पॅरी, सर विल्यम एडवर्ड : (१९ डिसेंबर १७९० – ८ जुलै १८५५). ब्रिटिश समन्वेषक. इंग्लंडमधील बाथ येथे जन्म. वयाच्या तेराव्या वर्षी ब्रिटिश नाविक दलात दाखल. १८१८ साली सर जॉन रॉसच्या नेतृत्वाखालील उत्तर ध्रुवाच्या मोहिमेत तो सामील झाला. स्वतंत्रपणे १८१९ साली उत्तर ध्रुवाकडील वायव्य मार्गाच्या मोहिमेवर असताना तो ११४° प. रेखावृत्तापर्यंत जाऊन पोहोचला. या प्रवासातील यशाबद्दल त्याला ब्रिटिश संसदेतर्फे ५,००० पौंडाचे बक्षीस मिळाले. या मोहिमेत त्याने बॅफिनच्या उपसागरात प्रवेश केला आणि बॅरो सामुद्रधुनी, प्रिन्स रीजंट खाडी, व्हायकाउंट मेलव्हिल सामुद्रधुनी, मक्लर सामुद्रधुनी आणि वेलिंग्टन खाडी यांचा शोध लावला. उत्तर ध्रुवाकडील दुसऱ्या मोहिमेत (१८२१–२३) बर्फ वितळण्याची वाट पाहत त्याने मेलव्हिल द्वीपकल्पाच्या पूर्व किनाऱ्याजवळ दोन हिवाळे काढले. या काळात त्याने एस्किमोंचा अभ्यास केला आणि बरीच वैज्ञानिक माहिती गोळा केली. १८२४-२५च्या तिसऱ्या मोहिमेत प्रिन्स रीजंट खाडीत त्याचे एक गलबत फुटले. १८२७ मध्ये स्पिट्सबर्गेनमार्गे उत्तर ध्रुव गाठण्याचा त्याने प्रयत्न केला परंतु अनेक अडचणींमुळे तो ८२° ४५’ उत्तर अक्षवृत्तापर्यंतच जाऊ शकला. त्यापूर्वी हा टप्पा कोणीच गाठला नव्हता. १८२९ साली पॅरीला ‘सर’ हा किताब देण्यात आला. १८५२ साली त्याला ॲड‌्मिरल करण्यात आले. आपल्या तीन मोहिमांचे ‘जर्नल’ तसेच नॅरेटिव्ह ऑफ ॲन अटेम्प्ट टू रीच द नॉर्थ पोल इन बोट्स(१८२८) हा ग्रंथ त्याने प्रसिद्ध केला.

शाह, र. रू.