाण राहिले. मात्र राजेशाही संपुष्टात येईपर्यंत (१९७५) ल्वांगप्राबांग येथेच शाही राजधानी होती.

मेकाँग नदीवरील प्रमुख बंदर असल्याने शहराला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. शहराच्या परिसरात भातशेती, मका-उत्पादन व पशुपालन इ. व्यवसाय चालतात. मद्यनिर्मिती, लाकडी उत्पादने, सिगारेटी, आगकाड्या, प्लॅस्टिक पिशव्या, रबरी पादत्राणे, लोह व पोलाद उद्योग, वस्त्रोद्योग, बांधकामाचे साहित्य, घरगुती वस्तू तयार करणे इ. उद्योगधंदे शहरात चालतात. १९७५ पूर्वी हे देशातील मांसोत्पादनाचे व मांस निर्यातीचे प्रमुख केंद्र होते. परंतु व्हिएटनामकडून थायलंडकडे होणारा व्यापार वढल्यामुळे व्ह्युँत्यानऐवजी त्याच्या आग्नेयीस असलेल्या पॅक्सेचे महत्त्व वाढले. जलवाहतुकीमुळे मेकॉग नदीकाठावरील नगरांशी हे जोडले गेले आहे. देशातील प्रमुख शहरांशी महामार्गांनी हे जोडले गेले आहे. देशातील प्रमुख शहराच्या परिसरात पुरेसा वीजपुरवठा होतो तसेच काही वीज थायलंडला पाठविली जाते.

येथील सिसाव्हॉग व्हॉग विद्यापीठ, हो फाकीओ राष्ट्रीय संग्रहालय, डॉगसाफांगम्यूक ग्रंथालय उल्लेखनीय असून थाट लुआंग स्तूप (१५६६) ही प्रसिद्ध वास्तू आहे. शहरात अद्यापही अनेक जुन्या व नव्या लाकडी इमारती आहेत.

चौधरी, वसंत