एस्किशहर : पश्चिम तुर्कस्तानातील एस्किशहर प्रांताची राजधानी. लोकसंख्या २,१६,३३० (१९७०). हे अंकाराच्या २०१ किमी. पश्चिमेस, पॉर्सूक नदीच्या उजव्या तीरावर वसले आहे. येथून आठ किमी. नैर्ऋत्येस प्राचीन काळचे फ्रिझियाचे डॉरिलीअम हे समृद्ध शहर होते. अलेक्झांडरचे सेनापती लायसिमाकस व अ‍ँटिगोनस यांच्यामध्ये इ. स. पू. ३०२ मध्ये एस्किशहराजवळ लढाई झाल्याचा उल्लेख आढळतो. शहराजवळील उष्ण पाण्याच्या झऱ्यांमुळे याचे महत्त्व बायझंटिन काळापासून वाढले. १८९४ मध्ये हे ॲनातोलिया-बगदाद रेल्वेफाट्यावरील स्थानक बनल्याने याची भरभराट झपाट्याने झाली व हे एक मोठे उद्योगकेंद्र बनले. समृद्ध परिसरातील शेतमालाची ही बाजारपेठ असून येथे साखरशुद्धीकरण, कापड, सिमेंट, विटा, रेल्वेसामान, विमानाचे भाग, शेतकी अवजारे इत्यादींचे कारखाने व कापूस संशोधनाचे केंद्र आहे. येथील परिसरात क्रोमियम व मॅग्‍नेसाइट मिळते तथापि येथे मिळणाऱ्या ‘मीर्शोम’ मातीपासून बनविलेले तंबाखू ओढण्याचे पाईप जगप्रसिद्ध आहेत.

जोशी, चद्रंहास