बाझेल : स्वित्झर्लंडमधील इतिहासप्रसिद्ध शहर. बाझेल कँटनचे बाझेल-लांट व बाझेल-श्टाट असे दोन विभाग असून त्यांपैकी बाझेल-श्टाटचे हे प्रमुख ठिकाण आहे. लोकसंख्या १,८५,॰॰॰ (१९७८ अंदाज). हे झुरिकच्या वाय येस ८८.५ किमी. बिर्स व व्हीझ या नद्यांच्या मुखांवर ऱ्हाईन नदीकाठी वसले आहे. फ्रान्स, प. जर्मनी व स्वित्झर्लंड यांच्या सरहद्दींजवळ मोक्याच्या ठिकाणी हे शहर असल्याने देशाच्या उत्तर सीमेवरील स्वित्झर्लंडचे सोनेरी प्रवेशद्वार असे यास म्हणतात.प्राचीन काळी येथे केल्टिक टोळ्यांची वस्ती होती. इ.स. ३७४ च्या सुमारास रोमनांनी या नगरास केलेल्या तटबंदीमुळे त्यास ‘बॅसिलिया’ हे नाव मिळाले. इ.स. पाचव्या शतकाच्या सुरुवातीला ऑगस्टस राउरिका या रोमन कॅथलिक बिशपने आपले मुख्य कार्यालय येथे स्थापन केले. पोप दुसरा पायस याने देशातील पहिले विद्यापीठ (१४६॰) येथेच स्थापन केले. या ठिकाण ‘एक्युमेनिकल कौन्सिल’ काही काळ (१४२१ – ४९) होते. १५॰१ मध्ये स्विस संघराज्यात बाझेल समाविष्ट करण्यात आले. सुप्रसिद्ध डच शास्त्रज्ञ ⇨ इरॅस्मस येथील विद्यापीठात अध्यापक होता (१५२१ – २९). त्यामुळे प्रबोधनकालीन मानवतावाद व धर्मसुधारणा आंदोलन यांचे हे एक केंद्रच बनले होते. यूरोपातील प्रतिधर्मसुधारणा आंदोलनामुळे अनेक यूरोपीय कुशल कामगार येथे आले. परिणामत: विविध व्यापारी संघटना (गिल्ड्स) वेगाने उदयास येऊन अठराव्या शतकात येथील राजकीय सत्ता त्या संघटनांच्या हाती गेली. ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष करून शहराचा विकास करण्यावर या संघटनांनी भर दिला. त्यामुळे ग्रामीण भागातील लोकांनी बंड करून १८३२ मध्ये आपला स्वतंत्र विभाग (कँटन) घोषित केला. यातूनच १८३३ मध्ये बाझेल-लांट हे स्वतंत्र ग्रामीण अर्ध-कँटन व बाझेल-श्टाट हे शहरी अर्ध-कँटन अस्तित्वात आले.उत्तरवाहिनी ऱ्हाईनमुळे शहराचे ग्रेटर बाझेल (नैऋत्य भाग) व लेसर बाझेल (ईशान्य भाग) असे दोन भाग झालेले असून सहा पुलांनी ते जोडलेले आहेत. ग्रेटर बाझेल व्यापारी व सांस्कृतिक केंद्र म्हणून, तर लेसर बाझेल औद्योगिक दृष्टया महत्त्वाचे आहे. बाझेल शहरातील गॉथिक शैलीतील प्रॉटेस्टंटाचे कॅथीड्रल प्रसिद्ध असून त्यातच इरॅस्मसचे थडगे आहे. नगरभवन (१५॰४-२१), सर्वात जुने सेंट मार्टिनचे चर्च फ्रॅन्सिस्कन चर्च (चौदावे शतक) या काही उल्लेखनीय मध्ययुगीन वास्तू असून त्यांपैकी फ्रॅन्सिस्कन चर्चमध्ये ऐतिहासिक वस्तुसंग्रहालय आहे. पंधराव्या शतकातील सेंट पॉलचे महाद्वार सर्व यूरोपात उत्कृष्ट मानले जाते. याशिवाय शहरात मध्ययुगीन व्यापारी संघटनांच्या अनेक इमारतीही आहेत. येथील सार्वजनिक कलावीथी (१६६२) प्रसिद्ध असून तीत अनेक कलावंतांच्या कलावस्तू जतन केलेल्या आहेत. विद्यापीठाच्या ग्रंथालयात मार्टिन ल्यूथर, इरॅस्मस, हुल्ड्रिक झ्विंग्ली, फिलिप मेलँकथॉन यांची हस्तलिखिते व एक्युमेनिकल कौन्सिलचा जुना दस्तऐवज जतन केलेला आहे.बाझेल आंतराष्ट्रीय व्यापाराचे केंद्र आहे. येथे बँक फॉर इंटरनॅशनल सेटल्मेंट्स (बीआय्एस्-स्था.१९२९) असून यूरोपातील लोहमार्गांचेही ते महत्त्वाचे केंद्र आहे. रसायने व औषधे, अन्नप्रक्रिया यांच्या उद्योगांचेही हे केंद्र आहे. यांशिवाय विद्युत् अभियांत्रिकी, यंत्रसामग्री, रेशमी कापड इ. उद्योगही येथे विकसित झाले आहेत. येथूनच प्रॉटेस्टंट धर्मसुधारणावादी विचारांचे निवेदर ‘कन्फेशन ऑफ बाझेल’ प्रसिद्ध करण्यात आले. १५३४ मध्ये या शहराच्या प्रमुखांनी ते स्वीकारले. रोमन कॅथलिक चर्चची सर्वसाधारण परिषद येथे पोप पाचवा मार्टिन याने बोलावली होती (१४३१). आंतरराष्ट्रीय महत्त्वाचे काही तहही या शहरी घडून आले. पवित्र रोमन साम्राज्य आणि स्विस संघराज्य यांच्यातील युद्धाचा शेवट येथील २२ सप्टेंबर १४९९ च्या तहाने झाला आणि स्विस स्वातंत्र्याला प्रत्यक्षात मान्यता देण्यात आली. फ्रेंच राज्यक्रांतीच्या काळात फ्रान्सने रशिया व स्पेन यांच्याबरोबर अनुक्रमे ५ एप्रिल व २२ जुलै १७९५ रोजी येथेच तह केले होते.

गाडे, ना. स.