नारायण तलाव : नारायण सरोवर. गुजरात राज्याच्या कच्छ जिल्ह्यातील लखपत तालुक्यामधील हिंदूंचे तीर्थक्षेत्र. हे भूज शहराच्या वायव्येस सु. १२४ किमी. व कोटेश्वरपासून २ किमी.वर कोरी नदीच्या मुखावर वसले आहे. हा भारतातील पाच पवित्र तलावांपैकी एक असून, प्राचीन काळापासून प्रसिद्ध आहे. याचा उल्लेख श्रीमद्‌भागवत, वायुपुराण आणि विष्णुपुराण इ. पुराणांत व ग्रंथांत आढळतो. पूर्वी तलावाजवळ एकच आदिनारायणाचे मंदिर होते. ते एका साधूने कानफाट्या बैराग्याकडून विकत घेऊन तेथे घाट व पायऱ्या बांधल्या. कच्छची राणी महाकुंवर हिने या स्थानाचे महत्त्व वाढावे म्हणून येथे लक्ष्मीनारायण, गोवर्धननाथ, द्वारकानाथ इ. मंदिरे बांधली. तसेच त्यांस संस्थानाकडून इनामही मिळवून दिले. येथील मऊ खडकांत व वाळूत काही गुहा कोरलेल्या आहेत. येथे दक्षपुत्र हर्यश्व व शबलाश्व यांनी तप केले, असे म्हणतात. या ठिकाणाचे मुख्य आकर्षण म्हणजे येथील सर्व मंदिरे तटबंदीयुक्त आहेत. हे तीर्थक्षेत्र किनारी हमरस्त्याने भूजशी जोडले आहे. नारायण तलाव व मांडवीमार्गे लखपत ते गांधीधाम अशा रुंदमापी लोहमार्गाचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. येथे कार्तिक महिन्यात (एकादशी ते पौर्णिमेपर्यंत) यात्रा भरते.

सावंत, प्र. रा.