बुजुंबुरा : आफ्रिकेतील बुरूंडी देशाची राजधानी व टांगानिका सरोवराच्या ईशान्य किनाऱ्यावरील प्रमुख बंदर. लोकसंख्या १,६२,६०० (१९७७ अंदाज). हे बुरूंडीतील दळणवळणाचे व निर्यात मालाचे प्रमुख केंद्र समजले जाते. येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे.

जर्मनांनी १८९७ मध्ये येथे लष्करी ठाणे उघडले व एकोणिसाव्या शतकात एक लहानसे खेडे असलेल्या या शहरास महत्त्व प्राप्त झाले. पहिल्या महायुद्धानंतर हे बेल्जियन अंमलाखाली आले. दुसऱ्या महायुद्धानंतर संयुक्त राष्ट्रांचा विश्वस्त प्रदेश म्हणून ’रूआंडा ऊरूंडी’ अस्तित्वात आला व त्याची राजधानी य शहरी ठेवण्यात आली. त्यावेळी हे शहर ’ऊसूंबूरा’ या नावाने ओळखले जाई. बुरूंडीच्या स्वातंत्र्यानंतर म्हणजे १९६२ पासून याचे ’बुजुंबुरा’ असे नामकरण झाले.

आसमंतातील कॉफी, कापूस इ. शेतमालाची ही एक मोठी बाजारपेठ असून येथून कॉफी, कापूस, कातडी इत्यादींची निर्यात होते. येथे कापड, सिमेंट, साबण, बांधकामसामग्री, अन्नप्रक्रिया इ. उद्योग विकास पावले आहेत. बुजुंबुरा हे देशातील एक प्रमुख शैक्षणिक केंद्र असून तेथे बुजुंबुरा विद्यापीठ (स्था. १९६०), तांत्रिक शिक्षणसंस्था तसेच व्यवसाय मार्गदर्शनासाठी समाज शिक्षण केंद्र इ. शैक्षणिक संस्था आहेत.

गाडे, ना. स.