समुद्र : महासागराचा उपविभाग किंवा सामान्यपणे पृथ्वीवरील खाऱ्या पाण्याचा मोठा जलाशय म्हणजे समुद्र होय. उदा., कॅरिबियन समुद्र, उत्तर समुद्र, भूमध्य समुद्र, अरबी समुद्र इत्यादी. काही खंडांतर्गत मोठया जला-शयांनाही समुद्र या संज्ञेने संबोधले जाते. उदा., कॅस्पियन समुद्र, मृत समुद्र, अरल समुद्र, सॉल्टन समुद्र इत्यादी. कित्येकदा महासागराला समानार्थदर्शक म्हणूनही समुद्र ही संज्ञा वापरली जाते. समुद्र, आखात आणि उपसागर या महासागराच्या उपविभागदर्शक संज्ञा अगदी ढोबळमानाने वापरल्या जातात. या वेगवेगळ्या जलभागांच्या सीमा दाखविण्यासाठी कोणत्याही एका व्यापक व सार्वत्रिक पद्धतीचा वापर केला जात नाही. जेथे शक्य आहे, तेथे जमिनीचा भाग किंवा सागरांतर्गत भूवैशिष्टयांचा वापर त्यांच्या सीमा ठरविण्यासाठी केला जातो परंतु जेथे अशी भूवैशिष्टये अस्तित्वात नसतात, तेथे काल्पनिक सीमा मानल्या जातात. या काल्पनिक सीमा काही वेळा राजकीय संकेत व सहमतीनुसार ठरवाव्या लागतात. सागरतळाची रचना, सागरी प्रवाह, सजीवांची स्थिती व अन्य काही घटकांचाही विचार करून या सीमा निश्र्चित केल्या जातात.

महासागरांना जोडणाऱ्या समुद्राचा तसेच लगतच्या जलाशयांचा समावेश त्या महासागरातच केला जातो. उदा., भूमध्य, उत्तर समुद्र, बाल्टिक, काळा, एड्रिॲटिक, कॅरिबियन इ. समुद्र हे अटलांटिक महासागराचेच भाग मानले जातात. यातील बाल्टिक व उत्तर समुद्र प्रामुख्याने सागरमग्न खंडभूमीवर निर्माण झालेले आहेत. कॅरिबियन समुद्र व मेक्सिकोचे आखात हे जलभाग एका कटकामुळे अलग झाले आहेत. हिंदी महासागरात समाविष्ट होणारे तांबडा समुद्र व इराणचे आखात सागरमग्न भूमिवर निर्माण झालेले आहेत. तांबडा समुद्र म्हणजे आफिका व अरबस्तान यांदरम्यानची स्पष्टपणे आढळणारी खचदरीच आहे. भारतालगतचे अरबी समुद्र व बंगालचा उपसागर हे हिंदी महासागराचेच विस्तारित भाग आहेत. येथील अंदमान हा उथळ व परिवेष्टित समुद्र आहे. अमेरिकेच्या उत्तरेकडील बोफर्ट समुद्राचा समावेश आर्क्टिक महासागरात होतो. अटलांटिकच्या तुलनेत पॅसिफिकमधील समुद्र अरूंद व लांबट स्वरूपाचे आहेत. पॅसिफिकच्या पश्र्चिम भागात समुद्र अधिक आहेत. बेरिंग, अल्यूशन, ओखोट्स्क, पीत, चिनी, सेलेबीझ, बांदा हे पॅसिफिकमधील प्रमुख समुद्र आहेत. पीत समुद्र वगळता इतर सर्वत्र समुद्र खोल आहेत.

पहा : महासागर व महासागरविज्ञान.

चौधरी, वसंत