मॉल्डेव्हिया : (१) बाल्कन द्वीपकल्पातील इतिहासकालीन विभाग. तो सध्या रूमानिया आणि रशिया या देशांत विभागलेला आहे. मोल्डेव्हा नदीवरून हे नाव पडले. हा प्रदेश पश्चिमेकडील कार्पेथियन पर्वतश्रेणीपासून पूर्वेकडे नीस्तर नदीपर्यंत पसरलेला असून दक्षिणेकडे वालेकिया आणि दोब्रूज या प्रदेशांनी सीमित झालेला आहे. डॅन्यूबियन राज्ये म्हणून वालेकिया आणि मॉल्डेव्हिया यांचा उल्लेख इतिहासकार करतात. आशिया खंडातून द. यूरोपकडे जाणाऱ्या मार्गांवर असल्याने या प्रदेशाला पूर्वीपासून भूराजनीतिदृष्ट्या महत्त्व आहे.

डेश या रोमन प्रांताचा भाग असलेला हा प्रदेश टोळ्यांच्या सतत आक्रमणाला बळी पडत असे. तेराव्या शतकात तो मंगोल लोकांच्या ताब्यात होता. चौदाव्या शतकात येथे स्वतंत्र राज्ये उदयास आली. पुढील काळात बेसारेबिया प्रूट आणि नीस्तर या दोन नद्यांमधील पूर्वेकडचा प्रदेश आणि बूकव्हीना हा ईशान्येकडील प्रदेश मॉल्डेव्हियात मोडत असे. तत्कालीन मॉल्डेल्व्हिया हे सुसंघटित राज्य नव्हते. मॉल्डेव्हियाच्या स्टीफन द ग्रेट (कार. १४५७–१५०४) याने जवळचे वालेकिया राज्य जिंकले. त्याच्या मृत्यूनंतर ऑटोमन सुलतानांच्या ताब्यात हे राज्य गेले. सतराव्या शतकाच्या प्रारंभी अल्पकाळ या प्रदेशावर वालेकिया आणि पोलंड यांनी आपला अंमल बसविला. अठराव्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत म्हणजे तुर्की अंमलात आणि विशेषतः कॉन्स्टँटिनोपल (इस्तंबूल) येथील तुर्की प्रशासनातील ग्रीक अधिकारी वर्ग यांच्या उपेक्षेमुळे हा प्रदेश सर्वच दृष्टींनी अप्रगत राहिला. १७७५ मध्ये बूकव्हीना हा भाग ऑस्ट्रियाने घेतला आणि १८१२ च्या बूकारेस्ट करारानुसार तुर्कस्तानने बेसारेबिया हा भाग रशियाला दिला. १८२२ मध्ये मॉल्डेव्हियाची सत्ता स्थानिक राज्यकर्त्यांकडे आली. १८२९ मध्ये खंडणीच्या मोबदल्यात याला रशियाचा संरक्षित प्रदेश म्हणून तुर्कस्तानने मान्यता दिली. क्रिमियाच्या युद्धामध्ये रशियाच्या तुर्कस्तानाकडून पराभव झाला (१८५४–५६). परिणामतः मॉल्डेव्हियासहित सर्व डॅन्यूबियन राज्यांनी आलेक्सांड्रू कूझा यास राजा म्हणून निवडले (१८५९). डॅन्यूबियन संघराज्याला रूमानिया या नावाने १८६१ मध्ये यूरोपीय देशांना मान्यता दिली [→ रूमानिया].

(२) मॉल्डेव्हियन सोव्हिएट सोशॅलिस्ट रिपब्लिक : रशियातील १५ घटकराज्यांपैकी एक. रशियाच्या नैर्ऋत्य कोपऱ्यात ते वसले आहे. युक्रेन राज्याने हा प्रांत जवळजवळ वेढलेला असून त्याची पश्चिम सरहद्द रूमानियास भिडते. प्रूट नदीने रूमानियाशी आणि नीस्तर नदीने युक्रेन घटक राज्याशी सरहद्द तयार होते. क्षेत्रफळ सु. ३४,००० चौ. किमी. लोकसंख्या सु. ४१,००,००० (१९८३). राजधानी किशिनेव्ह (५,८०,०००–१९८३).

रशिया-तुर्कस्तान यांच्या दीर्घकालीन संघर्षात हा प्रदेश वारंवार बळी पडलेला आहे. १७९१ मध्ये पूर्व मॉल्डेव्हिया रशियाच्या ताब्यात आला. पुढे १७९३ मध्ये, विशेषतः १८१२ मध्ये, रशियाने अधिक प्रदेश काबीज केला, त्यात बेसारेबियाचाही समावेश होता. तुर्कांच्या ताब्यातील उर्वरित असा मॉल्डेव्हियाचा प्रदेश पुढे १८१८ मध्ये रूमानियाच्या ताब्यात गेला. १९२४ मध्ये रशियाने युक्रेनमध्ये मॉल्डेव्हियन प्रजासत्ताक स्थापन केले. त्याची राजधानी त्यीरस्पॉल ही होती. १९४० साली बेसारेबिया हा भाग रूमानियाकडून रशियाने बळकविला. पुढे दक्षिणेकडील युक्रेनियन लोकवस्तीचा प्रदेश आणि उत्तरेकडील खत्यीनच्या आसपासचा प्रदेश युक्रेन राज्यात समाविष्ट करण्यात आला आणि उर्वरित भाग मॉल्डेव्हियन प्रजासत्ताक म्हणून स्थापन झाला. १९४१ मध्ये रूमानियाने घेतलेला हा प्रांत १९४४ मध्ये रशियाने पुन्हा जिंकून घेतला. 

रशियाच्या मुख्य पठारभूमीचा हा भाग दऱ्याखोऱ्यांनी भरलेला आहे. पूर्व व ईशान्य भाग नीस्तर नदीखोऱ्याचा आहे. अगदी उत्तरेकडे गवताळ प्रदेश आहे. व्हिसॉकाय हा उत्तरेकडील भाग चुनखडकांच्या रांगांसाठी प्रसिद्ध आहे. दक्षिणेकडे मैदानी प्रदेश आहे. नीस्तर व प्रूट या प्रमुख नद्या असून त्या दक्षिणवाहिनी आहेत. लहानमोठे जलप्रवाहही आहेत. सुपीक जमीन व सौम्य हवामान यांमुळे (काळ्या समुद्राच्या सान्निध्यामुळे) येथे गहू, कडधान्ये, सातू, तंबाखू, बीट, सोयाबीन, सूर्यफुले इ. पिके उत्तम येतात. अक्रोड, द्राक्षे, ऑर्किड, इत्यादींच्या बागाही मोठ्या प्रमाणावर आहेत. फुलांचे उत्पादनही महत्त्वाचे असून गुलाब, लव्हेंडर इ. सुगंधी द्रव्ये मोठ्या प्रमाणावर तयार होतात. पशुपालन, दुग्धोत्पादन, कापड उद्योग, मधुमक्षिकापालन, रेशीम उत्पादन हे उद्योगही विकसित झालेले असून अन्नप्रक्रिया, अभियांत्रिकी, धातुकाम, विद्युत्उपकरणे इ. व्यवसायही चालतात. 

येथील बहुसंख्य लोक मॉल्डेव्हियन आहेत (सु. ६५%). ज्यू, युक्रेनियन, रशियन, तुर्क, बल्गेरियन इ. लोकही आढळतात. रूमानियन भाषेशी साम्य असलेली मॉल्डेव्हियन भाषा हे लोक बोलतात. रशियन भाषेप्रमाणे ही भाषा सिरिलिक लिपीत लिहिली जाते. ⇨ किशिनेव्ह हे राजधानीचे शहर रशियन क्रांतिपूर्वकाळात ज्यू लोकांचे मोठे केंद्र होते. १९०३ मध्ये येथे मोठ्या प्रमाणावर ज्यू-हत्या करण्यात आली. त्यीरस्पॉल, बेट्सी आणि बिंद्‌येरी ही इतर महत्त्वाची शहरे आहेत. [→ रशिया].

जाधव, रा. ग.