अक्याब : ब्रह्मदेशातील आराकान विभागाचे व अक्याब जिल्ह्याचे प्रमुख शहर आणि बंगालच्या उपसागरातील महत्त्वा‍चे बंदर. लोकसंख्या ८०,५१३ (१९६९). कलदन, मायू व लेमरो या नद्यांनी बनविलेल्या त्रिभुज प्रदेशातील कलदन नदीकाठच्या एका बेटावर अक्याब वसले आहे. मच्छीमारीच्या धंद्यावर उपजीविका करणारे हे खेडेगाव १८२६ मध्ये ब्रिटिशांच्या ताब्यात गेल्यावर त्या भागातील तांदूळ निर्यातीचे प्रमुख बंदर बनले. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी ते जपानकडे गेले होते. अक्याब ब्रह्मदेशातील सर्व महत्त्वा‍च्या शहरांशी हवाई व सागरी मार्गांनी जोडलेले आहे. याच्या पाठीमागील आराकान योमा या उंच पर्वतामुळे ते देशातील इतर भूभागांशी सुलभ मार्गांनी जोडलेले नाही. शहरास ‘सित्‌त्वे’ असे आराकानी नाव असून त्याचा अर्थ ‘जेथे लढाई सुरू झाली’ असा होतो. येथील लोक बौद्ध, हिंदू व मुसलमान धर्माचे आहेत. येथील हवामान उष्ण व दमट असून वार्षिक पर्जन्य सरासरी ५०८ सेंमी. आहे. किनाऱ्यालगतचा भाग दलदलीचा असून कच्छ-वनश्रीने व्यापलेला आहे. येथे प्रामुख्याने भातसडीच्या गिरण्या असून इमारती लाकूड, काड्यापेट्या व कातडी कमाविणे ह्यांचे कारखाने आहेत. तसेच सुती व रेशमी कपडे विणणे हे उद्योगही येथे चालतात. शहरात बुद्धमंदिरे असून त्यांपैकी महामुनी हे सर्वांत मोठे आहे.

दातार, नीला