कंधार नांदेड जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण. लोकसंख्या ९,२२१ (१९७१). हे मन्याड नदीच्या उत्तरेस काही अंतरावर वसले असून  नांदेडच्या दक्षिणेस सु. ४५ किमी. आहे. याचे प्राचीन नाव खंदार. चौथ्या शतकात ही सोगदेव राजांची राजधानी होती. राष्ट्रकूटांचा राजा कृष्णदेव उर्फ खंडारदेव ह्याचा नवव्या शतकातील एक शिलालेख येथे उपलब्ध झाला आहे. मोगल कारकीर्दीतही कंधार महत्त्वाचे ठाणे होते. कंधारच्या आसमंतातील गाईबैल कंधारी जनावरे म्हणून प्रसिद्ध आहेत. येथे तेल गाळणे, हातमाग, साबण व धातुकामाचे कुटिरोद्योग असून शिवाजी मोफत महाविद्यालयासाठी हे प्रसिद्ध आहे. 

शाह, र. रू.