बग नदी : (१) वेस्टर्न बग : पोलंडमधील व्हिश्चला नदीची उपनदी. लांबी ७७९ किमी. जलवाहनक्षेत्र ७३,४७० चौ.किमी. ही रशियातील युक्रेन प्रजासत्ताकात लाव्हॉव्हच्या नैर्ऋत्येस व्हॉलिन-पोडोल्यन या पठारी भागात उगम पावते. उगमानंतर ती वायव्येकडे वाहत जाते. आणि ब्रेस्टजवळ पश्चिमेकडे वळून नंतर पोलंडमधून वाहते आणि वॉर्साच्या वायव्येस ३० किमी. अंतरावर व्हिश्चला नदीस मिळते. तिच्या सु. २०० किमी. मध्यवर्ती प्रवाहाने पोलंड व रशिया यांदरम्यानची ही सीमा बनली आहे. या सीमा भागात ती जगातील मोठ्या अशा प्रिपेट या दलदली प्रदेशातून वाहते. कश्ना, लीव्होत्स, मूखव्ह्येत्स, नूझेत्स या बगच्या महत्त्वाच्या उपनद्या होत. ऐतिहासिक दृष्ट्या या नदीला महत्त्व असून तिच्या काठी अनेक लढाया झाल्या. पहिल्या महायुध्दानंतर पोलंड व रशिया यांतील या नदीने बनलेली सरहद्द ‘कर्झन लाइन’ म्हणून ओळखली जाते. १९३९ मध्ये जर्मनी आणि रशिया यांमधील ही सीमारेषा बनली, परंतु दुसऱ्या महायुध्दानंतर पुन्हा पोलंड व रशिया यांची सरहद्द झाली. बग नदी  कालव्याद्वारे नीपरशी जोडली असून ब्रेस्टपर्यंत जलवाहतूक चालते. ब्रेस्ट ,व्हिश्कूफ यांसारखी महत्त्वाची शहरे हिच्या खोऱ्यात आहेत.

(२)  सदर्न बग : काळ्या समुद्रास मिळणारी रशियातील नदी. लांबी ८५८ किमी. ही रशियाची युक्रेन प्रजासत्ताकात प्रस्कूरफच्या वायव्येस व्हॉलिन-पोडोल्यन पठारी प्रदेशात उगम पावते. उगमानंतर ती स्थूलमानाने आग्नेयीकडे वाहत जाऊन न्यिकलायेफजवळ काळ्या समुद्रास मिळते. बग नदी-खोऱ्यातील जमीन-विशेषतः व्हिनित्सापासून खालच्या भागातील-काळी कसदार असल्याने गहू, राय, ओट, बार्ली, सूर्यफूल, इ. पिके होतात. व्हिनित्सा हे हिच्या काठावरील शहर यंत्रावजारे, रसायने व लोकरी कपडे यांचे निर्मितिकेंद्र म्हणून प्रसिध्द आहे. हिच्या उगमाकडील भागात प्रपात असून त्यांचा उपयोग वीजनिर्मितीसाठी केला आहे. हिच्या प्रवाहमार्गातील प्रपातामुळे ही जलवाहतुकीस फारशी उपयोगी नाही. फक्त व्हझिन्यस्येन्कपासून मुखाकडे सु. १६० किमी. जलवाहतूक चालते. हिच्या खोऱ्यातील खम्येल्नीक हे लाकूडकामासाठी, तर न्यिकलायेफ हे काळ्या समुद्रावरील उत्कृष्ट बंदर व जहाजबांधणी केंद्र म्हणून विख्यात आहे.

यार्दी, ह. ध्यं गाडे, ना.स.