फेज : मोरोक्कोतील इस्लाम संस्कृतीचे प्रमुख केंद्र, मोरोक्कोच्या चार पारंपरिक राजधान्यांपैकी एक व फेज प्रांताची राजधानी. लोकसंख्या ३,२५,३२७ (१९७१). हे राबातच्या पूर्वेस १५० किमी., सेबू नदीखोऱ्यात फेज नदीकाठी वसले असून दळणवळणाचे मोठे केंद्र आहे. पहिल्या इद्रिसने आठव्या शतकात (७९०) फेज नदीच्या डाव्या तीरावर मेदिनात फेज (फेज-एल्-बाली) हे शहर बसविले, तर उजव्या तीरावर दुसऱ्या इद्रिसने ८०८ मध्ये एलायू हे शहर वसविले. अकराव्या शतकात या दोन्ही शहरांचे एकत्रीकरण करण्यात आले. चौदाव्या शतकाच्या आरंभकाळात (मारीनिदचा काळ) हे शहर वैभवाच्या शिखरास पोहोचले. तत्कालीन संपूर्ण इस्लामी जगात त्याची किर्ती पसरली. १५४८ मध्ये हे मोरोक्कोत समाविष्ट करण्यात आले. यानंतर मात्र यास उतरती कळा लागली. पुढे फेज तहानुसार ३० मार्च १९१२ पासून त्यावर फ्रेंचांचा अंमल प्रस्थापित झाला.

शहराचे फेज-एल्‌-बाली (जुने शहर), फेज-एल्‌-जोदिद (नवे शहर) व नवीन यूरोपीय शहर असे तीन विभाग पडतात. हा प्रत्येक भाग एकमेकांपासून अलग आहे. जुने शहर नदीच्या पश्चिम (डाव्या) तीरावर आहे. या भागातील कारावीन ही मशीद आफ्रिका खंडात सर्वात मोठी समजली जात असून तेथेच कारावीन हे प्रसिद्ध विद्यापीठही (स्था. ८५९) आहे. येथे सु. ८०० मध्ये बांधलेली मूले इद्रिस ही मशीद अत्यंत पवित्र मानली जाते. यांशिवाय येथे अनेक सांस्कृतिक, धार्मिक स्मारके आहेत.

नवे शहर नदीच्या उजव्या तीरावर तेराव्या शतकात मारीनिद राजघराण्याने स्थापिले. या भागात राजवाडा व ज्यूंची सिनॅगॉग आहेत. येथील मशीद ही विविधरंगी व राजवाडा चित्रांकित मनोऱ्यासाठी प्रसिद्ध आहे. नवीन यूरोपीय शहर हे जुन्या शहराच्या आग्नेयीस असून ते १९१६ मध्ये मार्शल ल्वी गाँझाल्व्ह यूबेर ल्योते याने वसविले. हा भाग अनेक उद्याने, इमारती इत्यादींमुळे आकर्षक बनला आहे.

व्यापार आणि परंपरागत हस्तकला यांचे हे केंद्र असून लोकरी कापड, साबण, गालिचे, कातडी वस्तू इ. उद्योगांचा येथे विकास झालेला आहे. येथील शंक्वाकार लाल ‘फेज हॅट’ जगप्रसिद्ध असून या टोप्यांच्या उद्योगाचे हे एकोणिसाव्या शतकापर्यंत एकमेव केंद्र होते.

विसाव्या शतकातही याचे धार्मिक महत्त्व टिकून आहे. मुस्लिम यात्रिक फेजला फार मोठ्या संख्येने भेट देतात.

लिमये, दि. ह गाडे, ना. स.