कॉन्स्टन्स सरोवर : (बोडेनझे). यूरोपातील प्रख्यात सरोवर. कमाल लांबी ६७·५ किमी., रुंदी १२·८ किमी., क्षेत्रफळ ५३८ चौ. किमी. व कमाल खोली २५१ मी. सरोवराच्या आग्नेयीस ऑस्ट्रिया, दक्षिणेस स्वित्झर्लंड व उत्तरेस जर्मनी असून याला लागूनच कॉन्स्टन्स, लिंडो व फ्रिड्रिक्सहाफेन ही जर्मन ब्रेगेट्स हे ऑस्ट्रियन व रोर्शाख हे स्विस शहर आहे. वायव्य टोकावर जमिनीच्या एका लांबट पट्ट्याने कॉन्स्टन्स सरोवराचे दोन विभाग झालेले असून दक्षिण विभागाला उंटरझे व उत्तर विभागाला यूबरलिंगरझे ही नावे आहेत. यूबरलिंगरझे विभागात ऱ्हाईन नदी कॉन्स्टन्सला मिळते व उंटरझेतून बाहेर पडते. कॉस्टन्सच्या परिसरातील सृष्टिसौंदर्य व दूरवर दिसणारी आल्प्सची बर्फाच्छादित शिखरे यांमुळे प्रवाशांची येथे वर्दळ असते.

 

ओक, द. ह.