डभई : गुजरात राज्याच्या बडोदे जिल्ह्यातील तालुक्याचे मुख्य ठिकाण. हे बडोद्याच्या आग्नेयीस २८ किमी. असून याची लोकसंख्या ३७,८९२ आहे (१९७१). हे बडोदे–चांदोद लोहमार्गावरील स्थानक आहे. कापडनिर्मितीचे तसेच चांदी-तांब्याची भांडी व वाळे यांच्या निर्मितीचे केंद्र. विलीनीकरणापूर्वीच्या गायकवाडांच्या बडोदे संस्थानातील चारी बाजूंनी तटबंदी असलेले व तिला नक्षीकामयुक्त दरवाजे असलेले हे एक सुंदर शहर आहे. उत्तर प्रवेशद्वारास ‘चांपानेर’ व पूर्व प्रवेशद्वारास ‘हिरावेस’ म्हणतात. हिरावेसीच्या उजवीकडे भद्रकालिका मातेचे आणि डावीकडे महादेवाचे कोरीवकाम केलेले मंदिर आहे. दक्षिणेकडील तटाची भिंत सर्वांत लांब (९९० मी.) आहे. येथे कापूस व धान्याचा चांगला व्यापार चालतो.

सावंत, प्र. रा.