महाड : महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील याच नावाच्या तालुक्याचे मुख्य ठिकाण. लोकसंख्या १५,१९८ (१९८१). जिल्ह्याच्या दक्षिण भागात, सावित्री नदीच्या उजव्या तीरावर, मुखापासून आत सु. ४४ किमी. वर वसलेले महाड हे एक अंतर्गत बंदर आहे. महाडच्याच थोड्या खालच्या बाजूस गांधारी-सावित्री या नद्यांचा संगम होतो. उधानाच्या भरतीच्या वेळी नदीतील पाण्याची पातळी सु. २.७५ मीटर वाढते, त्यामुळे महाडपर्यंत बोटी येऊ शकतात. इतर भरतीच्या वेळी महाडच्या वर १.५ किमी. पर्यंत डोंगी (नावा) येऊ शकतात. अशा प्रकारे येथील जलवाहतूक बरीचशी भरतीच्या पाण्यावर अवलंबून असते. महाडच्या वरच्या बाजूस ३ किमी. पर्यंतच भरतीची मर्यादा आहे. महाडजवळ शहराच्या विरुद्ध बाजूच्या सावित्रीच्या तीरावर खडकांची रांग असून तेथे नदीचे पात्र अरुंद आहे. मुंबई−गोवा या राष्ट्रीय महामार्ग क्र. १७ वरील महाड हे एक महत्त्वाचे स्थानक आहे.

एकेकाळी हे ‘महिकावती’ या नावाने ओळखले जात असल्याचे सांगितले जाते. ‘बलिपटना’ आणि ‘पलईपटभाई’ असेही याचे जुने नामोल्लेख आढळतात. महाडच्या वायव्येस तीन किमी. वरील पाली टेकड्यांत इ. स. पहिल्या शतकातील तसेच दक्षिणेस १.५ किमी. वरील कोल काही बौद्ध गुहा आहेत. सोळाव्या शतकात गव्हाच्या व्यापाराचे हे एक मोठे केंद्र होते. शिवाजी महाराजांची राजधानी रायगड ही येथून जवळच (२५ किमी). असल्याने शिवकाळात महाडचे महत्त्व अधिक वाढले. १९७६ साली येथे दुसरा बाजीराव, नाना फडणीस व इंग्रज यांच्यामध्ये तह होऊन बाजीरावाला पेशवाई मिळाली. १८१८ साली मराठ्यांशी झालेल्या युद्धात लेफ्टनंट कर्नल प्रोदर याने विनासायस महाड आपल्या ताब्यात घेतले. १८६६ मध्ये येथे नगरपालिकेची स्थापना झाली.

व्यापारी दृष्ट्या महाडला महत्त्व आहे. मलवार, गोवा व दक्षिण कोकणातून खारे व ताजे मासे आणि मुंबईकडून कापड, साखर, रॉकेल इ. महाडकडे येतात : तर महाडमधून लोणारी कोळसा, गूळ इ. माल विशेषतः मुंबईकडे, तर दख्खनच्या पठारी भागाकडे तांदूळ पाठविला जातो.

येथे चवदार, वीरेश्वर व हापूस ही तीन तळी आहेत. वीरेश्वर हे येथील प्रमुख मंदिर आहे. आंबेडकरांनी १९२७ साली चवदार तळ्यावर अस्पृश्यांना अतरांप्रमाणे पाणी भरता यावे म्हणून मोठा सत्याग्रह केला. त्यावेळी मनुस्मृतीही जाळण्यात आली. येथे एक महाविद्यालय आहे.

चौधरी, वसंत