फ्रेझर नदी : कॅनडाच्या ब्रिटिश कोलंबिया प्रांतामधील सर्वात लांब व प्रमुख नदी. रॉकी पर्वतरांगेतील रॉब्सन पर्वतात यलोहेड खिंडीपाशी उगम पावून जॉर्जियाच्या आखातापाशी पॅसिफिक महासागराला ती मिळते. तिची लांबी सु. १,२६५ किमी. असून जलवाहन क्षेत्र सु. २,१७,५५९ चौ. किमी. आहे. उगमापासून मुखापर्यंत तिच्या प्रवाहाचा आकार इंग्रजी एस् (S) या अक्षरासारखा आहे. रॉकी पर्वताच्या खोलगट प्रदेशातून ही वायव्येस सु. २४० किमी. गेल्यानंतर पश्चिमेकडे वळून ८० किमी. वाहते. या ठिकाणी म्हणजे प्रिन्स जॉर्ज शहराजवळ तिला निजॅको ही उपनदी मिळते. यापुढे फ्रेझर ५६० किमी. वाहत जात असतानाच तिच्या शीघ्र प्रवाहामुळे येल व लिटन या शहरांदरम्यान ११२ किमी. लांबीची कॅन्यन तयार झाली आहे. या कॅन्यनच्या उभ्या कड्यांची उंची ९१४ मी. असून ही कॅन्यन हिरव्यागार कुरणांसाठी आणि निसर्गसौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. फ्रेझरच्या मधल्या टप्प्यात तिला कनेल, टॉमसन या नद्या पूर्वेकडून, तर चिल्कोटीन, ब्लॅक वॉटर या नद्या पश्चिमेकडून मिळतात. टॉमसन आणि फ्रेझर यांच्या संगमावर कॅमलून्स हे शहर वसले आहे. कॅनडियन पॅसिफिक लोहमार्ग व ट्रान्स-कॅनडा मार्ग बहुतांशी यांच्या काठानेच गेले आहेत. ही नदी तिच्या मुखापासून आत सु. १४५ किमी. नौकासुलभ असून इतरत्र ती दळणवळणास उपयुक्त नाही. सॅमन माशांसाठी ती प्रसिद्ध आहे, यामुळेच तिच्या मुखाकडील प्रदेशात मासे डबाबंद करण्याचा व्यवसाय फार मोठ्या प्रमाणावर चालतो.

फ्रेझरचा शोध १७९३ मध्ये अलेक्झांडर मार्केझीने लावला असला, तरी उगमापासून मुखापर्यंतच्या प्रदेशाचे समन्वेषण एकोणिसाव्या शतकात सायमन फ्रेझरनेच केले आहे. म्हणून त्याचेच नाव या नदीला देण्यात आले आहे. १८५८ मध्ये कॅरिबू जिल्ह्यात सोन्याच्या खाणींचा शोध लागण्यापूर्वी या नदीमार्गे फरचा मोठा व्यापार चालत असे. त्यासाठीच हिच्या मुखापाशी १८२७ मध्ये व्हँकूव्हर हे शहर वसविण्यात आले. जलविद्युत्‌निर्मितीसाठी फ्रेझरचा अजून फारसा उपयोग करून घेतलेला नाही. तिच्या मुखापाशी लाकूड कापणे, कागद लगदा व कागद तयार करणे, मत्स्यव्यवसाय यांसारखे विविध उद्योग विकसित झालेले आहेत.

उपाध्ये, मु. कृ. कापडी, सुलभा