पठाणकोट: पंजाब राज्याच्या गुरदासपूर जिल्ह्यातील याच नावाच्या तालुक्याचे मुख्य ठिकाण. लोकसंख्या उपनगरांसह ७८,१९२ (१९७१). हे गुरदासपूर व अमृतसरच्या ईशान्येस अनुक्रमे ३४ किमी. व सु. १०५ किमी. वर आहे. दिल्ली – माधोपूर या उत्तर लोहमार्गावरील आणि दिल्ली–श्रीनगर या राष्ट्रीय महामार्गावरील हे एक प्रमुख स्थानक असून डलहौसी व धरमशाला ही ठिकाणे याच्याशी सडकांनी जोडलेली आहेत. येथे सापडलेल्या नाण्यांवरून पुराणात उल्लेखिलेल्या त्रिगर्त, कुलिंद, कपिस्थल यांच्याबरोबर आलेले उदुंबर लोक प्राचीन काळापासून येथे राहत असावेत. प्राचीन दहमेरी राज्यात गुरदासपूर व कांग्रा यांचा समावेश होता. पठाणकोट प्रथम राजपूत सरदारांच्या व १८१५ मध्ये रणजितसिंगाच्या ताब्यात आले. १८६७ पासून येथे नगरपालिका आहे. ब्लँकेट व शाली तयार करणे, हातमागावर कापड विणणे, फळांवर प्रक्रिया करणे, लाकूड कापणे इ. उद्योगधंदे येथे चालतात. गहू, हरबरा, मांस, हाडे, लाकडी वस्तू, लोकर इत्यादींचा व्यापार शहरात चालतो. सोळाव्या शतकातील शाहपूर कांडी हा प्रेक्षणीय किल्ला आणि शाळा, दवाखाना, डाकबंगला, विश्रांतिगृहे इ. सोयी आहेत.

सावंत प्र. रा.