वायकिकी : पॅसिफिक महासागरातील हवाई बेटांपैकी अवा बेटावरील जगप्रसिद्ध पुळण व पर्यटनक्षेत्र. होनोलूलू परगण्यातील अवा बेटाच्या आग्नेय भागात मामला उपसागराच्या किनाऱ्यावर ही पुळण आहे. होनोलूलू शहराच्या आग्नेयीस डायमंड हेड या ज्वालामुखी पर्वतशिखरापर्यंत सु. ४ किमी. लांबीच्या किनारी प्रदेशाचा यात समावेश होतो. किनाऱ्यावरील नारळीच्या बागा, मत्स्य-पल्वले, दूरपर्यंत पसरलेल्या तारो वृक्षांच्या रांगा इत्यादींमुळे बेटांवरील पूर्वीच्या राजे लोकांचे हे अत्यंत लोकप्रिय पर्यटनक्षेत्र होते. वायकिकी या हवाईयन भाषेतील शब्दाचा अर्थ उसळणारे पाणी असा असून येथील किनारा फेसाळत्या प्रचंड लाटांसाठी प्रसिद्ध आहे. त्या लाटांवर होड्यांच्या चित्तथरारक कसरती करणे हा येथील प्रसिद्ध खेळ आहे. किनाऱ्यावर अनेक विलासी हॉटेले असून नौकाविहार व जलक्रिडेच्या सर्व सोयी येथे उपलब्ध आहेत. जलजीवालय, सुंदर उद्याने, ६२ हेक्टर क्षेत्रफळाचे कॅपिओलानी उद्यान व त्यातील होनोलूलू प्राणिसंग्रहालय, आंतरराष्ट्रीय बाजार केंद्र ही पर्यटकांची प्रमुख आकर्षणे आहेत. सैनिकी मनोरंजन प्रदेश म्हणूनही येथील रूझी किल्ला व परिसर प्रसिद्ध आहे.

चौधरी, वसंत