बर्ड, रिचर्ड ईव्हेलिन : (२५ ऑक्टोबर १८८८- ११ मार्च १९५७). दक्षिण व उत्तर ध्रुवांवर जाणारा पहिला अमेरिकन वैमानिक व समन्वेषक. व्हर्जिनिया राज्यातील विंचेस्टर येथे जन्म. १९१२ मध्ये त्याने अमेरिकन नौसैनिकी अकादनीची पदवी घेतली.नौदलातील सेवेतून पायाच्या दुखण्यमुळे १९१६ मध्ये निवृत्त झाल्यानंतर त्याने विमानोड्डाणाचे शिक्षण घेतले. पहिल्या महायुद्धाच्या वेळी (१९१८) कॅनडातील अमेरिकन वायुसेनेतील एक कमांडर म्हणून त्याने काम पाहिले.

रिचर्ड बर्ड हा १९२५ साली डोनाल्ड मॅकिमिलनसह आर्क्टिक प्रदेशाच्या सफरीवर गेला. या सफरीत उ. ग्रीनलंडचे सु. ७,७७० चौ. किमी. प्रदेशाचे व एल्झमीअर बेटाचे समन्वेषण करण्यात आले. ९ मे १९२६ रोजी बर्डने फ्लॉइड वेनेट या वैमानिकासह ‘फॉकर मोनोप्लेन’ विमानातून उत्तर ध्रुवावर तीन फेऱ्या मारल्या. १९२७ सालची अटलांटिक महासागर पार करण्याची बर्डची विमानमोहीम प्रतिकूल हवामानामुळे यशस्वी झाली नाही. २५ डिसेंबर १९२८ रोजी ‘बे ऑफ वेल्स’ या उपसागरी भागातील ‘लिटल अमेरिका’ या स्वंयस्थापित तळावरून त्याने अंटार्क्टिकाची  खंडाच्या हवाई सफरी केल्या. पुढील वर्षी बर्डने अंटार्क्टिकाची मोहिम हाती घेतली. रॉकफेलर पर्वतश्रेणी, मेरी बर्डलँड व इतर अज्ञात नवे भाग त्याने शोधून काढले. बर्डने आपल्या तीन सहकाऱ्यांसह २८ नोव्हेंबर १९२९ रोजी लिटल अमेरिका ठाण्यापासून दक्षिण ध्रुवापर्यंत सु.२,५११ किमी. अंतराचा यशस्वी विमान प्रवास केला. या कामगिरीमुळे त्यास रिअर ॲडमिरल या पदावर बढती मिळाली. अंटार्क्टिकाच्या दुसऱ्या मोहिमेत (१९३३-३५) बर्डने मोठा धोका पतकरून आघाडीच्या तळावर एकट्याने साडेचार महिने राहून संशोधन केले. या मोहिमेत त्याने सु. ५,१८,००० चौ.किमी. प्रदेशाचे समन्वेषण केले.

बर्डने अंटार्क्टिटिकाची तिसरी सफर १९३९ मध्ये केली. या सफरीत त्याने ध्रुवप्रदेशातील समुद्रकिनारा, खनिजसाठे इत्यादींचे नकाशे तयार केले. त्याच वेळी दुसरे महायुद्ध सुरू झाल्यानंतर त्याने नौदलात चांगली कामगिरी केली. बर्डने १९४६-४७ मध्ये अंटार्क्टिकाची चौथी सफर केली. ‘ऑपरेशन हाय जंप’ या मोहिमेत त्याने सु. ९,०६,४९७ चौ.किमी. प्रदेशाचा नव्याने शोध लावला. बर्डने ‘युनायटेड स्टेट्स अंटार्क्टिक प्रोग्रॅम’ या आंतरराष्ट्रीय भूभौतिकीय वर्षानिमित्त (१९५७-५८) आखलेल्या अंटार्क्टिकाच्या पाचव्या मोहिमेचे नियोजन केले. या मोहिमेत व्हिक्टोरिया लँड पीकच्या पश्चिमेकडील दोन पर्वतरांगांचा व वेडेल समुद्रापासूनच्या अंतर्वर्ती पर्वतरांगांचा शोध लागला. बॉस्टन येथे त्यांचे निधन झाले. स्काय बर्ड (१९२८), लिटल अमेरिका (१९३०), डिस्कव्हरी (१९३५) व अलोन (१९३८) ही त्याची पुस्तके होत.

गाडे, ना. सा.