भोज: (१) मध्य भारतातील एक प्राचीन जनपद. पुराणांतील उल्लेखांनुसार हे चंबळ व बनास या नद्यांच्या खोऱ्यात असून भिलवाडा हे शहर याच्या केंद्रस्थानी होते. हे जनपद विंध्य पर्वतरांगेत असल्याचा उल्लेख ब्रह्मांडवायु या पुराणांत आढळतो.

(२) जरासंधाच्या आक्रमणांमुळे उत्तरेकडील भोज राजांनी आपला राज्यविस्तार दक्षिणेस करण्यास सुरुवात केली. कौंडिण्यपूरचा राजा भीष्मक हा भोजांपैकी एक होय. रुक्मी हा त्याचा मुलगा व रुक्मिणी ही मुलगी. श्रीकृष्णाने रुक्मिणीहरण केल्यानंतर त्याच्याबरोबर झालेल्या युद्धात रुक्मीचा पराभव झाला. त्यामुळे त्याने कौंडिण्यपूर सोडून देऊन भोजकट ही नगरी वसविली. पुढे या शहराभोवती भोजकट साम्राज्याचा विस्तार झाला हे राज्य सहदेवाने (पांडवांपैकी एक) जिंकले होते, असा उल्लेख महाभारतात आढळतो. ही नगरी म्हणजे

अमरावती जिल्ह्यातील अचलपूरच्या (जुने एलिचपूर) नैर्ऋत्येस सु. ८ किमी.वरील भोजकट (अलीकडचे भातुकली) हे गाव असावे असे मानतात.

(३) महाभारतातील वर्णनानुसार भोज, भोजकट किंवा भोजकटपुर ही तिन्ही नावे एकाच नगराची असावीत. हे शहर नर्मदेच्या काठी प्राचीन विदर्भाच्या एका राजधानीचे ठिकाण असावे. मध्य प्रदेशातील विदिशेच्या आग्नेयीस सु. १० किमी.वर असलेले विद्यमान भोजपूर शहर म्हणजेच प्राचीन भोज अथवा भोजकट असावे, असे मानतात. पूर्वी विदिशा शहर व आसपासचा प्रदेश विदर्भातच होता असे अलेक्झांडर कनिंगहॅमचे मत आहे, त्यामुळे सांप्रतचे भोजपूर हेच प्राचीन भोज असावे, या मतास दुजोरा मिळतो.

चौंडे, मा. ल.