एव्हरेस्ट : जगातील सर्वोच्च पर्वतशिखर. हे हिमालयाच्या हिमाद्री – ग्रेटर हिमालय – रांगेत नेपाळ – तिबेट सीमेवर २७० ५९’ १५·९” उ. व ८६० ५५’ ३९·५” पू. येथे असून त्याची उंची ८,८४७·६ मी. आहे. ब्रिटिश हिंदुस्थानच्या सर्वेक्षण खात्यात १८५६ पर्यंत हे पीक – १५ क्रमांकाचे शिखर म्हणून ओळखले जात होते. १८५२ मध्ये या खात्यातील एक प्रमुख बंगाली गणक राधानाथ शिखधर याने तेव्हाचा सर्वेक्षणप्रमुख सर अँड्रू वॉ याला आपणास जगातील सर्वोच्च शिखराचा शोध लागल्याचे सांगितले. पहिला सर्वेक्षणप्रमुख सर जॉर्ज एव्हरेस्ट याने हिमालय पर्वतविभागाची प्रथम पाहणी केलेली होती. त्याचे नाव या शिखराला १८५६ मध्ये देण्यात आले. त्या पाहणीतील निरीक्षण नोंदीवरून राधानाथ याला पीक – १५ ची उंची २९,००२ फूट असल्याचे आढळून आले. पुन:पाहणी व गणना करून ही उंची २९,१४१ फूट ठरविली होती. आता भारतीय सर्वेक्षण खात्याने ती २९,०२८ फूट किंवा ८,८४८ मी. ठरविली आहे. नेपाळी व तिबेटी लोक या शिखराला चौमोलुंगमा – जगन्मातादेवी – म्हणतात.

नेपाळमध्ये व तिबेटमध्ये पूर्वी परकीयांना प्रवेश नसे. यंग हजबंडने तिबेटमध्ये ससैन्य प्रवेश केल्यानंतर तिबेटच्या बाजूने एव्हरेस्ट चढून जाण्याच्या मोहिमा सुरू झाल्या त्याचबरोबर हिमालयाच्या एव्हरेस्ट विभागाचा शास्त्रीय अभ्यास सुरू झाला. एव्हरेस्टचा प्रदेश पाच ते आठ लाख वर्षापूर्वी निर्माण झाला असावा असा कयास आहे. एव्हरेस्ट गिरीपिंडाचा पाया वलीकरण झालेल्या खुंबू नापेंचा बनलेला आहे. त्यांच्यावर नाइस व ग्रॅनाइट असून ग्रॅनाइटाच्या वर सुप्रसिद्ध ‘पिवळा पट्टा’ आहे. त्यात स्फटिकी पिवळ्या चुनखडकाचे व राखी अभ्रकी नाइसाचे पातळ थर आलटून पालटून आहेत. एव्हरेस्टचा शेवटचा पिरॅमिड चढून जाताना क्रीम रंगाचे, पातळ थराचे चूर्णीय फिलाइट व त्यात मधून मधून गडद रंगाचे स्लेट दिसतात. ८,७०० मी. च्यावर पांडुर ते गडद राखी रंगाचा चुनखडक व त्यात मधून मधून गडद स्लेट दिसतात.

एव्हरेस्टवर चढून जाणे हे अनेक गिर्यारोहकांनी उराशी बाळगलेले स्वप्‍न होते. १९२२ मधील ब्रिटिश मोहिमेत गिर्यारोहणात ऑक्सिजन प्रथमच वापरण्यात आला व ८,२३० मी. उंची गाठण्यात आली. १९२४ च्या ब्रिटिश मोहिमेत ८,५३४ मी. पेक्षा अधिक उंची गाठली गेली परंतु मॅलरी व आयर्विन हे शिखरावर चढताना कायमचे नाहीसे झाले. १९५३ मध्ये सर जॉन हंट यांच्या नेतृत्वाखाली गेलेल्या ब्रिटिश तुकडीतील तेनसिंग नोर्के व एडमंड हिलरी हे २९ मे रोजी दुपारी ११·३० वाजता एव्हरेस्ट चढून जाण्यात प्रथमच यशस्वी झाले. १९५६ मध्ये स्विस तुकडीने ते सर केले. १९६३ मध्ये अमेरिकन मोहिमेतील सहाजण दोघादोघांच्या गटांनी वर पोहोचले. १९६५ मधील ले. कमांडर कोहली याच्या नेतृत्वाखालील हिंदी तुकडीतील नवांग गोबू व कॅ. चीमा – २० मे सोनाम ग्यात्सो व सोनाम वांग्याल – २२ मे सी. पी. वोहरा व आंग कामी – २४ मे व रावत, आहलूवालिया आणि फु दोर्जी – २९ मे याप्रमाणे दहा दिवसांत चार वेळा व एकाच वेळी तिघे एव्हरेस्ट सर करण्यात यशस्वी झाली. १९७० मध्ये जपानी तुकडी एव्हरेस्ट गाठण्यात यशस्वी झाली. आतापर्यंत ब्रिटिश, स्विस, अमेरिकन, भारतीय व जपानी तुकड्या एव्हरेस्ट चढून जाण्यात यशस्वी झाल्या आहेत [→ गिर्यारोहण].

संदर्भ : 1. Bowman, Noel Trans. Mount Everest, London, 1963.

     2. Kohli, M. S. Nine Atop Everest, New Delhi, 1969.

खातु, कृ. का.