मुरी : पाकिस्तानच्या रावळपिंडी जिल्ह्यातील थंड हवेचे निसर्गरम्य ठिकाण. हे रावळपिंडी-मुझफराबाद रस्त्यावर रावळपिंडीच्या ईशान्येस सु. ४३ किमी. वर असून पंजाब हिमालयाच्या पश्चिम सोंडेवर सस. पासून सु. २,२९०·६ मी. उंचीवर वसले आहे. उन्हाळ्यात (जूनमध्ये) येथील तापमान १६° ते २७° से. पर्यंत असते.

तात्पुरत्या सैनिकी बराकींसाठी या ठिकाणाची निवड १८५० मध्ये करण्यात आली. आल्हाददायक हवामान, सृष्टिसौंदर्य यांमुळे १८३५ मध्ये येथे कायमच्या बराकी उभारण्यात आल्या. पुढे पंजाब सरकारच्या उन्हाळी राजधानीचे ठिकाण म्हणून यास महत्त्व झाले (१८७३–७५). १८५० मध्ये येथे नगरपालिकेची स्थापना झाली.

याच्या परिसरातील पाइन वृक्षांनी व्यापलेली २,५०० मी. पेक्षा जास्त उंचीची शिखरे आणि त्यांदरम्यानच्या खोल दऱ्या तसेच येथून दिसणारी काश्मीरमधील बर्फाच्छादित शिखरे, डोंगर उतारावरील भाजीमळे व फळबागा ही पर्यटकांची प्रमुख आकर्षणे आहेत. यूरोपीय देशांतून काश्मीरला येणारे अनेक पर्यटक या गिरिस्थानाला भेट देतात. येथे ‘मुरी मद्य’निर्मिती, बेकरी व रेशीम उत्पादने तसेच पर्यटन व्यवसायाशी निगडित उद्योग चालतात. येथे सैनिकी प्रशिक्षण संस्था असून ‘पाकिस्तान सर्वेक्षण संस्थे’च्या संचालकांचे कार्यालय आहे. जवळच अब्बोटाबाद येथे पाकिस्तान सैनिकी अकादमी आहे. १९४८ मध्ये ‘फॉरेस्ट कॉलनी’ स्थापन करण्यात आली.

चौंडे, मा. ल.