रेड नदी: (१) रेड रिव्हर ऑफ द साउथ. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानातील मिसिसिपी नदीची दक्षिणेकडील मोठी उपनदी. लांबी १,९६७ किमी. जलवाहन क्षेत्र २,४१५०१ चौ. किमी. देशाच्या दक्षिण भागातून सर्वसाधारणपणे वायव्य-आग्नेय दिशेने वाहणारी ही नदी ‘प्रेअरी डॉग टाउन फोर्क’ व ‘सॉल्ट फोर्क’ या दोन प्रमुख प्रवाहांपासून बनते. त्यांपैकी पहिला प्रवाह महत्वाचा असून त्याचा उगम टेक्सस राज्यातील पॅनहँडल भागात ॲमेरिलो शहराच्या नैर्ऋत्येस होतो. हा प्रवाह पूर्वेस व्हर्ननपर्यंत गेल्यावर उत्तरेकडून त्याला सॉल्ट फोर्क मिळतो आणि येथपासून त्यांचा संयुक्त प्रवाह रेड नदी या नावाने ओळखला जातो. पुढे ही नदी टेक्सस व ओक्लाहोमा आणि टेक्सस व आर्कॅन्सॉ राज्यांच्या सरहद्दींवरून पूर्व दिशेने वाहत जाते. टेक्सारकॅना शहराजवळ ती आर्कॅन्सॉ राज्यांत प्रवेश करते व फुल्टनपर्यंत पूर्व दिशेने वाहत जाऊन एकदम दक्षिणेस वळून लुइझिॲना राज्यातून आग्नेय दिशेने वाहते. वॉशिटॉ नदीसंगमानंतर या नदीपासून दोन फाटे फुटतात. त्यांपैकी एक अचॅफालाइआ नावाने दक्षिणेस मेक्सिकोच्या आखाताला मिळतो तर दुसरा ओल्ड रिव्हर (लांबी सु. ११ किमी) नावाने मिसिसिपी नदीला उजव्या बाजूने मिळतो. पीस, सल्फर, विचिटॉ, वॉशिटॉ, काइमिशी इ. रेड नदीच्या उपनद्या आहेत.

ही नदी सुरुवातीला टेक्सस राज्यातील निमओसाड प्रदेशातून व खोल दऱ्यांतून, तर त्यापुढे मात्र तांबड्या मातीच्या व शेतीयोग्य सुपीक प्रदेशातून वहाते. तांबड्या मातीमुळे हिच्या पाण्याचा रंग लाल बनला असून त्यायोगे तिला ‘रेड रिव्हर’ असे नाव पडले. या नदीवर अनेक धऱणे बांधून पूरनियंत्रण व जलसिंजन हे हेतू साध्य झाले आहेत. डेनिसन (१९४३) हा या नदीवरील बहुद्देशीय प्रकल्प असून त्याचा लेक टेक्सोमा हा देशातील एक मोठा जलाशय आहे. याशिवाय लेक टेक्सारकॅना वालस , वायू बोदकाऊ इ. जलाशय उपनद्यांवर निर्माण करण्यात आले असून त्यांमुळे पूरनियंत्रण मोठ्या प्रमाणात झाले आहे. रेड नदीमुखापासून श्रीव्हपोर्ट (लुइझिॲना) शहरापर्यंत नावांतून वाहतूक चालते. डेनिसन, श्रीव्हपोर्ट, ॲलेकझांड्रिया इ. या नदीवरील प्रमुख शहरे आहेत.

अमेरिकन यादवी युद्धाच्या वेळी जनरल एन्.पी.वँक्स व ॲडमिरल पोर्टर यांनी रेड नदीमार्गे टेक्ससपर्यंत जाण्यासाठी संघीय लष्कराद्वारे शोधमोहिम हाती घेतली होती (१८६४) परंतु सवीन क्रॉसरोड्स येथे त्यांचा पराभव झाला.

(२) रेड रिव्हर ऑफ द नॉर्थ अमेरिकेची संयुक्त संस्थाने व कॅनडा या देशांतून दक्षिणोत्तर वाहणारी नदी. लांबी सु. ८५८ किमी. जलवाहन क्षेत्र १,०४,११८ चौ.किमी. अ.सं.सं. च्या साउथ डकोटा राज्यातून येणारी बॉई द सू व मिनेसोटा राज्यात उगम पावणारी ऑटर टेल या नद्या ब्रेकनरिज व वाहपेटन या जुळ्या शहरांजवळ एकत्र मिळतात व तेथपासून त्यांचा संयुक्त प्रवाह रेड नदी अथवा रेड रिव्हर ऑफ द नॉर्थ या नावाने ओळखला जातो. प्राचीन ॲगसी सरोवर प्रदेशातून वाहणारी ही नदी वॉपटनपासून सरळ उत्तरेस वाहत जाऊन एमर्सन शहराजावळ कॅनडात प्रवेश करते व पुढे विनिपेग सरोवराला जाऊन मिळते.

ही नदी प्रेअरीच्या मैदानी प्रदेशातून वाहत असल्याने संथ असून जलवाहतुकीसाठी उपयुक्त ठरते. तसेच हिच्या खोऱ्यात गहू व फ्लॅक्स यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होत असून जलसिंचनाच्या दृष्टीने तिचा उपयोग करून घेण्यात आला आहे. या नदीमुळे अ.सं.सं. मधील मिनेसोटा व नॉर्थ डकोटा या राज्यांदरम्यान सु. ७१० किमी. लांबीची नैसर्गिक सरहद्द बनली आहे. शायेन ,रेड लेक रिव्हर (अ.सं.सं) असिनबॉइन (कॅनडा) या तिच्या प्रमुख उपनद्या आहेत. फार्गो (अ.सं.सं.) व विनिपेग (कॅनडा) ही या नदीवरील प्रमुख शहरे व व्यापारी केंद्रे आहेत.

फ्रेंच दर्यावर्दी प्येर गोत्ये दा व्हारेन ला व्हेरांद्री याने १७३२-३३ मध्ये या नदीचे समन्वेषण केले .या नदीतून वाहून येणाऱ्या तांबूस तपकिरी रंगाच्या गाळामुळे त्याने नदीला ‘रेड रिव्हर’ हे नाव दिले. १८११ मध्ये लॉर्ड सेल्कर्कने या नदीखोऱ्यात शेती करण्याच्या उद्देशाने प्रथम वसाहत केली. नदीखोऱ्यात मुख्यत्वे धान्य, बटाटे, साखरबीट इ. पिके घेतली जातात. या भागात गुरे पाळण्याचा व्यवसायही मोठ्या प्रमाणावर चालतो. नदीमुखाजवळ वाहतुकीच्या सोयीसाठी जलपाश बसविण्यात आलेले आहेत.

(३) चीन व उ. व्हिएटनामधून वायव्य-आग्नेय दिशेने वाहणारी एक प्रमुख नदी. लांबी १,१७५ किमी. ही चीनमध्ये यूआन्ज्यांग या नावाने ओळखली जात असून तिचा उगम चीनच्या युनान प्रांतातील अर् हाई सरोवराच्या दक्षिणेस सु. १,८२९ मी. उंचीवर होतो. पहिल्या टप्प्यात ही नदी खोल व अरूंद निदऱ्यांतून वाहते. नदीतून वाहून येणाऱ्या गाळात तांबड्या आयर्न ऑक्साइडाचे प्रमाण जास्त असल्याने पाण्याच रंग लाल दिसतो व यावरून तिला रेड नदी हे नाव देण्यात आले आहे. व्हिएटनाममध्ये हानोईच्या वायव्येस ही नदी किनारी मैदानी प्रदेशात प्रवेश करते. या भागात व्ह्येत्री शहराजवळ तिला उजवीकडून दा (ब्लॅक) व डावीकडून क्लिअर या तिच्या प्रमुख उपनद्या येऊन मिळतात. पुढे आग्नेयीस ही नदी टाँकिनच्या आखाताला मिळते. मुखाजवळ या नदीने सु. १२० किमी. लांब व १२० किमी.रूंदीचा त्रिभुज प्रदेश निर्माण केला आहे. हा प्रदेश व्हिएटनामच्या अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा भाग मानला जातो. याच प्रदेशाच्या उत्तर फाट्यावर हायफाँग हे देशातील महत्त्वाचे बंदर आहे.

भात हे नदीखोऱ्यांतील प्रमुख पीक असून गहू, कडधान्ये, मोहरी, मका इ. पिकांचेही उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. नदीतून होणारा अनियमित पाणीपुरवठा व जून ते ऑक्टोबर याकाळातील पुरामुळे होणारे नुकसान यांवर उपाय म्हणून नदीवर अनेक बंधारे बांधून कालव्यांद्वारे जलसिंचनाचीही व्यवस्था करण्यात आलेली आहे. नदीखोऱ्यात वाहतूकमार्गाचे जाळे पसरलेले असून चीन आणि उ. व्हिएटनाम यांना जोडणारा लोहमार्ग व राष्ट्रीय महामार्ग नदीला समांतर गेले आहेत. यूआन्ज्यांग, मानहाऊ (चीन) व लाडकाई, व्होत्री, शनटाई, हानोई (व्हिएटनाम) ही या नदीवरील प्रमुख शहरे आहेत.

चौंडे, मा. ल.