अर्कांगेलिस्क : रशियाच्या अर्कांगेलिस्क प्रांताची राजधानी व महत्त्वाचे बंदर. लोकसंख्या ३,४३,००० (१९७०). उत्तरेस श्वेत समुद्राला मिळणाऱ्‍या उत्तर द्वीना नदीच्या त्रिभुजप्रदेशात उजव्या तीरावर हे वसले असून समुद्रापासून ४० किमी. आत आहे. १५८३ मध्ये इंग्रज व्यापाऱ्यांनी हे गाव वसविले. १७०३ मध्ये सध्याच्या लेनिनग्राडची स्थापना झाल्यानंतर अर्कांगेलिस्कचे महत्त्व कमी झाले होते परंतु १८९७ मध्ये रेल्वेमार्ग झाल्यामुळे ते वाढले. हिमवृष्टीमुळे सहा-सात महिने हे नौकानयनाला निरुपयोगी असते, तरी रशियाच्या लाकूड-निर्यातीपैकी १/३ निर्यात या बंदरातून होते. येथे १५० च्या वर लाकूड कापण्याचे कारखाने असून जहाजबांधणी, दोरखंड वळणे, मच्छीमारी, चामडी कमविणे इ. उद्योग चालतात. लाकडाशिवाय बंदरातून रेझिन, फर, तेले, डांबर वगैरेंचीही निर्यात होते.

 

लिमये, दि. ह.