महड : (मढ). अष्टविनायकांपैकी वरदविनायकाचे मंदिर असलेले हे ठिकाण महाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्ह्याच्या खालापूर तालुक्यात आहे. लोकसंख्या ४३३ (१९७१) मुंबई−पुणे रस्त्यावर खोपोलीच्या वायव्येस सात किमी. व खालापूरच्या दक्षिणेस दोन किमी. अंतरावरील हे स्थळ म्हणजे एक इनामी गाव आहे. पौडकर नावाच्या एका गणेशभक्ताला १६९० साली दैवी दृष्टांत होऊन मंदिरामागील तलावात गणेशाची मूर्ती सापडली. दगडी सिंहासनाधिष्ठित गणेशमूर्तीच्या दोन्ही बाजूंस दोन गजराज कोरलेले आहेत. पुढे १७२५ मध्ये पेशव्यांचे एक सुरसुभे बिवलकर यांनी तेथे देऊळ बांधले. भाद्रपद व माघ या दोन्ही महिन्यांत शुक्ल प्रतिपदा ते पंचमीपर्यंत येथे गणेशोत्सव असतो. महडपासून सु. २० किमी. अंतरावर कर्जत व खंडाळा ही लोहमार्ग स्थानके आहेत.

चौधरी, वसंत