निंगशिआ : वायव्य चीनमधील एक प्रांत. याच्या उत्तरेस इनर मंगोलिया, वायव्येस, पश्चिमेस, दक्षिणेस व पूर्वेस कान्सू आणि ईशान्येस चीनची प्राचीन भिंत असून याचे क्षेत्रफळ ६६,४०० चौ. किमी. आहे. लोकसंख्या २०,००,००० (१९७२ अंदाज). पूर्वीचा निंगशिआ प्रांत १९५४ मध्ये शेजारच्या कान्सू प्रांतात विलीन करण्यात आला. परंतु १९५६ मध्ये यातील मंगोल वस्तीचा भाग इनर मंगोलियात समाविष्ट करण्यात आला व १९५८ मध्ये शेष विभागाला स्वायत्त प्रांताचा दर्जा देण्यात आला. इनर मंगोलियाच्या पठाराचाच हा एक भाग असून बहुतेक प्रदेश वाळवंटी आहे. याच्या उत्तर भागातून पीत नदी वाहते व तोच भाग काहीसा सुपीक आहे. बाकीचा भाग गवताळ कुरणांचा आहे. यिंच्वान या राजधानीव्यतिरिक्त निंगशिआत मोठी शहरे नाहीत. या भागात मानवी वस्ती फार प्राचीन काळापासून आहे, हे येथील पीत नदीवरील इ. स. पू. २२० मध्ये बांधलेल्या कालव्यांवरून सिद्ध होते. दळणवळणाच्या सोयी फारच अपुऱ्या आहेत. लमाणी तांड्यांच्या पुरातन मार्गावरच काही लहान वस्त्या असून आजही वाहतूक त्याच मार्गावरून चालते. वार्षिक पर्जन्य २०० मिमी. असून हवामान खंडीय प्रकारचे असते. कमाल सरासरी तपमान २७° से. तर किमान सरासरी –१४° से. असते. या प्रांतात हान, हुई, मंगोल, मांचू इ. वंशाचे लोक असून त्यांपैकी हुईंची (चिनी मुसलमानांची) संख्या जास्त आहे. मँडरीन, चिनी, तिबेटी, मंगोली या भाषा येथे बोलल्या जातात.

हा प्रदेश संपूर्णपणे ग्रामीण असून लोक बहुतेक शेतीवरच अवलंबून आहेत. चीनमधील हा भाग अतिशय विरळ वस्तीचा असून लोकसंख्येची घनता दर चौ. किमी.स १३ आहे. हा प्रांत पूर्वीपासून फार मागासलेला होता. परंतु १९४९ पासून कम्युनिस्ट राजवट आल्यामुळे सर्व बाबतींत विकास होत आहे. कालव्यांच्या पाण्यावर चांगल्या प्रतीचा गहू व तांदूळ पिकतो. तीळ व साखरबीट ही नगदी पिके होत. तसेच मिश्रशेती व कुरणांच्या भागात चांगल्या प्रतीच्या मेंढ्या पोसल्या जातात. भात, गहू, कापूस, केओलिआंग, पावटा, पालेभाज्या व फळे ही महत्त्वाची पिके होतात. खरबुजे व जरदाळू यांचेही मोठ्या प्रमाणात पीक घेतले जाते. कातडी, लोकर यांचा व्यापार हा प्रांतातील प्रमुख व्यवसाय आहे. या प्रांतात खनिज संपत्ती विपुल नाही. फक्त कोक कोळशाचे साठे इनर मंगोलियाच्या सीमेजवळील पींगलो भागात आहेत. १९५८ पासून लोहमार्गाची सोय झाल्यामुळे येथे उद्योगधंद्यांची वाढ झाली असून त्यांत शेतीअवजारे व रेशमी वस्त्रोद्योग हे मुख्य आहेत.

कांबळे, य. रा.