इंडोचायना : आग्नेय आशियातील एक ऐतिहासिक प्रदेश. प्राचीन काळापासून तेथे हिंदू व चिनी संस्कृतींचे अस्तित्व असल्यामुळे त्याला फ्रेंच अमलाखाली असताना दिलेली इंडोचीन, इंडोचायना ही नावे रूढ झाली. इंडोचायनामध्ये लाओस, अनाम (मध्य व्हिएटनाम), कोचीन चायना (दक्षिण व्हिएटनाम), टाँकिन (उत्तर व्हिएटनाम) व कंबोडिया इ. लहान लहान राज्यांचा फ्रेंचांनी समावेश केला होता. याच प्रदेशात इतिहासकाळात ख्मेर, चंपा, अनाम इ. समृद्ध राज्ये होऊन गेली. सतराव्या शतकात फ्रेंचांनी येथे व्यापारानिमित्त प्रवेश केला आणि १८८७ पर्यंत लाओस, अनाम, कोचीन चायना, कंबोडिया व टाँकिन ही सर्व राज्ये फ्रेंच सत्तेखाली आली. दुसऱ्या महायुद्धात हा भाग जपानी अमलाखाली होता. महायुद्धानंतर फ्रान्सने ह्या भागाला बरीच स्वायत्तता देऊन संघराज्य करण्याचे जाहीर केले. लाओस व कंबोडियाने यास मान्यता दर्शविली परंतु बाकीच्या राज्यांतील कम्युनिस्ट गनिमांनी फ्रेंचांविरुद्ध लढाई सुरू केली. व्हिएटनाम युद्धात फ्रेंचांचा पराभव होऊन, १९५४ च्या जिनिव्हा परिषदेच्या ठरावानुसार फ्रेंचांनी सत्ता सोडली. तथापि उत्तर व दक्षिण व्हिएटनाममधील युद्ध १९७१-७२ पर्यंत चालू होते.

जोशी, चंद्रहास