विजयवाडा: भारतातील आंध्र प्रदेश राज्याच्या कृष्णा जिल्ह्यातील एक औद्योगिक व धार्मिक स्थळ. लोकसंख्या ७,०२,००० (१९९१). कृष्णा नदीच्या त्रिभुज प्रदेशाच्या शिरोभागी, नदीच्या डाव्या तीरावर हे वसलेले असून ते हैदराबादच्या आग्नेयीस सु. २५० किमी. तर गुंतू र शहराच्या ईशान्येस सु. ३२ किमी. अंतरावर आहे. इ. स. सहाव्या शतकात हे भरभराटीस आले होते. विष्णुकुंडिन वंशातील राजा तिसरा माधववर्मा याची ही काही काळ राजधानी होती. अगस्त्य ऋषीची ही तपोभूमी असल्याचे सांगतात. सातवाहनांच्या नंतरच्या काळात हे विजयवत्, विजयवाटिका व बेझवाडा अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखले जात असे. त्याशिवाय बीजपुरम्, कनकप्रभा, कनकपुरम्‌ , कनकवाडा, जयपुरी, विजयपुरी, फाल्गुमक्षेत्रम्, जननाथपुरा व राजेंद्र−चोलापुरम् असेही याचे बाराव्या शतकातील उल्लेख आढळतात. तथापि पूर्वीपासून प्रामुख्याने बेझवाडा या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या गावास १९४९ पासून अधिकृत रीत्या विजयवाडा हे नाव देण्यात आले. इ. स. १८८८ पासून येथे नगरपालिका आहे.

विजयवाड्याचा परिसर निसर्गसुंदर टेकड्यांनी वेढलेला आहे. औद्योगिक, व्यापारी, शैक्षणिक व सांस्कृतिक दृष्ट्या विजयवाड्याला महत्त्वाचे स्थान आहे. याच्या सुपीक परिसरात तंबाखू व भाजीपाल्याचे बरेच उत्पादन होते. कृष्णा जलसिंचन प्रकल्पाचे येथे मुख्य कार्यालय आहे. विजयावाडा येथे कृष्णा नदीवर १,१३२ मी. लांबीचा व ६ मी. उंचीचा बंधारा (ॲनिकट) बांधलेला आहे. या बंधाऱ्यापासून काढलेल्या कालव्यांमुळे नदीच्या दोन्ही काठांवरील ३,६४,२१७ हेक्टर क्षेत्राला पाणीपुरवठा केला जातो. हे देशातील मोठ्या लोहमार्ग प्रस्थानकांपैकी एक असून लोहमार्गाने ते मद्रास, कलकत्ता, दिल्ली, हैदराबाद, मच्छलीपटनम् व गुंतूर या ठिकाणांशी जोडले आहे. वाहतूक व दळणवळण सुविधांमुळे पूर्व घाटातील ही प्रमुख घाऊक बाजारपेठ बनली आहे. तांदूळ निर्यातीचे हे प्रमुख केंद्र असून याच्या परिसरात क्रोमाइटच्या खाणी आढळतात. खेळणी बनविण्याचा मोठा व्यवसाय येथे चालतो. भातसडीच्या गिरण्या, तंबाखू प्रक्रिया, साखर प्रक्रिया, सिमेंट व हलक्या अभियांत्रिकी वस्तुनिर्मिती इ. उद्योगधंदे शहरात चालतात.

शहरात व्हिक्टोरिया जूबिली वस्तुसंग्रहालय आहे. त्यातील काळ्या ग्रॅनाइट दगडातील बुद्धाची भव्य मूर्ती प्रसिद्ध आहे. भारतविद्या व अभिजात कलांचे शिक्षण देणारी महाविद्यालये आणि वैद्यक महाविद्यालय येथे आहे. येथे कनकदुर्गा, मल्लेश्वर व विजयेश्वर अशी तीन प्राचीन मंदिरे आहेत. त्यांपैकी कनकदुर्गा स्वयंभू आहे. मल्लेश्वराचे मंदिर चालुक्य राजा त्रिभुवनमल याने इ. स. दहाव्या शतकात बांधले. जवळच इंद्रकील पर्वतावर एक स्तंभ आहे. त्याच्या एका बाजूवर किरातार्जुनीय काव्यातील काही प्रसंग कोरले आहेत. त्यावरून किरात−अर्जुन युद्धाच्या जागी विजयेश्वर मंदिर बांधले असावे, असा समज आहे. कब्ज विष्णुवर्धनची राणी अय्यण महादेवी हिने काही जैन मंदिरे बांधली होती, असा उल्लेख आढळतो पण सांप्रत त्यांचे भौतिक अवशेष उपलब्ध नाहीत. याशिवाय शहरात इतरही अनेक मंदिरे आहेत. महाशिवरात्रीला येथे मोठा उत्सव भरतो. दर बारा वर्षांनंतर भरणारा ‘कृष्ण पुष्करम्’ उत्सव बराच मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. उंडवळे या विजयवाड्याच्या जवळच्या खेड्यात इ. स. सातव्या शतकात खोदलेल्या प्राचीन गुहा असून तेथील मूर्तिकाम लक्षणीय आहे. विजयवाडा येथून अनेक दैनिक वृत्तपत्रे प्रसिद्ध होतात. येथे आकाशवाणीचे प्रसारणकेंद्र आहे.

देशपांडे, सु. र. चौधरी, वसंत