करबला:इराकमधील करबला प्रांताची राजधानी व मुसलमानांचे पवित्र स्थान. लोकसंख्या ८३,३०१  (१९६५).  हे बगदादच्या नैऋत्येस ९६ किमी.,हुसेनिया कालव्यावर वसले आहे. पश्चिमेकडील वाळवंटी प्रदेशातील बदाउनी टोळ्यांनी बनविलेल्या मालांच्या बदली खजूर, धान्य व इतर आवश्यक वस्तू देण्याघेण्याचे केंद्र म्हणून करबला पूर्वीपासून प्रसिद्ध होते. ६८०मध्ये ते सुन्नी व शिया मुसलमानांच्या संघर्षाचे केंद्र बनले. येथील लढाईत शियांचा नेता व पैगंबरांचा नातू हुसेन मारला गेला. त्यानंतर करबला आणि त्याजवळचे ॲन नझफ्‌ ही गावे शिया मुसलमानांची पवित्र क्षेत्रे बनली. इराण आणि इराकमधून मक्केस जाणार्‍या प्रवाशांचे करबला प्रस्थानकेंद्र असून ते रेल्वेने बगदादबसरा रेल्वेशी जोडलेले आहे. प्रामुख्याने मोहरममध्ये येथे अनेक भाविक येतात.

गद्रे,वि.रा.