चित्तूर : आंध्र प्रदेश राज्यातील चित्तूर जिल्ह्याचे ठाणे. लोकसंख्या ६३,०३५ (१९७१). हे दक्षिण रेल्वेच्या बंगलोर-मद्रास मार्गावरील काटपाडी-रेनिगुंटा फाट्यावर काटपाडीच्या उत्तरेस सु. २९ किमी. व मद्रासच्या पश्चिमेस सडकेने सु. १६१ किमी. असून पोइनी नदीच्या खोऱ्यात सु. ३०० मी. उंचीवर वसलेले आहे. हे या भागातील शेतमालाच्या व्यापाराचे व वाहतुकीचे केंद्र असून येथे भाताच्या आणि तेलाच्या गिरण्या आहेत. एक साखर कारखाना असून औद्योगिक मद्यार्काचेही उत्पादन होते. येथे टायरदुरुस्ती, आगपेट्या, स्लेटपाट्या, शिवणदोरा, फळे टिकविणे, मिठाई, मालट्रक व बसगाड्या बांधणे इत्यादिकांचे कारखाने आणि चंदनाच्या व रक्तचंदनाच्या सुबक वस्तू बनविणे वगैरे इतर छोटे उद्योगही चालतात.

संकपाळ, ज. बा.