साक्री : धुळे जिल्ह्यातील याच नावाच्या तालुक्याचे मुख्य ठिकाण. लोकसंख्या १७,५५७ (२००१). हे कान नदीच्या (पांझरा नदीची उपनदी) काठावर धुळे शहराच्या वायव्येस सु. ५० किमी. सुरत–नागपूर या राष्ट्रीय महामार्ग क्र .सहावर वसले आहे. हे गाव मूळचे पिंपळनेर तालुक्यातील असून १८८७ मध्ये पिंपळनेर येथील तालुक्याचे मुख्यालय साक्री येथे हलविण्यात आले व १९०८ मध्ये तालुक्याचे नावही साक्री करण्यात आले. याच्या परिसरात गावित, कोकणा, भिल्ल, पावरा, मावची, कातकरी, वंजारी इ. जमातींचे प्रमाण जास्त आहे. येथील हवामान उष्ण व कोरडे असून वार्षिक सरासरी पर्जन्यमान ६० सेंमी. आहे. परिसरातील ऊस, कापूस, भुईमूग, ज्वारी इ. शेतमालाची साक्री ही बाजारपेठ असून जिल्ह्यांतील या उत्पादनांची प्रमुख बाजारपेठ म्हणून या शहराची ओळख आहे. साक्री तालुक्यातील भाडणे येथे पांझरा-काना सहकारी साखर कारखाना कार्यरत आहे. तसेच आशिया खंडातील सर्वांत मोठा पवनउर्जा प्रकल्प ब्राह्मणवेल या साक्री नजीकच्या गावी आहे. साक्रीतील अक्कलपाडा तलाव, गोमटेश्वर मंदिर, नागझरी व नागाईदेवीचे मंदिर इ. प्रसिद्घ स्थळे आहेत. तालुक्यातील बळसाणे हे यादवकालीन मंदिरसममूहासाठी व कलात्मक ⇨ वीरगळांसाठी प्रसिद्घ असलेले ठिकाण शहराच्या उत्तरेस आहे.

भटकर, जगतानंद