तराई : हिमालयाच्या पायथ्याशी दगडगोटे व भरडरेती यांच्या जाड्या गाळाने तयार झालेल्या भाबर या भागाच्या पुढे असलेला मातीच्या बारीक गाळाने तयार झालेला पट्टा. भाबरमध्ये भूमिगत झालेले जलप्रवाह तराईत भूपृष्ठावर येतात त्यामुळे हा भाग दलदलयुक्त आहे. या पट्ट्याची रुंदी पूर्वी ८०–९० किमी. होती परंतु आता बऱ्याच भागात वस्ती झाल्यामुळे त्याच्या मूळ स्वरूपात बरेच परिवर्तन झाले आहे. सध्या मूळ स्वरूपातील अरुंद पट्टाच शिल्लक आहे. हा पट्टा सर्वसाधारणपणे यमुना नदीच्या पूर्वेला थेट ब्रह्मपुत्रेपर्यंत आढळतो. पश्चिमेला यमुना आणि सतलज या नद्यांमध्ये शिवालिक रांग, त्यामागील हिमालयाच्या रांगेपासून दूर असल्यामुळे तिच्यात उगम पावणाऱ्या व केवळ पावसाचे पाणी मिळणाऱ्या नद्या पुरेसा गाळ आणू शकत नाहीत. सतलजच्या पश्चिमेला शिवालिक रांग मूळ हिमालयाच्या रांगेजवळ असूनही पावसाचे प्रमाण अल्प असल्यामुळे तेथे तराई पट्टा आढळत नाही. यमुनेच्या पूर्वेला मात्र पावसाचे प्रमाण वाढल्यामुळे तराईचा दलदलयुक्त पट्टा आढळून येतो. उत्तर प्रदेश, बिहार व नेपाळ येथे तराई प्रदेश आढळतो. प. बंगाल, आसाम व बांगला देश येथे त्याला द्वार म्हणतात.

हा भाग मुख्यतः साल, शिसव इ. पानझडी वृक्षांच्या जंगलांनी व्यापला आहे. जंगलावर अतिक्रमण झालेल्या भागात सॅव्हानासारखे दडस, उंच गवत आढळते. प्राणी–संपत्तीच्या दृष्टीने हा भाग समृद्ध आहे. वाघ, अस्वल, चित्ता, हरिण, सांबर, डुक्कर यांसारखे अनेक प्राणी येथे आढळतात. परंतु जंगलतोड व शिकार यांमुळे प्राणिजीवनावर विपरित परिणाम झाला आहे.

फाळणीनंतर भारतात आलेल्या निर्वासितांना जागा देण्याचा प्रश्न उपस्थित झाल्यानंतर तराईचा भाग भराभर लागवडीखाली येऊ लागला. त्यासाठी तेथे मोठ्या प्रमाणात असलेल्या हिवतापाच्या समस्येस नेटाने तोंड द्यावे लागते. आता या भागात तांदूळ, गहू, ताग, ऊस, मोहरी यांसारखी पिके काढली जातात.

फडके, वि. शं.