नगरे व महानगरे : ग्रामीण जीवनपद्धतीपेक्षा वेगळ्या जीवनपद्धतीची आणि खेड्यापेक्षा अधिक व दाट लोकसंख्या असलेल्या मानवी वसाहतीस नगर किंवा शहर आणि त्याहीपेक्षा अधिक लोकसंख्येच्या व जीवनाच्या आणि संस्कृतीच्या अनेकविध अंगोपांगाचे दर्शन घडविणारी मानवी वसाहत म्हणजे महानगर असे स्थूलमानाने म्हणता येईल. वसाहतींच्या आकारमानातील फरक दर्शविण्यासाठी रोजच्या व्यवहारांत पाडा, वस्ती, वाडी, गाव, खेडेगाव, नगर, शहर, महानगर इ. अभिधाने वापरतात. बहुतेकांच्या बाबतीत त्यामध्ये वास्तव्य करीत असलेली लोकसंख्या हे गमक मानण्यात येते. तथापि नगरांच्या आकारमानाविषयीही जगात सर्वत्र एकवाक्यता आढळत नाही. स्वीडन व डेन्मार्क या देशांत केवळ २०० लोक असणारी वसाहत नगर या संज्ञेस पात्र ठरते. मलायात व चिलीत निदान १,००० लोकसंख्या असणे हे शहराचे गमक मानण्यात येते, तर कॅनडा व अर्जेटिनामध्ये हेच गमक २,००० भारत व घानामध्ये ५,००० स्वित्झर्लंड, तुर्कस्तानमध्ये १०,००० जपानमध्ये ३०,००० आणि कोरियात ४०,००० लोकसंख्या असणाऱ्या वसाहतींनाच नगर अथवा शहर म्हणतात. भारतात १९६१ च्या जनगणनेपासून ५,००० लोकसंख्य़ा असणारे, दर चौ. किमी. निदान १,००० लोकवस्तीची घनता असलेले आणि एकूण काम करणाऱ्या लोकांपैकी ७५ टक्क्यांहून अधिक लोक बिगर शेती व्यवसायात काम करणारे असलेले ठिकाण नगर किंवा शहर मानण्यात येऊ लागले.

नगरांची उत्पत्ती ही मानवी संस्कृतीएवढीच पुरातन असून अर हे मेसोपोटेमियातील सर्वांत प्राचीन नगर मानण्यात येते. या नगरात ३,५०० वर्षांपूर्वी आधुनिक शहरांत आढळणारी प्रशासन, व्यापार, संरक्षण, सांस्कृतिक इ. कार्ये होत असत.

मानवाने भटकून अन्न गोळा करणे किंवा शिकार करणे या जीवनपद्धतीचा त्याग करून कायम वसाहती स्थापून अन्नधान्योत्पादन करणे या जीवनपद्धतीचा अंगीकार केला, तेव्हा स्थायी लोकसंख्येत प्रथमविशेष वाढ झाली. त्यातूनच कालांतराने गाव, पाडा, खेडे, नगर इत्यादींचा उदय झाला. नगर व महानगर ही वाढत्या लोकसंख्येनुसार मानवोपयोगी विविध सेवाकार्ये करणारी मानवी वसाहतींची विशिष्ट रूपे आहेत.

आधुनिक नगरे ही बहुधा एक वा अधिक अशी विशिष्ट कार्ये करणारी असतात आणि त्यामधील प्रमुख कार्यानुसार नगरांचे अनेक प्रकार पडतात. टाटानगर, भिलाई, बर्मिंगहॅम इ. औद्योगिक शहरे गणली जातात. तसेच मुंबई, कलकत्ता, हाँगकाँग, सिंगापूर, लंडन इ. व्यापारासाठी प्रसिद्ध आहेत. शिकागो, व्हेनिस, कोचिन, सँटिआगो इ. वाहतूक केंद्रे जोहॅनिसबर्ग, झरिया, बोकारो ही खाणकामनगरे  दिल्ली, चंडीगढ, वॉशिंग्टन डी. सी., कॅनबरा, बाझेल ही प्रशासन केंद्रे पठाणकोट, अंबाला, जिब्राल्टर, ल्हासा ही लष्करी केंद्रे वाराणसी, मदुराई, द्वारका, मक्का, बेथलीएम, जेरूसलेम ही धार्मिक तीर्थक्षेत्रे म्हणून प्रसिद्ध आहेत तर गुलमर्ग, सिमला, महाबळेश्वर, ऊटकमंड, नायगारा इ. पर्यटनकेंद्रे म्हणून ओळखली जातात.

भारतात केवळ धार्मिक कारणाने महत्त्वास चढलेली अनेक शहरे आहेत. परंतु हल्ली तेथेही व्यापार, कारखाने, शिक्षणसंस्था, वाहतूकव्यवस्था, सफाई व स्वच्छता, आरोग्यसेवा, पाणीपुरवठा, मंदिरांशिवाय अन्य सौंदर्यपूर्ण व कलापूर्ण वास्तू, उद्याने इ. नागरी वैशिष्ट्यांची वाढ होत आहे. एखाद्या मोठ्या यात्रेच्या किंवा राजकीय, सामाजिक, क्रीडाविषयक, सांस्कृतिक इ. अधिवेशनाच्या वेळी लहानशा गावाला किंवा नगराला मोठ्या नगराचे किंवा महानगराचेही तात्पुरते रूप येते. अशा प्रसंगी त्या विशिष्ट कालापुरत्या नागरी वा महानागरी विविध सेवा उपलब्ध करून देणे, हे स्थानिक किंवा राज्यातील व देशातील प्रशासनाचे कर्तव्य ठरते. प्रतिवर्षी येणाऱ्या अशा महोत्सवासाठी एरवी सुप्त, परंतु त्या त्या वेळी चटकन कार्यान्वित होणारी, कायम स्वरूपाची सेवायोजना सिद्ध ठेवावी लागते.

इतिहासकाळात खंदक, तटबंदी व वेशी यांची व्यवस्था नगरांच्या संरक्षणाच्या दृष्टीने पुष्कळदा आवश्यक असे. सैनिकी वा राजकीय दृष्ट्या मोक्याच्या जागी वसलेल्या शहरांना त्यांची विशेष आवश्यकता भासत असे. त्यांचे अवशेष कित्येक नगरांच्या परिसरात आजही दिसून येतात व पर्यटन व्यवसायाच्या दृष्टीने ते कधीकधी जतनही केले जातात. मुंबईचा ‘फोर्ट’ विभाग, गावोगावच्या वेशी व दिल्लीची लाहोरगेट, अजमेरगेट इ. प्रवेशद्वारे ही याची उदाहरणे होत. आधुनिक शस्त्रास्त्रांच्या व वाहतूक साधनांच्या निर्मितीमुळे या गोष्टीचे महत्त्व आता कमी झाले आहे. तथापि प्रत्यक्ष युद्धप्रसंगी अद्यापही नगराच्या संरक्षक सैनिकांसाठी खणलेले खंदक किंवा रणगाडे वगैरे आक्रमक युद्धसाहित्याला प्रतिबंध करण्याच्या ‘मॅजिनो लाइन’ सारख्या योजना यांचा कमीअधिक उपयोग केला जातोच.


व्यवसाय, व्यापार, उद्योगधंदे, कारखाने, विशिष्ट लोकोपयोगी संस्था यांची व शासकीय कार्यालये इत्यादींमुळे नगराचा विस्तार व त्याभोवती उपनगरांची वाढ होते. कालांतराने याच पद्धतीने उपनगरांनाही नगरांचे स्वरूप येऊ लागते आणि मग त्या सर्वांमिळून महानगर बनते.

गेल्या काही शतकांत जगात सर्वत्र नागरीकरणाची झपाट्याने वाढ होत असून सध्या जगात १० लाखांहून अधिक लोकसंख्या असणाऱ्या मोठ्या महानगरांची संख्या ९२ आहे. यातील आठ महानगरे भारतात आहेत. बृहन्‌मुंबई, कलकत्ता, दिल्ली, मद्रास, हैदराबाद, अहमदाबाद, बंगलोर व कानपूर ही भारतातील महानगरे आहेत.

जगातील सर्वात मोठी १६ महानगरे

नाव

लोकसंख्या (लाखात)

साल 

१. शांघाय (चीन) 

१०८ 

१९७४ 

२. टोकिओ (जपान)

८७

१९७४

३. न्यूयॉर्क (अ. सं. सं.)

७७

१९७३

४. पीकिंग (चीन)

७६

१९७०

५. मॉस्को (रशिया)

७६

१९७५

६. लंडन (इंग्लंड)

७३

१९७३

७. साऊँ पाउलू (ब्राझील)

७२

१९७५

८. कलकत्ता (भारत)

७०

१९७१

९. मुंबई (भारत)

६०

१९७१

१०. मेक्सिको सिटी (मेक्सिको)

५८

१९७५

११. कैरो (ईजिप्त)

५५

१९७३

१२. तिन्‌त्सिन (चीन)

४३

१९७०

१३. लेनिनग्राड (रशिया)

४२

१९७५

१४. शिकागो (अ. सं. सं.)

३४

१९७३

१५. ब्वेनस एअरीझ (अर्जेंटिना)

३०

१९७३

१६. पॅरिस (फ्रान्स)

२३

१९७५

नगरांच्या विकासासाठी विस्तृत खुल्या जागेची उपलब्धता, घरगुती व अन्य वापरासाठी मुबलक पाणीपुरवठा, स्वस्त व पुरेसा वीजपुरवठा, कृषिपदार्थांची सुलभ उपलब्धता, पुरेशी व चांगली दळणवळण साधने इ. नगरांच्या जलद वाढीस चालना देणारे घटक आहेत. विसाव्या शतकातील नगरांचे व महानगरांचे सर्वांत मोठे वैशिष्ट्य म्हणजे वाढत्या श्रेणींत व अधिक सखोल मानवोपयोगी सेवाकार्ये करण्याची त्यांची क्षमता हे होय.

योजनाबद्ध वाढ न झाल्याने जगातील सर्वच शहरांत व महानगरांत अनेक समस्या निर्माण झाल्या असून लोकसंख्येचा विस्फोट, मोटारयुगाचे आगमन व गृहोपयोगी तंत्रविज्ञानातील क्रांती यांमुळे नागरी जीवनात अनेकविध पेचप्रसंग निर्माण झाले आहेत. त्यांत जलप्रदूषण, वायुप्रदूषण, ध्वनिप्रदूषण इ. अनेक प्रकारच्या प्रदूषणांच्या समस्थेने उग्रस्वरूप धारण केले आहे. गलिच्छ वस्त्यांची सुधारणा हीसुद्धा एक आव्हान देणारी जटिल समस्या आहे. असे असूनही नगरांची संख्या व त्यांच्यातील लोकसंख्या सतत वाढतच आहे व अधिकाधिक लोक नगरवासी किंवा उपनगरवासी बनत असल्याचे दृश्य आज जगात सर्वत्र आढळून येते. खेड्यांतील लोकांचा शहरांकडे वाहणारा वाढता ओघ व त्यामुळे निर्माण होणाऱ्या वरीलसारख्या समस्या यांवर ‘चला परत खेड्यांकडे’ अशासारखा सरधोपट उपाय विशेषसा फलद्रूप होईल, असे दिसत नाही. त्यापेक्षा ग्रामीण जीवनपद्धतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा शेती व इतर व्यवसायांत उपयोग करून तेथे नागरीसदृशसुविधा प्राप्त करून देणे आणि यांमुळे गावातच थांबणाऱ्या लोकांशिवाय शहरांकडे लोटणारा जनौघ नगरात समाविष्ट करून घेऊन नगरांची स्वाभाविक योजनाबद्ध वाढ होऊ देणे याचा अधिक उपयोग होण्यासारखा असल्याने सतत जागरूक यंत्रणा आवश्यक वाटते.

संदर्भ : 1. Hicks, U. The Large City: A World Problem, London, 1975.

           2. Meyer, H. M. Kohn, C. F. Readings in Urban Geography, Chicago, 1965.

शिंदे, सु. द.