व्हिस्मार : विझ्मार. जर्मनीच्या ईशान्य भागातील मेक्लनबुर्क-वेस्ट पॉमेरेनीयन राज्याच्या रॉस्टॉक जिल्ह्यातील एक औद्योगिक शहर आणि सागरी बंदर. लोकसंख्या ५८,०५८ (१९८९ अंदाज). हे ल्यूबेकपासून पूर्वेस ५६ किमी. अंतरावर, बाल्टिक समुद्राच्या विझ्मार उपसागराच्या किनाऱ्यावर वसले आहे. इ. स. १२२९ मध्ये पहिल्यांदा नगर म्हणून याचा उल्लेख झाला. १२५६ ते १३०६ या काळात येथे मॅक्लनबुर्क राजाचे निवासस्थान होते. हॅन्सिॲटिक लीग या व्यापारी संघातील विझ्मार हे एक संपन्न घटक शहर व बंदर होते. सोळाव्या शतकानंतर त्याचे महत्त्व कमी होत गेले. तीस वर्षांच्या युद्धाच्या अखेरीस १६४८ मध्ये झालेल्या वेस्टफेलिया करारानुसार हे स्वीडनच्या ताब्यात आले. १९०३ मध्ये स्वीडनने त्याच्यावरील आपला हक्क सोडून दिला. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात झालेल्या बाँबवर्षावात अनेक जुन्या इमारती व घरांचा नाश झाला. सुरुवातीला ब्रिटीश सैन्याने व त्यानंतर रशियन सैन्याने ते काबीज केले. युद्धानंतर ते शहर पूर्व जर्मनीत समाविष्ट करण्यात आले.

दुसऱ्या महायुद्धानंतर व्हिस्मारचा विकास होत गेला. बंदर-सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली. रस्ते व लोहमार्गाचे ते प्रमुख केंद्र बनले. येथे मुख्यत: मासेमारी व जहाजबांधणी व्यवसाय विकसित झाले. याशिवाय येथे साखर व खाद्यपदार्थ-निर्मिती, मद्यनिर्मिती, धातुकाम, रेल्वे-डबे, यंत्रसामग्री, अल्युमिनियम उपकरणे, विद्युत्दाब यंत्रे, फॉस्फेट-निर्मिती इत्यादींचे कारखाने आहेत. फॉस्फेट, कोळसा, लाकूड व गुरे यांचा व्यापार येथे चालतो. जर्मन व्यापारी संघाचा एक सदस्य म्हणून या शहराला ऎतिहासिक परंपरा आहे.

शहरात पंधराव्या शतकापासूनच्या अनेक चर्चवास्तू, वखारी व घरे आढळून येतात. मारीनकिर्चे व सेंट जॉर्ज ही मध्ययुगीन चर्चे लाकडावरील कोरीवकाम व भित्तिचित्रणासाठी प्रसिद्ध आहेत. फ्यूर्स्ट्नहॉफ हा प्रबोधनकालीन इटालियन शैलीत बांधण्यात आलेला राजवाडा (सोळावे शतक) पर्यटकांचे खास आकर्षण ठरला आहे. 

                                      

चौधरी, वसंत