आमागासाकी : जपानच्या होन्शू बेटाच्या दक्षिणेकडील ह्योगो विभागातील शहर व ओसाका-कोबे औद्योगिक परिसरातील महत्त्वाचे केंद्र. लोकसंख्या ५, ५३, ६९६ (१९७०). ओसाका उपसागराच्या ईशान्य किनाऱ्यावर, योडो नदीकाठी, ओसाकाच्या वायव्येस हे औद्योगिक व व्यापारी शहर असून येथे धातुशुद्धीकरण, लोखंड व पोलाद, रसायने, कांचसामान, यंत्रे, बीअर, वीजनिर्मिती, अन्नपदार्थ इत्यादींचे कारखाने व कापडगिरण्या आहेत. येथून धातुसामान, औषधे, रंग, लाकडी वस्तू यांची मोठी निर्यात होते. दुसऱ्या महायुद्धातील विमानहल्ल्यात येथे खूपच पडझड झाली होती आता शहरबांधणीचे काम पूर्ण झाले आहे. लोहमार्ग व जलमार्ग यांची येथे उत्कृष्ट सोय आहे. औद्योगिक विभाग नदीकाठी असल्यामुळे त्याचे पुरापासून संरक्षण करणे आवश्यक झाले आहे.

ओक, द. ह.