बोकारो :  आधुनिक भारताचे ‘पोलादनगर’ म्हणून ओळखले जाणारे हे शहर बिहार राज्याच्या हजारीबाग जिल्ह्यात आहे. लोकसंख्या २,६१,२४० (१९८१). हे हजारीबाग शहरापासून ७२ किमी. आग्नेयीस, धनबादच्या पश्चिमेस सु. ७० किमी. बोकारो नदीवर वसलेले आहे. बोकारो लोहमार्ग प्रस्थानक असून ते रांची, हजारीबाग व धनबाद या शहरांशी सडकांनी जोडलेले आहे. दामोदर योजनांतर्गत बोकारो धरणाच्या पूर्वेस व कोनार धरणाच्या दक्षिणेस हे शहर येते.

पोलाद उद्योगामुळे १९६० पूर्वीच्या ह्या लहानशा खेड्याचे एका नवीन उद्योगनगरात रुपांतर झाले. बोकारो कारखाना म्हणजे भारताच्या सार्वजनिक क्षेत्रातील पहिला स्वदेशी पोलाद कारखाना होय. १९६५ मध्ये बोकारो प्रकल्प उभारणीला प्रारंभ झाला. भिलाई, राउरकेला आणि दुर्गापूर येथील पोलाद कारखाने पूर्णतः उभारणी केलेले प्रकल्प होते. त्यांच्या उभारणीकरिता बहुतांश साधन-सामग्री आयात करावी लागली होती तसे बोकारो प्रकल्पाबाबत झाले नाही. प्रारंभीच्या अवस्थेत याच्या उभारणीसाठी ३९ टक्के साधनसामग्री आयात करण्यात आली हळूहळू हे प्रमाण १६ टक्क्यांपर्यत कमी झाले. प्रकल्प उभारणीसाठी सर्व प्रकारचे साहित्य हेवी एंजिनिअरिंग कॉर्पोरेशन, मायनिंग अँड अलाइड मशीनरी कॉर्पोरेशन या निगमांनी पुरविले (प्रकल्पाची उभारणी गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड एंजिनिअर्स, जेसप अँड कंपनी व इन्स्ट्रूमेंटेशन लिमिटेड (कोटा, राजस्थान) या कंपन्यांनी केली. संयंत्र उभारणी व बोकारो नगरउभारणी या दोन्ही जबाबदाऱ्या हिंदुस्थान स्टील वर्क्स कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशन लि. या कंपीने उचलल्या. मेकॉन ही कंपनी बोकारो प्रकल्पविस्ताराचा अभिकल्प तयारी करीत आहे. वरील सर्व कंपन्या भारतीय आहेत.

बोकारो कारखान्यातून पोलादी पत्रे, तारा, पट्‌ट्या, पाट पिंड (योग्य आकारमानाचे ठोकळे) व विक्रीयोग्य पोलाद यांचे उत्पादन केले जाते. पाचव्या पंचवार्षिक योजनेच्या अखेरपर्यंत बोकारो कारखान्याची पोलाद पिंडांची उत्पादनक्षमता ४० लक्ष टनांपर्यंत नेण्याचा महत्त्वाकांक्षी विस्तारकार्यक्रम हाती घेण्यात आला. बोकारो प्रकल्पामधील पोलादी पाटांचे उत्पादन करणारा यंत्रविभाग व लांब पोलादी पट्‌ट्याचे उत्पादन करणारा दुसरा विभाग हे देशातील सर्वांत अत्याधुनिक स्वरुपाचे व सर्वांत मोठे समजले जातात. अशा प्रकारचा कारखाना फक्त रशियातच उभारण्यात आलेला आहे. या कारखान्यामधून पातळ पत्रे व तारा यांचे उत्पादन पहिल्या टप्प्यात सु. ९० हजार टन, तन दुसऱ्या टप्प्यात १७ लक्ष टन करण्याची योजना होती. पोलादी पत्र्यांच्या उत्पादनामुळे भारताला प्रतिवर्षी कराव्या लागणाऱ्या आयात खर्चात ५०० कोटी रुपयांची बचत करता येणे शक्य होणार आहे. १९७५ मध्ये या प्रकल्पामधील तिसरी कोक भट्टी मालिका, दुसरा सिंटर बँड, दुसरी झोतभट्टी, (पाचांपैकी) तिसरा एल्‌. डी. परिवर्तक इत्यादींचे बांधकाम पूर्ण करण्यात येणार होते. येथे उत्पादित होणाऱ्या लांब पोलादी पट्‌ट्या, रासायनिक संयंत्रे, खनिज तेल संशोधन, नळनिर्मितिउद्योग यांकरिता उपयुक्त ठरलेल्या आहेत. बोकारो प्रकल्पाद्वारा (झोतभट्टीतून मिळणाऱ्या) कच्च्या लोखंडाची निर्यात रशिया व जपान या देशांना मोठ्या प्रमाणावर केली जाते. भारतातील ओतकामाच्या भटट्यांना लागणाऱ्या एकूण कच्च्या लोखंडापैकी सु.५० टक्के लोखंड एकट्या बोकारा प्रकल्पाकडून पुरविले जाते. बोकारो पोलाद कारखान्याची पोलाद पिंड व विक्रीयोग्य पोलाद यांची उत्पादनक्षमता अनुक्रमे २५ लक्ष व २० लक्ष टन आहे. १९८३ अखेरपर्यंत पोलाद पिंडांची उत्पादनक्षमता ४० लक्ष टनांपर्यंत वाढविली जाणार आहे. या कारखान्यातून १९७८-७९ व १९७९-८० या दोन वर्षांतीत पोलाद पिंड, विक्रीयोग्य पोलाद व कच्चे लोखंड यांची उत्पादन आकडेवारी अनुक्रमे पुढीलप्रमाणे होती (लक्ष टनांत) : ११.९५, ९.३१, ६.०८ १४.२६, ८.४९, २.८०.

पोळाद कारखान्यातील एक दृश्य, बोकारो.

बोकारो प्रकल्पावर चौथ्या योजनेच्या अखेरपर्यंत (३१ मार्च १९७४) सु. ९०० कोटी रु. खर्ची पडले आहेत. पाचव्या योजनाकाळात या प्रकल्पावर आणखी ५२० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली यामुळे केवळ ४० लक्ष टन उत्पादनक्षमतेपर्यंतच न थांबता, त्याहीपुढे ४७.५० लक्ष टनापर्यंत उत्पादनक्षमता वाढविण्याचे उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले आहे. भारत-रशिया यांच्यामधील १९७३ मध्ये झालेल्या १५ वर्षीय आर्थिक व तांत्रिक सहकार्य करारानुसार बोकारो प्रकल्पाची उत्पादनक्षमता १०० लक्ष टनांपर्यंत होण्याच्या दृष्टीने प्रकल्प विस्ताराची योजना आहे. या प्रकल्पाच्या पूर्ततेकरिता रशिया भारताला वित्तीय व तांत्रिक सहकार्य करीत आहे. पहिल्या टप्प्यापर्यंतच्या कामामधील परदेशी चलनात होणारा खर्च भागविण्याकरिता रशियाने २० कोटी रुबलचे कर्ज भारतास दिले असून दुसऱ्या टप्याकरिता आणखी ८.५ कोटी रुबलचे कर्ज मंजूर केले आहे.

 

येथील सु. २०,००० कामगारांना घरे पुरविण्यात आली आहेत. हिरवागार आसमंत, उत्तम निगराणी केलेले बागबगीचे, रम्य सरोवर व स्वच्छता यांनी बोकारो नटलेले आहे. या औद्योगिक नगरामधील रस्ते नियोजनपूर्वक बांधण्यात आले असून ते उत्तम दर्जाचे आहेत. नगरात ३० विद्यालये (सु. १५,००० विद्यार्थी) व एक महाविद्यालय आहे. याशिवाय येथे ३०० खाटांचे एक अद्ययावत रुग्णालय व विभागवार आरोग्यकेंद्रे आहेत. मालक-कामगार संबंध सौहार्दपूर्ण व सामंजस्याचे आहेत. या प्रकल्पामध्ये ६३ कामगार संघटना काम करीत आहेत. एखाद्या कामगाराला अपघाती वा नैसर्गिक मृत्यू आल्यास कामगारांकडून जमवलेली वर्गणी तसेच कारखान्याकडून हक्कापोटी उपलब्ध होणारे इतर लाभ त्याच्या कुटुंबियांना मिळतात.

 

बोकारो पोलाद प्रकल्पामुळे बिहार राज्याच्या औद्योगिकीकरणास चालना मिळाली आहे. या प्रकल्पास पूरक ठरणारे उद्योग बिहार शासनाने उभारलेल्या औद्योगिक वसाहतीत सुरू करण्यात आले आहेत.

गद्रे, वि. रा.